बुधवार, १४ डिसेंबर, २०१६

पहिल्या दौऱ्याची गोष्ट



विष्णूदास भाव्यांनी सांगलीकर पटवर्धन संस्थानिकांच्या सांगण्यावरून सीतास्वयंवर आख्यान सिद्ध केलं आणि त्याचा प्रयोगही सादर केला. नेमके कथानक, सुरस काव्यरचना, त्यांच्या सुश्राव्य चाली, नटांच्या रंगीबेरंगी वेशभूषा, रंगभूषा, त्यांची चिलखते, टोप, आयुधे अशा मंचवस्तूंनी युक्त अशी विष्णुदासांची नाट्यकृती सर्वांनाच फार आवडली. म्हणून या नाटकाचे जनतेला बघता येण्यासाठी अजून काही प्रयोग व्हावेत अशी राजेसाहेबांनी इच्छा प्रदर्शित केली. म्हणून मराठी मातीतल्या ह्या पहिल्या आख्यानाचे अनेक प्रयोग ही झालेत. राजेसाहेबांनी विष्णुदासांना राजदरबारात नाटक करण्याची रीतसर पगारी नोकरीच दिली.
विष्णुदासांनी रचलेल्या नाटकात भागवत मेळ्याच्या पूर्वरंगातील काही घटक आणि दशावताराच्या पूर्वरंगातील काही घटक ह्यांचे मिश्रण आढळते. ज्यात मंगलाचरण, देवतांचे – विशेषतः गणपती आणि सरस्वतीचे स्तवन, त्यांचा आशीर्वाद मागणे, देवतांनी तो देणे, एखादे विनोदी पात्र आणि सूत्रधार ह्यांच्या संवादातून आख्यानाची पूर्वकल्पना आणि शेवटी बाल-गोपाळ गंधर्वांचे सनृत्य गायन, इ. बाबींचा समावेश होता.
आख्यानात सूत्रधार निवेदन करायचा, गाणी म्हणायचा – त्याबरहुकूम पात्रे मंचावर येत जात असत आणि अभिनय करत असत. पात्रांनी स्वतः गाणं न म्हणता, गायल्या गेलेल्या शब्दावर फक्त अभिनय करायचा ही परंपरा दक्षिण भारतातल्या बहुतेक सर्व पारंपरिक प्रयोगकलांमध्ये आढळते. विष्णूदासी आख्यानातील सूत्रधार निवेदन आणि गायन करत असे. 
(ललित कला केंद्र, पुणे विद्यापीठाने १९९९ मध्ये पुनरुज्जीवित केलेल्या सीता स्वयंवर नाटकातील एक दृश्य.
दिग्दर्शक : प्रवीण भोळे, छायाचित्र : कुमार गोखले)
मराठी समाजमनाला नृत्यापेक्षा संगीत ही कला अधिक जवळची वाटते. भाव्यांनी देखिल करनाटकी नाटकाचे मराठीकरण करताना हाच विचार केला. मूळ भागवत मेळ्याच्या तुलनेत आपल्या नाटकातले नृत्याचे प्रमाण कमी केले आणि संगीताचे वाढवले. गाण्यांसाठी क्वचित ठिकाणी अभिजात रागांचा वापर केला. किर्तनी परंपरेतल्या प्रासादिक चाली, स्त्रीगीतांच्या सुगम चाली ह्यांचा उपयोग गाण्यांच्या चालींसाठी केला.
अशा प्रकारे दशावतार, यक्षगान, भागवत मेळे, किर्तन, स्त्री गीते, रागसंगीत ह्यांच्यातले काही घटक आणि स्वतःकडची कलाकुसर ह्या सर्वांच्या मिश्रणातून त्यांनी विष्णूदासी नाटक हा नाट्यसादरीकरणाचा नवा बाज तयार केला. हे नवीन पठडीचे नाटक प्रेक्षकांनाही खूप भावत होते.
राजेसाहेबांच्या आज्ञेवरून त्यानंतर विष्णूदास भाव्यांनी रामायण, महाभारतातील अनेक कथानकांवर आख्याने रचली आणि सादर देखील केली. ही नाटके पाहून राजेसाहेबांनी नाट्यमंडळीचा खर्च भागण्यासाठी विष्णूदासांच्या नावे थोडी जमीन देण्याचे कबूल केले. परंतु प्रत्यक्ष तसे घडण्याच्या आतच १८५१ मध्ये चिंतामणराव पटवर्धनांचे निधन झाले. चिंतामणरावांचे सुपूत्र तात्यासाहेब वयाने लहान असल्यामुळे तत्कालीन ब्रिटिश सरकारने संस्थानाचा कारभार पाहण्यासाठी आपला प्रतिनिधी नेमला.
राजदरबारातून होणारी आर्थिक मदत थांबल्याने विष्णूदासांच्या नाटक मंडळीवर कर्जाचा बोझा वाढत गेला. आणि म्हणून आपली नाट्य-मंडळी जगवण्यासाठी विष्णूदासांनी नाटकाचा दौरा काढायचा ठरवले.
सर्व तयारी करून १८५२ मध्ये सर्व कलावंत, पोशाख, मंचवस्तू घेवून काही नवीन नाटके रचून विष्णुदास भाव्यांच्या नाटक मंडळीने सांगलीहून तासगावचा पहिला दौरा केला, तेथे सात-आठ दिवस राहून रोज एक ह्याप्रमाणे नाटकांचे खेळ केले. व्यावसायिक मराठी नाटकाचा हा पहिला दौरा.
(पूर्वप्रसिद्धी दै. प्रभात)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अभिनयाच्या किमयाशाळा

  अभिनयाच्या किमयाशाळा १ . प्रयोगशाळा : एक अवकाश अवकाश म्हणजे जागा , जिथे काहीतरी सामावले जाते असे काहीतरी , म्हणजे प्रयोगशा...