नाट्यछटाकार दिवाकर
हल्लीच्या काळात शालेय पातळीवर होणाऱ्या
स्पर्धांमध्ये किंवा लहान मुलांच्या स्नेहसंमेलनांतच केवळ नाट्यछटा सादर होतात. सर्वसाधारणपणे
नाटकांविषयी जेव्हा बोलले जाते, लिहिले जाते तेव्हा नाटकाच्या परीघातील अनेक
नाट्यप्रकारांचा उल्लेख होतो, ऊहापोह होतो, परंतू नाट्यछटांविषयी मात्र बोलले-लिहिले जात नाही. याचे कारण कोणे
एके काळी महाराष्ट्रात हा प्रकार जरी अतिशय लोकप्रिय असला तरी आता मात्र कुणी
नाट्यछटा फारशा लिहितही नाही वा सादरही करत नाही. हा प्रकार आता नामशेष झालेला आहे
असे म्हणावयास काहीही हरकत नाही.
![]() |
| दिवाकर उर्फ शंकर काशिनाथ गर्गे (१८८९ - १९३१) चित्र सौजन्य मराठी विकिपिडीया |
दिवाकर म्हणजेच शंकर काशिनाथ गर्गे हे काही
रूढार्थाने नाटककार नव्हेत, काही नाटके, नाटिका त्यांनी लिहिल्या. फ्रेंच नाटककार
मॉरिस मायटरलिंक यांचे एक नाटक मराठीत अनुवादीत देखील केले. तरीही दिवाकर म्हटले
म्हणजे आठवतात त्या त्यांनी लिहिलेल्या नाट्यछटाच. शेक्सपिअर, गॉल्सवर्दी,
ब्राउनिंग, इ. युरोपीय लेखकांच्या साहित्याचे त्यांनी केवळ वाचनच केले नव्हते तर
त्यांचा अगदी तपशीलवार अभ्यास केला होता. ब्राउनिंग ह्या लेखकाने काही नाट्यात्म
एकभाषिते लिहिली होती. त्या धर्तीवर मराठीत काही लिहावे ह्या हेतूने त्यांनी
नाट्यछटा लिहिल्या. नाट्यछटा म्हणजे एक छोटेखानी, एकपात्री स्वगतासारखा प्रकार.
आपल्या शेजारी एक किंवा काही पात्रे आहे अशी कल्पना करून नाट्यछटा सादर करणारा
त्यांच्याशी संवाद साधत असतो, त्याचे संवाद तो मोठ्याने म्हणत असतो, त्यावर
शेजारच्याची प्रतिक्रिया “काय म्हणालात ..”अशी
सुरुवात करून स्वतःच म्हणत असतो. त्यामुळे वरपांगी हे स्वगत वाटत असले तरी सुप्त स्वरुपातले
संवाद असल्यामुळे नाट्यछटा हा प्रकार अत्यंत नाट्यपूर्ण असतो. नाट्यछटा हा अगदी
छोटेखानी नाट्यप्रकार, त्याचा विस्तार आणि त्याचा कालावधी हा मर्यादित स्वरुपाचा
असतो, फारफारतर पन्नास-पंचावन्न ओळींचा, पण ह्या मर्यादित अवकाशातही अतिशय वेधक
पद्धतीने प्रसंगाचे वर्णन केलेले असते.
दिवाकरांनी लिहिलेली पहिली
नाट्यछटा १५ एप्रिल १९१३च्या केसरी ह्या वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाली, आणि मराठी
साहित्याला आणि रंगभूमीला नाट्यछटा हा नाट्यप्रकार मिळाला. साहित्यप्रकार म्हणून आरंभ
झालेला हा प्रकार खरा नाट्यप्रकारच होय. नेमके व्यक्तिरेखाचित्रण, भावनांचा
जिवंतपणा, जगण्यातील विसंगती, विरोध, इ. बाबींचा वापर करून दिवाकरांनी
नाट्यछटांमध्ये नाट्यात्मता साधली. अत्यंच आटोपशीर असलेल्या ह्या प्रकारातून
दिवाकरांनी मानवी स्वभावाचे आणि वर्तनाचे तसेच विसंगतीयुक्त समाजव्यवहाराचे मोठे
मार्मिक दर्शन घडविले आहे. विनोद, उपरोध, नेमके मनोविश्लेषण आणि नाट्यात्मकतेची
जाण ही त्यांच्या लिखाणाची वैशिष्ट्ये होत. सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या
लिखाणातून तत्कालीन सामाजीकतेचे दर्शन घडते हे जेवढे खरे आहे, तेवढेच त्यांच्या
लिखाणातील अनेक गोष्टी खरे तर अत्यंत आधुनिक आणि म्हणूनच त्यांच्या काळाच्या
पुढच्या वाटतील अशा होत्या, त्या जाणिवा नंतर स्वातंत्र्योत्तर काळात मोठ्या
प्रमाणावर व्यक्त झाल्या. दिवाकर महत्त्वाचे ठरतात ते ह्यामुळे. ‘कोकीळाबाई गोडबोले’, ‘शिवी कोणा देऊ नये’, ‘पंत मेले – राव चढले’, ‘तेवढेच ज्ञानप्रकाशात’ ह्या त्यांच्या काही गाजलेल्या नाट्यछटा होत.
दिवाकरांनंतर अन्य कोणी समर्थपणे हा प्रकार हाताळल्याचे दिसत नाही. कालीकदृष्ट्या
छोटा प्रकार असल्याने स्पर्धांव्यतिरिक्त स्नेहसंमेलनाचा एक भाग म्हणूनच नाट्यछटा
सादर होत आल्यात. काही अपवाद वगळता त्यांची स्वतंत्र सादरीकरणे झाली नाहीत, होत
नाहीत. तरी देखील आजपासून सुमारे शंभर वर्षांपूर्वी निर्माण झालेला हा नाट्यप्रकार
कोणत्याही मराठी नाटकवाल्याला महत्त्वाचा वाटेल असाच आहे.पूर्वप्रसिद्धी दै. प्रभात
