स्तानिस्लाव्हस्की महत्त्वाचा का ठरतो?
स्तानिस्लाव्हस्की महत्त्वाचा आहे. निश्चितच महत्त्वाचा आहे. का? विश्वासार्ह आणि जिवंत अभिनय करायसाठी त्यानं गणित सोडवावं, तशी टप्प्याटप्प्याची पद्धत तयार केली म्हणून? की साधारण शंभर-सव्वाशे वर्षांपुर्वी रशियामध्ये त्यानं रंगभूमीवरच्या अभिनयाच्या संदर्भात काही विचार मांडले, काही प्रक्रिया सांगितली ते विचार, ती प्रक्रिया आजही जगभर अनुसरली जाते म्हणून? का संहितालेखनात आणि नाटकांच्या मंचनात असलेला वास्तववाद त्यानं अभिनयातही आणला म्हणून? असेलही कदाचित, पण मला मात्र वाटतं, स्तानिस्लाव्हस्की महत्त्वाचा ठरतो तो काही वेगळ्याच कारणांमुळे.
स्तानिस्लाव्हस्की म्हटलं की काय आठवतं? त्यानं व्लादिमीर नोमरोव्हीच दानचेन्को ह्या त्याच्या सहकाऱ्यासोबत स्थापन केलेला मास्को आर्ट थिएटर हा नाट्यसंघ, संघ - आन्साम्बल हा शब्द त्यांनी जाणिवपूर्वक वापरला होता, कारण तिथे कुणी ‘स्टार’ नव्हते. हा मुख्य भूमिका करणारा नट आणि हे बाकी छोट्या भूमिका करणारे नट हा भेदभावच तिथे नव्हता. मास्को आर्ट थिएटरनं तर आपलं ब्रीदवाक्यच - ‘भूमिका कोणत्याही छोट्या नसतात, नट कदाचित असू शकतील’ असं ठरवलेलं होतं. त्यामुळे कुणीही एक नायक नाही, सगळ्यांनी मिळून काम करायचं, एकत्रित कला निर्मिती करायची त्यासाठी हा नाट्य संघ. तर तो आठवतो. त्यानं दिग्दर्शित केलेली चेकव्हची, गॉर्कीची, तुर्गेनेव्हची नाटकं आठवतात, त्यांना दिलेलं कुठलाही नाटकीपणा नसलेलं स्वाभाविक रूप आठवतं. स्तानिस्लाव्हस्की म्हटला की त्यानं विकसीत केलेली अभिनयाची पद्धत आठवते, इंग्रजीत त्या पद्धतीला स्तानिस्लाव्हस्की सिस्टिम असं म्हटलं जातं. त्यावरून ली स्ट्रासबर्गनं चित्रपटातल्या अभिनयाला डोळ्यांपुढे ठेऊन तयार केलेलं तिचं नवं रुप - मेथड अॅक्टींग, ती आठवते. त्यानं अभिनयाविषयी लिहिलेली तीन पुस्तकं - इंग्रजीत ‘अॅन अॅक्टर प्रिपेअर्स’, ‘बिल्डिंग अ कॅरेक्टर’ आणि ‘क्रिएटिंग अ रोल’ त्यांची के. नारायण काळ्यांनी केलेली मराठी भाषांतरं - ‘अभिनयसाधना’ आणि ‘भूमिकाशिल्प’ ही आठवतात आणि एवढीच फक्त आठवतात. अल्काझी, विजया मेहता यांच्यासारखे नावाजलेले दिग्दर्शक, राष्ट्रीय नाट्य शाळेतून पदविका घेतलेले प्रख्यात नट आपल्या भाषणांमधून, लेिखाणातून, मुलाखतींमधून स्तानिस्लाव्हस्कीच्या नावाचा सतत उदोउदो करत असतात आणि म्हणून नवोदित रंगकर्मी देखील स्तानिस्लाव्हस्कीच्या नावाचा जप करणं हे आपलं प्राथमिक कर्तव्य आहे, ह्या भावनेतून त्याच्या ‘नामाचा गजर’ करत असतात.
स्तानिस्लाव्हस्की खऱ्या अर्थानं महत्त्वाचा ठरतो ते चार कारणांमुळे.
एक, नटाला नाटकात अभिनय करायचा आहे, तर त्यासाठी अभिनयाचं प्रशिक्षण त्यानं घेतलं पाहिजे, असं त्याला वाटलं. नुस्तं वाटलं नाही ते त्यानं त्याच्या गटातल्या नटासांठी ते अनिवार्य केलं, त्यासाठी त्यानं मास्को आर्ट थिएटरला जोडून अभिनयाचं प्रशिक्षण देणाऱ्या ‘फर्स्ट स्टूडिओ’ची स्थापना केली. एवढंच नाही, तर आपले ज्याच्याशी तात्विक मतभेद आहेत, पण प्रशिक्षणाच्या त्याच्या कल्पना केवळ मुलभूत नाहीत तर क्रांतीकारी आहे, हे पटल्यामुळे आपला नाट्यवैरी व्सेव्हलोद मेअरहोल्ड ह्याला त्या स्टुडिओच्या प्रशिक्षकपदी नेमलं. केवळ हौस असली तरी नाटकांत अभिनय करता येतो असा सार्वजनिक आणि सार्वकालीक गैरसमज असलेल्या रंगभूमीच्या क्षेत्रात अभिनेत्याच्या प्रशिक्षणाविषयीची स्तानिस्लाव्हस्कीची भूमिका ही निश्चितच निर्णायक ठरते.
दुसरं असं की, स्तानिस्लाव्हस्कीचा फर्स्ट स्टुडिओ हा केवळ अभिनयाच्या प्रशिक्षणासाठी वाहिलेला नव्हता, तर स्तानिस्लाव्हस्की त्याचं वर्णन थिएटर लॅबरोटरी म्हणजेच रंगभूमीची प्रयोगशाळा असं करत होता. प्रयोगशाळा ही संकल्पना केवळ विज्ञानाच्या बाबतीत असू शकते, हा समज ज्या काळात होता त्या काळात, चुकतचुकत का होईना पण काहीतरी करून बघणं, माध्यमाच्या वेगवेगळ्या शक्यता तपासणं ही कामं ह्या प्रयोगशाळेने केली. रंगभूमीच्या प्रयोगशाळांच्या बाबतीत नंतर आर्तो, कोप्यू, ग्रोटोव्स्की, पीटर ब्रूक पासून ते आजकालच्या अरिआन मुश्किन, युजेनिओ बार्बा, व्लादिमीर स्तानिएव्हस्की यांच्यापर्यंत जी परंपरा दिसते त्याचं मूळ हे स्तानिस्लाव्हस्कीमध्ये आहे. नाट्यकलेची विज्ञानाशी सांगड घालून जेम्स-लांग ह्यांनी मानसशास्त्रात जे संशोधन केलं त्याचा अभिनय-प्रक्रियेशी एखाद्या वैज्ञानिकाप्रमाणे संबंध जोडणारा, ते करून बघणारा, केल्यावर तपासणारा स्तानिस्लाव्हस्की हा रंगभूमीवरचा वस्तुनिष्ट शास्त्रज्ञ होता.
तिसरी गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे, तो पोथीनिष्ट नव्हता. आपल्या कल्पनेतून, चिंतन-मनन करून त्यानं अभिनयाची एक पद्धत तयार केली खरी. रशियातल्या मंदीच्या काळात चार पैसे जोडण्यासाठी त्याचे पुस्तक करून, त्याचे इंग्रजी भाषांतर करून ते अमेरिकेत प्रसिद्ध केलं. ती पुस्तकं जगभर गाजली. स्वतःच्याच का असेना पण पुस्तकांमध्ये वर्णन केलेल्या पद्धतीलाच फक्त तो अनुसरत बसला नाही, तर सतत वेगवेगळ्या रितीनं त्या पद्धतीचं परिशीलन तो करत राहिला, तीत सतत बदल करत राहिला. तो म्हणतो देखील - ‘माझी पद्धत म्हणजे काटेकोर शास्त्र नाही, जसंच्या तसं तंतोतत अनुसरायला. तो एक मार्ग आहे, सोयीचा वाटला तर स्विकारा नाहीतर नाकारा.’ ज्या पद्धतीमुळे तो जगप्रसिद्ध झाला ती चुकीची आहे, हे देखील त्यानं त्याच्या शेवटच्या काळात जाहीर केलं. आयुष्यभर ज्याचा पाठपूरावा केला त्या मानसशास्त्रीय पद्धतीतून काहीही हाताशी येणार नाही, म्हणून तिला शारीरिक कृतींची पद्धत केली. आपलीच आपण समीक्षा करून स्वतःलाच चुकिचं ठरवणं, ह्याला धैर्य लागतं. ते स्तानिस्लाव्हस्कीपाशी होतं. त्यानं जे नाकारलं त्याचा आपण मात्र उदोउदो करतो, हे आपलं दुर्दैव.
स्तालिनच्या काळात सामाजिक वास्तववाद हा जेव्हा रशियाचा अधिकृत वाद ठरवण्यात आला, स्तानिस्लाव्हस्कीच्या जुन्या पद्धतीला रशियाची ओळख म्हणून तिचा गवगवा करण्यात आला. स्तानिस्लाव्हस्कीनं ह्याला ठाम विरोध केला. आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी तो शासनाशी, यंत्रणेशी भांडला. इतर लेखक-कलावंतांनी जेव्हा शासनयंत्रणेला अनुकुल असा सोयीस्कर रंग धारण केला, स्तानिस्लाव्हस्की मात्र आपल्या कलामुल्यांपासून ढळला नाही. शेवटी यंत्रणेनं त्याच्या नाटकांच्या प्रयोगांवर बंधनं घातली, त्याला राहत्या घरात स्थानबद्ध केलं, स्तानिस्लाव्हस्कीनं ते पत्करलं पण तडजोड केली नाही.
स्तानिस्लाव्हस्की आजही किंवा खरंतर आजच महत्त्वाचा ठरतो, तो या चार कारणांमुळे.
- प्रवीण भोळे
(दि. ३० नोव्हेंबर २०१९ रोजी आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्रातर्फे स्तानिस्लाव्हस्की लिखित आर्ट ऑव्ह स्टेज या पुस्तकाच्या मराठी अनुवादसाठी ओंकार गोवर्धन यांना बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार देण्यात आला, त्या प्रसंगी वाचलेले टिपण)