तृतीय रत्न : विद्रोहाचा पहिला उद्गार
इतर कलांच्या मानानं नाटक ही कला समाजाच्या अधिक जवळ आहे.
ज्या समाजात नाटक निर्माण होते, त्या समाजात आणि नाट्यकलेत सारखी देवाण-घेवाण
चाललेली असते. समाजात ज्या गोष्टी घडतात, त्याचे पडसाद नाटकांत उमटलेले दिसतात तर
नाटकांमधल्या गोष्टी समाजात स्विकारल्या जातात. विष्णूदास भाव्यांनी सीता-स्वयंवर
नाटकात धनुष्याला प्रत्यंचा लावणारा नायक राम रंगवलेला आहे. त्या काळात प्रबळ होऊ
लागलेल्या इंग्रजांना चेतावणी देण्यासाठी तत्कालीन भारतीय जनतेसमोर उभा केलेला
राष्ट्रीय अस्मितेचा तो आदर्श होता. त्या त्या काळातील, त्या त्या प्रदेशातील
लोकांचे जीवनमान, त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या नाटकांमधून दृगोचर झाल्याची
अनेक उदाहरणे अगदी प्राचीन काळापासून ते आजपर्यंत आणि जगभरातल्या जवळजवळ सर्वंच
प्रदेशांमधल्या नाटकांमधून दिसून येते. अगदी कालीदासाच्या अभिज्ञानशाकुंतल
नाटकातली गोष्ट पूराणातल्या दुष्यंत-शकुंतलेची असली तरी ज्या काळात ते नाटक
कालीदासानं लिहिलं त्या काळातल्या रुढी-परंपरांचंच चित्रण त्या नाटकात दिसतं.
विष्णूदास भाव्यांच्या सीता-स्वयंवरचा प्रयोग १८४३ मध्ये
झाला, या नाटकाची संहिता आज उपलब्ध नाही. मुळात विष्णूदासांनी यातली गाणीच केवळ
लिहिली, ती त्यांच्या नाट्यकवितासंग्रहात मिळतात ही. परंतु संवाद मात्र प्रयोगांमध्ये
नट उत्स्फुर्त पद्धतीने म्हणत असत. पण १८५५ मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी जे
नाटक लिहिले, त्याला लिखित संहिता होती, त्यात संवाद होते. या नाटकाचं नाव होतं,
तृतीय रत्न. त्यांनी जरी ते १८५५ मध्ये लिहिले असले, तरी त्या काळात ते प्रकाशीत
होऊ शकलं नाही, ते प्रकाशीत झालं ते लिहिल्यापासून तब्बल सव्वाशे वर्षांनी, म्हणजे
१९७९ साली, पुरोगामी सत्यशोधक या त्रैमासिकात. अर्थात त्याचा प्रयोगही त्या काळात
होऊ शकला नाही.
![]() |
| ज्योतिबा फुले (१८२७ - १८९०) |
१८५५ च्या अली-पलीकडची सामाजीक-राजकीय परिस्थिती बघितल्यास
लक्षात येतं की समाजातील चातुर्वण्य पद्धती प्रभावी होती, ब्राह्मण वर्गाला वगळता
इतरांना शिक्षणाचा अधिकार नव्हता वा त्या विषयीची जागृतीही इतर वर्गात नव्हती.
जातीय उतरंडीचा फायदा घेऊन बरेचसे ब्राह्मण अशिक्षित कुणब्यांच्या अज्ञानाचा फायदा
घेत होते. याच सुमारास इंग्रजांनी देखील भारतात हळू हळू आपले पाय पसरायला सुरुवात
केलेली होती. या पार्श्वभूमीवर फुल्यांनी आपले नाटक लिहिलं होतं.
नाटकाचं कथानक अगदीच साधं-सरळ. एका गावात एक कुणबी जोडपं
असतं. गावातला भिक्षुक ब्राह्मण निरनिराळ्या पद्धतीने त्यांना धाकधपटशा दाखवून
त्यांना लुटत असतो. एक ख्रिश्चन पाद्री कुणब्याला याची जाणिव करून देतो. नाटकाच्या
शेवटी कुणबी पती-पत्नी फुल्यांच्या शाळेत दाखल होतात.
या नाटकात सर्वांत महत्त्वाचं पात्र आहे, ते विदुषकाचं. हा
विदुषक एखाद्या सूत्रधाराप्रमाणे शिक्षणाचं महत्त्व उलगडून दाखवतो.
भोळ्या-अशिक्षित लोकांची लुबाडणूक कशी होते हे देखील स्पष्ट करतो. अर्थातच या
विदुषकाचं नातं संस्कृत नाटकातल्या विदुषकाशी नसून भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतात
ज्या वेगवेगळ्या लोकनाट्याच्या परंपरा आढळतात, त्या परंपरांमधल्या वेगवेगळ्या
नावांच्या विदुषकाशी आहे. तमाशात त्याला सोंगाड्या म्हणतात, भवईत रंगळो, दशावतारात
संकासूर तर यक्षगानात हनुमान्नायक. नावं निरनिराळी असली तरी त्यांचं कार्य
साधारणपणे सारखंच असतं. हे विदुषक नाटकातल्या कथानकाच्या निमित्ताने समाजातील
तत्कालीन घडामोडींवर बोचरं भाष्य करीत असतात. फुल्यांचा विदुषक या समस्त
लोक-विदुषकांशी नातं सांगून तत्कालीन समाजातील ज्वलंत प्रश्नांचा एल्गार करतो.
म्हणूनच तृतीय रत्न हे नाटक मराठीतले पहिले विद्रोही नाटक ठरतं.
(पूर्वप्रसिद्धी दै. प्रभात)
