शुक्रवार, २० मार्च, २०२०

नाटक - रंगभूमी परिचय : २०. बालरंगभूमी, कामगार रंगभूमी, २१. एकांकिका, एकपात्री प्रयोग

नाटक - रंगभूमी परिचय : २०. बालरंगभूमी, कामगार रंगभूमी
. बालरंगभूमी : प्रेक्षकांच्या वयोगटावरून रंगभूमीचा हा प्रकार ठरतो. बालप्रेक्षकांनी पाहण्यासाठी मोठ्या वयाच्या माणसांनी लिहिलेली, दिग्दर्शित केलेली आणि लहान मुलांनी किंवा मोठ्या माणसांनी अभिनय केलेली नाटके बालरंगभूमीवर दिसून येतात. लहान मुलांची कल्पनाशक्ती, त्याचे भावविश्व, त्यांच्या वयातील प्रश्न किंवा समस्या लक्षात घेऊन खास त्यांच्यासाठी वेगळी नाटके लिहून सादर करण्यासाठी ही रंगभूमी उदयाला आली. लहान मुलांचे व्यक्तिमत्व घडविण्याच्या अनेक उपक्रमांपैकी बालरंगभूमी हे एक महत्त्वाचे माध्यम मानले जाते.
लहान मुलांचे मनोरंजन करावयाचे असल्यामुळे बालरंगभूमीवरील नाटकांमध्ये लहान मुलांना आकृष्ट करतील अशा परीकथा, लोककथा, साहसकथा, लहान मुलांच्या समस्या आणि व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने केलेले प्रबोधन, . वैशिष्ट्ये दिसून येतात. आकर्षक आणि रंगिबेरंगी वेशभूषा, अद्भूत रंगभूषा, संगीत-नृत्याचा वापर, ध्वनी-प्रकाशांचे विशेष परिणाम, . मंचनवैशिष्ट्ये बालरंगभूमीवर दिसून येतात
सुधा करमरकर, रत्नाकर मतकरी, सई परांजपे, पु. . देशपांडे,श्रीधर राजगुरू, . नाट्यकलावंतांनी बालरंगभूमीवर मोलाचे योगदान दिलेले आहेअल्लादीन आणि जादूचा दिवा, निम्माशिम्मा राक्षस, शेपटीचा शाप, दुर्गा झाली गौरी, . मराठी रंगभूमीवर गाजलेली बालनाट्ये आहेत. मोठ्या वयोगटातील नटांनी लहान मुलांच्या भूमिका करणारी मूळ जर्मनीमधील ग्रीप्स रंगभूमीची चळवळ मराठीत रुजू झालेली आहे. शिवाय नाटक, रंगभूमीचा समावेश महाराष्ट्रामधील अनेक शाळांमध्ये झालेला आहे
. कामगार रंगभूमी : आपले परंपरागत खेडेगाव आणि पिढीजात उद्योग, व्यवसाय सोडून मुंबईत गिरण्यांमध्ये कामगार म्हणून आलेल्या लोकांनी गणेशोत्सवांमधून मनोरंजनासाठी नाटके सादर करायला सुरुवात केली. हळूहळू या नाटकांमध्ये कामगारांच्या रोजच्या जीवनाचे प्रतिबिंब पडू लागले, भांडवलदारांकडून होणारी त्यांची पिळवणूक, त्याच्या जगण्यातील समस्या, त्यांचे प्रश्न, त्यांच्या जाणिवा, त्यांचे भावविश्व, त्यांची स्वप्ने, महत्त्वाकांक्षा, . बाबींचे पडसाद हळूहळू या नाटकांमधून उमटू लागले आणि मराठी रंगभूमीवर कामगार रंगभूमी हा स्वतंत्र प्रवाह निर्माण झाला. कामगारांनी कामगारांसाठी सादर केलेली नाटके असे या रंगभूमीचे स्वरूप होते. परळ, लालबाग, काळाचौकी, घोडपदेव, प्रभादेवी, वरळी, दादर यासारख्या श्रमजीवी कामगार भागात या कामगार रंगभूमीने नाटकांमधून आपले जगणेमांडण्याचे आणि आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडण्याचे काम केले. शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, शाहीर साबळे या कलावंतांनी लोकसंगीताचा आधार घेऊन कामगार जाणिवा रंगभूमीवर आणल्या. मामा वरेरकर यांनी लिहिलेली सत्तेचे गुलाम, सोन्याचा कळस, . मराठी कामगार रंगभूमीवर गाजलेली नाटके होत. कामगार रंगभूमीवरून पुढे आलेल्या अनेक नाटककार, दिग्दर्शक, नट आणि तंत्रज्ञांनी मराठी व्यावसायिक रंगभूमीवर तसेच चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटविला. नंतर मुंबईमधील गिरण्या बंद पडल्यावर कामगार रंगभूमीला उतरती कळा लागली. महाराष्ट्र शासनातर्फे १९५३ पासून कामगारांसाठी वेगळी नाट्य स्पर्धा घेतली जाते.

