मराठी नाटकाची गोष्ट
(ललित कला केंद्र, पुणे विद्यापीठाने १९९९ मध्ये पुनरुज्जीवित केलेल्या सीता स्वयंवर नाटकातील एक दृश्य.
दिग्दर्शक : प्रवीण भोळे, छायाचित्र : कुमार गोखले)
मराठी माणूस नाटकवेडा आहे, असं म्हणतात, ते दोन्ही अर्थांनी. त्याला नाटकं करायलाही आवडतात आणि पहायलाही. एवढंच नाही तर नाटकांवरुन वाद घालायलाही मराठी माणसाला प्रचंड आवडतं. नाटकवेड्यांचे जे आवडते वाद आहेत, ते म्हणजे नाटकाने हसावावं की रडवावं ? नाटकाने दोन घटका करमणूक करावी की सामाजिक विषय मांडावा ? केवळ रडवणारं नाटक मोठं की विचार करायला लावणारं ? प्रश्न उपस्थित करणारं नाटक श्रेष्ठ की उत्तरं देणारं ? झालंच तर, प्रायोगीक नाटक असावं की नसावंच ? ते कशासाठी करायचं असतं ? नाही केलं तर चालत नाही का ? पण ह्या सगळ्यांपेक्षा मराठी माणसाला वाद घालायला आवडतं, ते काणत्याही गोष्टीच्या पहिलेपणावर. मराठीतलं पहिलं नाटक कोणतं ? पहिला नाटककार कोण ? पहिला गायक-नट कोण ? पहिला रंगीत पडदा कोणी वापरला ? पहिला बॉक्स सेट कोणी लावला, इत्यादि, इत्यादि.
मराठीतल्या पहिल्या नाटकाच्या संदर्भात अनेक दावे आहेत, कोणी म्हणतं, भाव्यांचं सीतास्वयंवर पहिलं, तर कोणी म्हणतं, किर्लोस्करांचं शाकुंतल. काही लोकांच्या मते फुल्यांचं तृतीय रत्नच खरं पहिलं तर काही लोक पहिलेपणाचा मान तंजावरच्या भोसले राजांनी लिहिलेल्या नाटकांना देतात. वाद हा चालूच राहणार. अगदी वर्षांप्रमाणेच पाहीलं, तर 1842 मध्ये वर्षभरात कधीतरी सादर झालेलं ( 5 नोव्हेंबरला नव्हे, तो देखील एक वादविषयच आहे) सीतास्वयंवर हे मराठी मातीतलं सगळ्यात जुनं नाटक मानता येईल. त्या सुमारास सांगलीचे संस्थानिक चिंतामणराव पटवर्धन होते. तिथल्या गणपती मंदिरात उत्तर कानडातील करकी गावच्या मेळ्याचा प्रयोग सादर करण्यात आला होता. हा प्रयोग कानडी भाषेतला होता. परंतु संस्थानातल्या बहुसंख्य लोकांची भाषा मराठी असल्यामुळे पटवर्धन राजांना वाटलं की मराठीतून असं काहीसं सादर व्हावं. म्हणून मग त्यांनी त्यांच्या दरबारातले एक मानकरी अमृत भावे ह्यांच्यापाशी ही आपली इच्छा व्यक्त केली. भाव्यांचा तरूण मुलगा विष्णुदास गाणी वगैरे रचायचा, लाकडी बाहूल्या तयार करायचा, म्हणून त्याच्या वडिलांनी त्याचावरच ही जबाबदारी सोपवली.
त्या काळी मराठी प्रांतात लोकरंगभूमीचे विविध प्रकार दिसून येत होते. धार्मिक ग्रंथांची प्रवचनं, त्यातील कथानकांवर आधारित किर्तनं, कोकणाकडचा दशावतार, कानडी भाषेतलं यक्षगान, भागवतमेळे, वर्षभरातले विविध व्रतवैकल्ये, सण, समारंभ, बारसे, विवाह, अत्यंसंस्कार असे विविध विधी ह्यानं सगळं सांस्कृतिक वातावरण भरलेलं-भारलेलं होतं. काही धार्मिक प्रसंगी, विशेषतः दसऱ्याच्या दिवशी सोंग काढण्याची परंपरा अनेक ठिकाणी दिसून येते. इथे कथानक आणि संवाद हे घटक नसतात, पण व्यक्तिरेखा, वेषभूषा, थोडं संगीत, नाच हे नाटकातले घटक मात्र दिसून येतात. कथन परंपरेत पारायण – प्रवचन – किर्तन असे विविध टप्पे दिसून येतात. पारायणात वाचन असतं, प्रवचनाच वाचनासोबत थोडं समजावून सांगीतलं जातं, तर किर्तनात समजावून सांगणं एवढ्या मोठ्या प्रमाणावर असतं की त्यासाठी संगीत आणि अभिनय हे घटक वापरले जातात. किर्तनातील गेय काव्य आणि त्याचं गद्य निरूपण ह्यात विष्णूदासांच्या नाटकाचं मूळ आढळतं.
संस्कृत नाटकांमध्ये पूर्वी धृवा नावाचा गीतप्रकार असत असे. ह्या धृवा नट गात नसत, तर गायकवृंद त्या गात असे, नट फक्त त्याबरहुकूम हालचाली करत. किर्तनाप्रमाणे गीत-गद्याचा क्रम आणि त्यातल्या धृवांसारख्या गाण्यांवरचा नटांचा अभिनय म्हणजेच विष्णूदास भाव्यांनी सादर केलेलं सीता-स्वयंवर होतं.
(पूर्वप्रसिद्धी दै. प्रभात )
