बुधवार, १४ डिसेंबर, २०१६

कहाणी फर्मास फार्साची



व्यावसायीक मराठी रंगभूमीवर फार्स पद्धतीच्या नाटकांनी आपले स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केलेले आहे. फार्स ह्या मूळ स्पॅनिश शब्दासाठी मराठीत खरे तर प्रहसन असा संस्कृत भाषेतील तत्सम शब्द आहे, परंतू आपल्या मराठी नाटकाने मात्र फार्स ह्या परकीय शब्दालाच आपले मानले आहे. विनोदनिर्मीतीसाठी काय वाट्टेल ते अशीच फार्सची व्याख्या करावी लागते. काय वाट्टेल ते मध्ये शब्दच्छल, कोट्या, वेषांतरे, गैरसमजूती, शारीरिक कसरती, अतिशयोक्ती अशा आणि ह्या सारख्या अनेक साधनांचा उपयोग करून घेतला जातो. पण आज ज्या अर्थाने आपण फार्स हा शब्द वापरतो तो काही त्याचा मूळ अर्थ मात्र नाही.
सतराव्या, अठराव्या शतकात युरोपात मुख्य नाटकासोबत एखादे छोटे जोडनाटक सादर करण्याची प्रथा होती. एखादे मोठे नाटक पहात असताना कंटाळा येऊ नये म्हणून किंवा मुख्य नाटक जर गंभीर स्वरूपाचे असेल तर वातावरण हलके फुलके व्हावे म्हणून दोन अंकाच्या मध्ये किंवा नाटक संपल्यावर हे छोटेसे नाटक सादर होत असे. फार्स ह्या शब्दाचा मूळ अर्थ पुरवणी किंवा पुरण, पेंढा. मुख्य नाटकाला जोडलेले पुरवणी नाटक किंवा मुख्य नाटकाच्या आत पुरणासारखे किंवा पेंढ्यासारखे भरलेले छोटे नाटक म्हणून तो फार्स. एकोणीसाव्या शतकात ब्रिटीश अधीकारी आणि सैनिक ह्यांच्या मनोरंजनासाठी काही ब्रिटीश नाटककंपन्यांनी भारतात दौरे करून त्यांच्या इंग्रजी नाटकांचे मुंबईमध्ये प्रयोग केले. ह्या त्यांच्या प्रयोगांसोबत फार्स मुंबईत पोचला. त्या काही मुंबईसह महाराष्ट्रात विष्णुदासी छापाची आख्यान नाटके सादर होत असत. अशाच एका पौराणिक आख्यान नाटकाच्या जोडीला मुंबईच्या अमरचंदवाडीकर नाटक मंडळीने १९ जानेवारी १८५६ रोजी एक मराठी भाषेतील फार्स करून दाखवला, तो आपल्या मराठीतला पहिला फार्स. अर्थात प्रेक्षकांना हसवण्यासाठी काय वाट्टेल ते हे वैशिष्ट्य मात्र त्या फार्साला अद्याप चिकटले नव्हते. शंकरराव मुझुमदारांनी अण्णासाहेब किर्लोस्करांच्या चरित्रात ही नोंद केली असून दुसऱ्या बाजीरावाच्या कारकिर्दीच्या गोष्टी, हा त्यांच्या फार्सचा विषय होता असे नमूद करून ठेवले आहे. पौराणिक नाटकाच्या जोडीला केल्या जाणाऱ्या या फार्सची जाहिरात लोकोपयोगी, हसण्याजोगा, सर्वोत्कृष्टअशा विशेषणांनी केली जात असे. हा नाट्यप्रकार जरी युरोपातून आयात झालेला असला तरी त्याच्या कथानकांवर, आशय-विषयावंर तसेच सादरीकरणावरही पाश्चिमात्य प्रभाव होता असे मात्र म्हणता येणार नाही. ह्या गोष्टींच्या प्रेरणा अत्यंत एतद्देशीय होत्या. 

प्रारंभिक फार्सांच्या काही जाहिराती
 प्रत्येक संस्कृतीच्या लोकपरंपरेत अत्यंत विलक्षण अशा लोककथा, दंतकथा, कहाण्या असतात. ह्या कहाण्या बौद्धिक किंवा पंडिती परंपरेपासून अलिप्त असलेल्या, आधुनिक जीवनधाटणीपासून दूर असलेल्या लोकविलक्षण अशा, अ-नागर चतुराईने भरलेल्या अशा कुण्या विशिष्ट एका व्यक्तिने न लिहिलेल्या अशा त्या असतात. प्रारंभिक काळातील फार्स ह्या लोककहाण्यांवर आधारित होते. ह्या फार्सांचे लेखकही आज अपरिचित असलेले जानपद परंपरेतले होते. मराठीतल्या भुता-खेतांच्या गोष्टी, असंभाव्य पराक्रम करणाऱ्या शिलेदारांच्या गोष्टी, अशक्य तर्कसंगती मांडून फसवणाऱ्या ठकसेनांच्या गोष्टी, जावईबापूंच्या फजितीच्या गोष्टी, काही लोकनायकांच्या चतुराईच्या गोष्टी, आपल्या मातीतल्या प्रेमकहाण्या ही ह्या फार्सांची कच्ची सामग्री होती. चलाख चंपा, आगबोटीचा फार्सतसेच नारायणराव पेशवे यांच्या वधाचा फार्स ही काही त्या काळातल्या लोकप्रीय फार्सांची नावे. मनोरंजनासोबतच त्या त्या काळातील समाजातील चालीरीतींचे चित्रण करण्याची प्रवृत्ती मराठी नाटकात फार्समुळेच अवतरली असेही म्हणता येईल. अभिनव तरुणी विद्या प्रहसन’, ‘मनोरमा’, ‘तरुणी शिक्षण नाटिका’, ‘स्वैरसकेशा’, ‘मोर एल.एल.बी. प्रहसन ह्या फार्सांमधून समाजामध्ये असणारे उपहासास्पद प्रकार विडंबनाचा आश्रय घेऊन अवतरले.  लोकपरंपरेतल्या कहाण्या सामाजीक टिका करू लागल्या, परंतु फार्सचा हा विशेष काळाच्या ओघात गळून पडला, आणि नंतरच्या काळातला फार्स हसवण्याचे केवळ एक साधन बनून राहिला. 

पहिल्या दौऱ्याची गोष्ट



विष्णूदास भाव्यांनी सांगलीकर पटवर्धन संस्थानिकांच्या सांगण्यावरून सीतास्वयंवर आख्यान सिद्ध केलं आणि त्याचा प्रयोगही सादर केला. नेमके कथानक, सुरस काव्यरचना, त्यांच्या सुश्राव्य चाली, नटांच्या रंगीबेरंगी वेशभूषा, रंगभूषा, त्यांची चिलखते, टोप, आयुधे अशा मंचवस्तूंनी युक्त अशी विष्णुदासांची नाट्यकृती सर्वांनाच फार आवडली. म्हणून या नाटकाचे जनतेला बघता येण्यासाठी अजून काही प्रयोग व्हावेत अशी राजेसाहेबांनी इच्छा प्रदर्शित केली. म्हणून मराठी मातीतल्या ह्या पहिल्या आख्यानाचे अनेक प्रयोग ही झालेत. राजेसाहेबांनी विष्णुदासांना राजदरबारात नाटक करण्याची रीतसर पगारी नोकरीच दिली.
विष्णुदासांनी रचलेल्या नाटकात भागवत मेळ्याच्या पूर्वरंगातील काही घटक आणि दशावताराच्या पूर्वरंगातील काही घटक ह्यांचे मिश्रण आढळते. ज्यात मंगलाचरण, देवतांचे – विशेषतः गणपती आणि सरस्वतीचे स्तवन, त्यांचा आशीर्वाद मागणे, देवतांनी तो देणे, एखादे विनोदी पात्र आणि सूत्रधार ह्यांच्या संवादातून आख्यानाची पूर्वकल्पना आणि शेवटी बाल-गोपाळ गंधर्वांचे सनृत्य गायन, इ. बाबींचा समावेश होता.
आख्यानात सूत्रधार निवेदन करायचा, गाणी म्हणायचा – त्याबरहुकूम पात्रे मंचावर येत जात असत आणि अभिनय करत असत. पात्रांनी स्वतः गाणं न म्हणता, गायल्या गेलेल्या शब्दावर फक्त अभिनय करायचा ही परंपरा दक्षिण भारतातल्या बहुतेक सर्व पारंपरिक प्रयोगकलांमध्ये आढळते. विष्णूदासी आख्यानातील सूत्रधार निवेदन आणि गायन करत असे. 
(ललित कला केंद्र, पुणे विद्यापीठाने १९९९ मध्ये पुनरुज्जीवित केलेल्या सीता स्वयंवर नाटकातील एक दृश्य.
दिग्दर्शक : प्रवीण भोळे, छायाचित्र : कुमार गोखले)
मराठी समाजमनाला नृत्यापेक्षा संगीत ही कला अधिक जवळची वाटते. भाव्यांनी देखिल करनाटकी नाटकाचे मराठीकरण करताना हाच विचार केला. मूळ भागवत मेळ्याच्या तुलनेत आपल्या नाटकातले नृत्याचे प्रमाण कमी केले आणि संगीताचे वाढवले. गाण्यांसाठी क्वचित ठिकाणी अभिजात रागांचा वापर केला. किर्तनी परंपरेतल्या प्रासादिक चाली, स्त्रीगीतांच्या सुगम चाली ह्यांचा उपयोग गाण्यांच्या चालींसाठी केला.
अशा प्रकारे दशावतार, यक्षगान, भागवत मेळे, किर्तन, स्त्री गीते, रागसंगीत ह्यांच्यातले काही घटक आणि स्वतःकडची कलाकुसर ह्या सर्वांच्या मिश्रणातून त्यांनी विष्णूदासी नाटक हा नाट्यसादरीकरणाचा नवा बाज तयार केला. हे नवीन पठडीचे नाटक प्रेक्षकांनाही खूप भावत होते.
राजेसाहेबांच्या आज्ञेवरून त्यानंतर विष्णूदास भाव्यांनी रामायण, महाभारतातील अनेक कथानकांवर आख्याने रचली आणि सादर देखील केली. ही नाटके पाहून राजेसाहेबांनी नाट्यमंडळीचा खर्च भागण्यासाठी विष्णूदासांच्या नावे थोडी जमीन देण्याचे कबूल केले. परंतु प्रत्यक्ष तसे घडण्याच्या आतच १८५१ मध्ये चिंतामणराव पटवर्धनांचे निधन झाले. चिंतामणरावांचे सुपूत्र तात्यासाहेब वयाने लहान असल्यामुळे तत्कालीन ब्रिटिश सरकारने संस्थानाचा कारभार पाहण्यासाठी आपला प्रतिनिधी नेमला.
राजदरबारातून होणारी आर्थिक मदत थांबल्याने विष्णूदासांच्या नाटक मंडळीवर कर्जाचा बोझा वाढत गेला. आणि म्हणून आपली नाट्य-मंडळी जगवण्यासाठी विष्णूदासांनी नाटकाचा दौरा काढायचा ठरवले.
सर्व तयारी करून १८५२ मध्ये सर्व कलावंत, पोशाख, मंचवस्तू घेवून काही नवीन नाटके रचून विष्णुदास भाव्यांच्या नाटक मंडळीने सांगलीहून तासगावचा पहिला दौरा केला, तेथे सात-आठ दिवस राहून रोज एक ह्याप्रमाणे नाटकांचे खेळ केले. व्यावसायिक मराठी नाटकाचा हा पहिला दौरा.
(पूर्वप्रसिद्धी दै. प्रभात)

अभिनयाच्या किमयाशाळा

  अभिनयाच्या किमयाशाळा १ . प्रयोगशाळा : एक अवकाश अवकाश म्हणजे जागा , जिथे काहीतरी सामावले जाते असे काहीतरी , म्हणजे प्रयोगशा...