नाटक - रंगभूमी परिचय : २१. एकांकिका, एकपात्री प्रयोग
. एकांकिका :नाटकात सर्वसाधारणपणे पडदा उघडल्यापासून ते पडदा पडदा बंद होईपर्यंत एक अंक होतो. प्राचीन भारतातील संस्कृत नाटके दहा, सात, पाच किंवा एका अंकांची असत. मराठीत संगीत रंगभूमी प्रचलीत झाल्यानंतर पाच किंवा चार अंकी नाटके असत. नंतर मराठीत तीन अंकी नाटक अतिशय लोकप्रिय झाले. हल्ली बऱ्याचशा नाटकांमध्ये दोन अंक असतात. काही नाटकांमध्ये एकच अंक असतो. एकच अंक असलेल्या आणि साधारणपणे तीस ते साठ मिनिटांचा कालावधी असलेल्या नाटकांना एकांकिका म्हणतात. एकच अंक असेल आणि कालावधी एक तासापेक्षा अधिक असेल तर त्या नाटकाला दिर्घांक असे म्हणतात. एकाकिंका हा मराठी रंगभूमीवरील एक अतिशय लोकप्रिय नाट्यप्रकार आहे. ठराविक कालावधीत उत्कट परिणाम साधणे हे एकांकिकेचे उद्दिष्ट असते. कोणतीतरी एक छटा दाखविणारे छोटेसे कथानक, मर्यादित पण ठळक व्यक्तिरेखा, प्रसंगांमधील गतिमानता ही एकांकिकेची वैशिष्ट्ये होत. मर्यादीत कालावधीत अधिक परिणामकारकता साधण्याकरीता सूत्रधार किंवा वृंदाची योजना, निवेदने, स्वगते, मूकाभिनय, . साधनांचा वापर केला जाऊ शकतो. केवळ कालमर्यादेवरून हा प्रकार ठरत असल्यामुळे नाटकांचे विविधांगी दर्शन एकांकिकांमधून होत असते. विनोदी, चर्चात्मक, काव्यात्म, तत्त्वचिंतनपर, रहस्यमय, अशा रूपांमध्ये एकांकिका अवतरू शकते. एकांकिकांमध्ये सूचकात्मकता अधिक प्रमाणावर दिसून येते आणि ती संहितेपासून ते नेपथ्य-प्रकाशादी घटकांपर्यंत असू शकते. विशेषतः नेपथ्याबाबतीत सुटसुटीतपणा अधिक प्रमाणावर दिसून येतो
इंग्रजी रंगभूमीवर मोठ्या नाटकांसोबत एक छोटे नाटुकले करण्याची प्रथा होती. त्यांना इंटरल्यूड असे म्हणत असत. त्यांचाच प्रगत आविष्कार म्हणजे एकांकिका होय. साधारण १९३० नंतर मराठी रंगभूमीवर एकांकिका लिहिल्या जाऊ लागल्या. माधव मनोहर आणि अनंत काणेकर यांनी काही पाश्चिमात्य एकांकिकांचे मराठी अनुवाद केल्यानंतर मराठीत स्वतंत्रपणे एकांकिका लिहिल्या जाऊ लागल्या. सुरूवातीच्या काळात या एकांकिका श्रुतिकांच्या स्वरूपात आकाशवाणीवरून प्रसारित केल्या जात असत
काही अनुभव नाटकांमधून पुरेशा उत्कटपणे व्यक्त होऊ शकत नलत, ते एकांकिकांच्या माध्यमातून व्यक्त होऊ शकतात, तसेच नाटकांच्या मानाने सादरीकरणात आटोपशीरपणा येऊ शकतो ही जाणिव झाल्यानंतर मराठीतमोठ्या संख्येने एकांकिका लिहिल्या जाऊ लागल्या आणि सादर होऊ लागल्या. महाविद्याविद्यालयीन पातळीवर आणि खुल्या पातळीवर एकांकिकांच्या अनेक स्पर्धा सुरू झाल्या आणि त्या लोकप्रियदेखील झाल्या. विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार, रत्नाकर मतकरी, सतीश आळेकर, प्रेमानंद गज्वी, शफाअत खान, चंद्रशेखर फणसळकर, योगेश सोमण, . मराठीतील लोकप्रिय एकांकीकाकार आहेत. मादी (विजय तेंडुलकर), रक्तपुष्प (महेश एलकुंचवार), चक्र (विद्याधर पुंडलिक), सदू आणि दादू (पु. . देशपांडे), नातं (चं. प्र. देशपांडे), घोटभर पाणी (प्रेमानंद गज्वी), टॅक्स फ्री (चंद्रशेखर फणसळकर), . मराठीतील महत्त्वाच्या एकांकिका मानल्या जातात
