राजीव नाईक
![]() |
राजीव नाईक (जन्म १२ सप्टेंबर १९५६) छायाचित्र मंदार देशपांडे
|
काही लोक कलेची निर्मिती करतात, तर काही कलाकृतींची चिकित्सा करतात, त्यांचं विश्लेषण करतात. राजीव नाईक अशा दुर्मिळ प्रजातीचे घटक आहेत, जे ह्या दोन्हीही क्षेत्रात प्रच्छन्न मुशाफिरी करतात. राजीव नाईक हाडाचे नाटकवाले आहेत - नाटकं लिहिण्याशिवाय, नाटकांचं बॅकस्टेज करण्याशिवाय, नाट्यसंस्था चालवण्याशिवाय, नव्या नाटककारांना, होतकरू नटांना, दिग्दर्शकांना ते सतत मार्गदर्शन करत असतात. एखादं नाटक पहायला गेले की त्या नाटकाशी संबंधीत लोक ओळखीचे असोत वा नसो, त्यांच्याशी ते त्या नाटकाविषयी अत्यंत तपशीलाने बोलतात. आपण नाटक पाहतो, टाळ्या वाजवतो, प्रसंगी त्याच्याविषयी आपल्या मित्रमंडळीत किंवा लेखक-दिग्दर्शकाशी चर्चा करतो, राजीव नाईक मात्र आजही पाहिलेल्या प्रत्येक नाटकाची स्वतःसाठी टीपणं काढून ठेवतात. नाटक ह्या प्रकारावर इतकं मनापासून प्रेम करणारा मनुष्य विरळाच.
राजीव नाईक लेखक आहेत. त्यांनी नाटकं लिहिली आहेत, नाटकांविषयी लिहिलं आहे. नाटकांमध्येही एकांकिका लिहिल्या आहेत, दोन अंकी नाटकं लिहिली आहेत. ‘बंदिश’ हे त्यांनी नुकतंच लिहिलेलं नाटक, आठवणी गोंदासारख्या चिकट असतात, असं दालीनं त्याच्या चित्रात रंगवलंय खरं, पण आठवणीच नसणाऱ्या विलक्षण प्राध्यापकाविषयीचं हे एक विलक्षण नाटक. या नाटकाशिवाय त्यांची बाकीची नाटकं तीन खंडांमध्ये प्रकाशित झालेली आहेत. ‘अनाहत’, ‘अखेरचं पर्व’ आणि ‘जातक नाटक’ ही तीन नाटक ‘सततची नाटकं’ ह्या शिर्षकाखाली भेटतात, नावाप्रमाणेच ती काल-आज-उद्या अशी कधीही घडू शकणारी सततची, अभिजात अशी नाटकं आहेत. ‘सांधा’, ‘आपसातल्या गोष्टी’ आणि ‘साठेचं काय करायचं?’ ही आताची नाटकं आहे. ज्या काळात ती लिहिली गेली, त्या काळातल्या भवतालाचा परिणाम झालेल्या व्यक्तिरेखा त्यात आपल्याला भेटतात, एका अर्थानं त्या त्या काळातल्या आत्ताविषयीची ही नाटकं आहेत. सुखात्मिका आणि शोकात्मिका ह्या दोन परस्परविरोधी नाट्यप्रकारांना एकत्र आणणारं ‘सांधा’ हे एक आगळं-वेगळं नाटक आहे. आणि ‘साठेचं काय करायचं?’ हे तर मराठी नाटकवाल्यांचं आणि प्रेक्षकांचंही अतिशय लाडकं नाटक. केवळ मराठीच नाही तर हिंदीत, काही प्रादेशिक भाषांमध्ये आणि क्रोएशिअन भाषेतही ह्या नाटकाचा अनुवाद होऊन त्याचे प्रयोग झालेले आहेत. काही अधली-मधली अशी नाटकं आहेत, ती म्हणजे - ‘माणूसघर’ (ही इब्सेनच्या ‘डॉल्स हाउस’ ह्या नाटकावरची नाटकातूनच दिलेली प्रतिक्रिया आहे), ‘मिटली पापणी’ (वेगवेगळ्या व्यक्तिरेखांची वेगवेगळी स्वप्नदृश्य साकारणारं, मराठी रंगभूमीवरील अभिव्यक्तीवादाचं उदाहरण ठरणारं हे एक महत्त्वाचं नाटक आहे), ‘वांधा’ आणि ‘खेरिज’. शिवाय काउफ्टमन आणि हार्ट ह्यांच्या ‘मेरीली वी रोल अलॉंग’ ह्या अमेरिकन नाटकावरून चेतन दातारसोबत ‘मागोवा’, बर्टोल्ट ब्रेख्तचं जर्मन ‘गॅलेलिओ’, शुद्रकाचं संस्कृत ‘मृच्छकटिक’ मराठीत ‘मातीच्या गाड्याचं प्रकरण’ ह्या नावानं, शेक्सपिअरचं इंग्रजी ‘अ मिडसमर नाइट्स ड्रीम’ मराठीत ‘ऐन वसंतात अर्ध्या रात्री’ ह्या नावानं, कार्नाडांचं कानडी ‘नागमंडल’ अशी विविध भाषांमधली नाटकं त्यांनी मराठीत भाषांतरीत केलेली आहेत. अंटन चेखव्हची ‘द बेअर’ ही एकांकिका आणि फिलिप सवागव्हिचचं ‘ब्रिकी’ हे नाटक त्यांच्या इंग्रजी भाषांतरावरून अनुवादित केलेली आहेत.