. एकपात्री प्रयोग :एकाच नटाने सादर केलेल्या नाट्यप्रयोगाला एकपात्री प्रयोग असे म्हटले जाते. प्राचीन भारतीय रंगभूमीवर भाण नावाचा एकपात्री प्रकार सादर केला जात असे. भारतातील अनेक लोकरंगभूमीचे प्रकार हे एकपात्री आहेत. १९५८ मध्ये एम्लिन विल्यम्सने बॉय ग्रोइंग अप नावाचा एकपात्री प्रकार सादर केला. त्याच्या प्रभावातून मराठी रंगभूमीवर एकपात्री प्रयोग सादर होऊ लागले. पु. . देशपांडे यांच्या बटाट्याची चाळ या प्रयोगाने मराठी रंगभूमीवर एकपात्री प्रयोगांचा पायंडा पडला. एका व्यक्तिच्या दृष्टिकोनातून अनेक पात्रे उभी करणे आणि अनेक पात्रे असलेल्या कथानकाचे एकाच पात्राने सादरीकरण करणे हे दोन्ही प्रकार एकपात्री प्रयोगांमध्ये दिसून येतात. एकपात्री प्रयोगात नेपथ्य, प्रकाश, पार्श्वसंगीत या तांत्रिक घटकांचा क्वचित वापर आणि वेशभूषेत एखाद्या कपड्याचा बहुविध वापर, वाचिक अभिनय तसेच शारिरीकतेतून लकबींचे दर्शन, .वैशिष्ट्ये दिसून येतात. लक्ष्मण देशपांडे यांनी वऱ्हाड निघालंय लंडनला या अत्यंत लोकप्रिय एकपात्री प्रयोगाद्वारे हा प्रकार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचविला. काही एकपात्री प्रयोगांमध्ये अनेक वेगवेगळ्या व्यक्तिरेखा दाखविण्याऐवजी एकच व्यक्तिरेखा दाखविली जाते. उदा. माधुरी पुरंदरे यांचे आब्द आब्द. नाट्यछटा हा दिवाकरांनी मराठीत आणलेला साहित्यप्रकार आज अनेक स्पर्धांमधून आणि शाळांमधून सादर केला जातो. या प्रकारातदेखील एकच पात्र असते आणि ते एका किंवा काही काल्पनिक व्यक्तिरेखांशी संवाद साधत असते. कथाकथन, वेगवेगळे किस्से सांगत केलेला भविष्यकथनाचा कार्यक्रम, जादूचे प्रयोग, संमोहनाचे कार्यक्रम, . प्रकार एकाच व्यक्तिमार्फत सादर होत असतील तर त्यांना एकल सादरीकरणे असे म्हणता येऊ शकते. राजमाता जिजाबाई (सुनिता देशपांडे), मी अत्रे बोलतोय (सदानंद जोशी), स्मृतीचित्रे (सुहास जोशी), व्हय मी सावित्रीबाई (सुषमा देशपांडे), . मराठीतील काही गाजलेले एकपात्री प्रयोग होय.

- प्रवीण भोळे
प्राध्यापक आणि विभागप्रमुख
ललित कला केंद्र, गुरुकुल
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ४११ ००७

अभिनयाच्या किमयाशाळा

  अभिनयाच्या किमयाशाळा १ . प्रयोगशाळा : एक अवकाश अवकाश म्हणजे जागा , जिथे काहीतरी सामावले जाते असे काहीतरी , म्हणजे प्रयोगशा...