मराठीत नाट्यविषयक लिखाण तसं विपूल आहे, पण बहुतेक सगळं नाट्यसंहितांची चिकित्सा करणारं, किंवा प्रयोगांच्या इतिहासाचा आढावा घेणारं. ‘नाटकातली चिन्ह’, ‘नाटकातलं मिथक’ ‘खेळ नाटकाचा’ आणि ‘ना नाटकाचा’ ह्या पुस्तकांमधून नाईकांनी शब्दसंहितेचं नाही तर नाट्यप्रयोगच्या घटकाचं सौंदर्य उलगडून दाखवणारं असं, खऱ्या अर्थानं रंगभूमीविषयक लिखाण केलं आहे. किंवा मराठीतल्या रंगभूमीविषय लिखाणाचा ओनामा त्यांनी केला आहे, असं जरी म्हटलं तरी वावगं ठरू नये. रंगभूमावरील मैलाचा दगड ठरलेल्या नाटकांची एकाच वेळेस आस्वादक आणि तितकीच वस्तूनिष्ट चिकित्सा करणारं ‘लागलेली नाटकं’ हे त्याचं पूस्तक म्हणजे तर नाटकांचा अभ्यास कसा असावा ह्याचा एक उत्तम वस्तूपाठ आहे.
शिवाय ते एक विचक्षण दृष्टीचे, हळव्या संवेदना असलेले आणि भाषा ह्या प्रकारावरच उत्तम प्रभुत्व असलेले प्रतिभावंत कवी आहेत, ह्याचा प्रत्यय त्यांच्या काही नियतकालिकांमधून प्रकाशित झालेल्या कवितांमधून आणि कविता-बिविता ह्या संग्रहातून येतो. त्यांची ‘बा विदुषका’ ही कविता तर अनेक तरूण नटांच्या मुखोद्गत असते. कथा ह्या माध्यमातील प्रायोगिकतेच्या विविधांगी शक्यता दाखवणारा ‘मोकळा’ हा कथासंग्रहदेखील त्यांनी लिहिला आहे.
आणि ह्या सगळ्यांहून महत्त्वाचं म्हणजे ते आपल्या विद्यार्थ्यांप्रती अत्यंतिक जिव्हाळा असलेले हाडाचे शिक्षक आहेत. शिकवत असलेल्या विषयाचं सखोल ज्ञान, ते प्रासादिक करून विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्याची हातोटी, केवळ पारंपरिक पद्धतीपेक्षा शिकवण्यातले वेगवेगळे प्रयोग आणि अध्यापनविषयक असलेली आपली ठाम भूमिका ह्या सर्व गुणांमूळे ते शिक्षक ह्या संकल्पनेचे मूलादर्श ठरतात. महाराष्ट्रात आजच्या घडीला ‘राजीव नाईकांचे विद्यार्थी’ ही पदवी एखाद्या विद्यापिठाच्या पदवीपेक्षा जास्त अभिमानानं मिरवणारे अनेक रंगकर्मी सापडतील. केवळ वर्गांमध्येच नाही तर कुठेही, केव्हाही कोणतीही शंका, कोणताही प्रश्न बिनदिक्कत विचारावासा वाटणारं हे आद्य गूगल आहे.
अशा या कुशाग्र बुद्धिमत्ता आणि कमालीची संवेदनशिलता असलेल्या नाटकावर निरतिशय प्रेम करणाऱ्या एकामेवाद्वितीय व्यक्तिमत्वाला ह्या वर्षीचा नाट्यलेखनाचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झालाय, ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक नाटकवाल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
—————————————————————————————————
प्रवीण भोळे
(पूर्वप्रसिद्धी रंगवाचा, ऑगस्ट २०१९)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा