शुक्रवार, २० नोव्हेंबर, २०२०

अभिनयाच्या किमयाशाळा

 अभिनयाच्या किमयाशाळा

. प्रयोगशाळा : एक अवकाश


अवकाश म्हणजे जागा, जिथे काहीतरी सामावले जाते असे काहीतरी, म्हणजे प्रयोगशाळा हा असा अवकाश जिथे प्रयोग सामावले जातात. आता प्रयोग म्हणजे काय? तर प्रयोग ह्या शब्दातला मुळ शब्दयोगम्हणजे जुळणी - एक गोष्ट दुसऱ्याला जोडून बघणे. त्यालाप्रहा अतीप्रमाण किंवा प्रगती दाखवणारा उपसर्ग जोडलेला आहे. थोडक्यात, विशिष्ट हेतू मनात ठेऊन दोन किंवा अधीक गोष्टींची वेगवेगळ्या शक्यतांनी जुळणी करून, त्यांची निरिक्षणे घेऊन त्यांतून अनुमाने आणि नित्कर्ष काढायसाठीची आवश्यक त्या साधनसामुग्रीने युक्त अशी जागा म्हणजे प्रयोगशाळा असे म्हणता येईल. अपयशाची क्षिती बाळगता अविरत प्रयत्न करण्यासाठीची जागा असा अर्थ त्यात अध्यारुत आहे. मराठी विश्वकोशात (पहिली आवृत्ती) प्रयोगशाळा ह्या शब्दाचीप्रयोगशाळा म्हणजे नियंत्रित परिस्थितीत काही विशिष्ट घटनांची गुणधर्मांची निरीक्षणे करण्यासाठी आवश्यक राशींची मापने करण्यासाठी जरूर ती साधने, उपकरणे सुविधा जेथे उपलब्ध करून दिलेल्या असतात आणि जेथे या निरीक्षणांची मापनांची छानी करून त्यावरून तर्कशुद्ध निष्कर्ष काढले जातात ते स्थळ होय’, अशी व्याख्या सांगितलेली आहे.

प्रयोगशाळांचे अनेक वेगवेगळे हेतू असू शकतात, त्याप्रमाणे प्रयोगशाळांचे स्वरूपही वेगवेगळे असू शकते. म्हणजे असे, की शाळा-महाविद्यालयांमध्ये ज्या प्रयोगशाळा असतात, त्यांचा हेतू विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रिय दृष्टीकोन निर्माण करणे हा असतो. म्हणून वेगवेगळ्या शक्यता आजमावून सिद्ध झालेले प्रयोग विद्यार्थ्यांना स्वतः करून पहाता यावे, अशा पद्धतीने त्यांची रचना असते. किंवा कोणतेही उद्योगधंदे किंवा कारखाने ह्यांना जोडून ज्या प्रयोगशाळा असतात, त्यांचे प्रामुख्याने दोन हेतू असतात. एक म्हणजे नव्या उत्पादनाच्या शक्यता चाचपडणे, आहे त्या उत्पादनात अजून वेगवेगळ्या पातळ्यांवर सुधारणा करणे किंवा दुसरे म्हणजे तयार झालेल्या उत्पादनाचा दर्जा तपासणे. म्हणून त्या प्रयोगशाळांची रचना त्या पद्धतीने केलेली असते. काही प्रयोगशाळा परिक्षण करणाऱ्या असतात. उदाहरणार्थ, आरोग्य क्षेत्रात रक्त, लघवी किंवा इतर जैवरासायनिक बाबींचे परिक्षण केले जाते

ह्या सर्वापेक्षा वेगळ्या अशा काही प्रयोगशाळा असतात, जिथे शुद्ध विज्ञान क्षेत्रातले मूलभूत आणि मूलगामी संशोधन केले जाते. इथे प्रयोगांना जोडून संशोधन हा शब्द येतो. प्रयोग ह्या शब्दात वेगवेगळ्या शक्यता आजमावण्यांच्या बहुविध मार्गांविषयी सुचवलेले असते तर संशोधन ह्या शब्दात कुठल्यातरी नित्कर्षावर येणे, ही गोष्ट असते. अर्थात, इथे एक गोष्ट महत्त्वाची असते - प्रत्येक संशोधनाचा शेवट कशाचा तरी शोध लागण्यातच होतो असे काहीही नाही. विविष्ट पद्धतीने  विशिष्ट गोष्ट करून विशिष्ट गोष्ट साध्य करता येत नाही, हा देखील संशोधनाचा नित्कर्ष असू शकतो, हे लक्षात घ्यायला हवे.

सामान्यपणे विज्ञान विद्याशाखेच्या विविध उपशाखांमध्ये अशा प्रकारच्या विविध हेतूंनी युक्त अशा प्रयोगशाळा स्थापीत केलेल्या असल्याचे निदर्शनास येते. हल्लीच्या काळात मानवविज्ञान, समाजशास्त्र, भाषा ह्यांच्यादेखील प्रयोगशाळा सुरु झालेल्या असल्याचे दिसून येते. पण कलांच्या बाबतीत, विशेषतः संगीत, नृत्य, नाटक अशा कलांच्या बाबतीत प्रयोगशाळा हा अवकाश संभवू शकतो का?


. कला? शास्त्र? की कलेचे शास्त्र?


इंग्रजीतल्यासायन्स’ (किंवा खरे तर लॅटीनमधल्यासायन्शिया’) ह्या शब्दावरून मराठीतविज्ञानआणिशास्त्रअसे दोन शब्द मराठीत आलेले आहेत. यातल्या विज्ञान शब्दातज्ञम्हणजे जाणणे, हा मुळ शब्द आहे. जे जाणले जाते तेज्ञानआणि ज्ञानाची नियमबद्ध सुव्यवस्थित पद्धतीने मांडणी म्हणजेविज्ञान’. ‘शास्त्रशब्दात शास् आहे, म्हणजे आपल्याला जे माहित आहे त्यावरून दुसऱ्याला मार्गदर्शन, उपदेश करायच्या गोष्टी आणि त्या गोष्टींचा संग्रह म्हणजे शास्त्र. विज्ञानाने शोधलेले सत्य हे व्यक्ती, स्थळ, काळ, परिस्थिती-निरपेक्ष असते. ते कोणालाही कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही काळात योग्य ती साधने वापरून तपासून पाहता येते, त्याची प्रचीती घेता येते, असे विज्ञानाच्या बाबतीत म्हणता येते. एका अर्थाने विज्ञानात कुठल्यातरी गोष्टींची व्यवच्छेदक लक्षणे सांगीतलेली असतात, तर बहुतेक कला ह्या स्वभावतः वादग्रस्त अशा संकल्पना असतात, ज्यांची एकच एक व्याख्या करता येत नाही, त्यांच्या स्वरूपाविषयी अनेक वेगवेगळे मतप्रवाह असू शकतात आणि ते सगळेच ग्राह्य असू शकतात. म्हणजे कलांच्या बाबतीत आपल्याला असे म्हणता येईल, की कधीतरी कोणीतरी काहीतरी विशिष्ट पद्धतींनी गोष्टी करून पाहिल्या असतील. त्यातल्या काही फसल्या असे त्यांना वाटले असेल, त्या सोडून दिल्या असतील. काही जमल्या असे वाटले असेल, त्यांची मनातल्या मनात नोंद करून ठेवली असेल. त्या गोष्टी पुन्हा करताना, जमलेल्याची रीत त्यांनी अनुसरली असेल, त्यातून अजून काही गोष्टी लक्षात आल्या असतील आणि नोंदींमध्ये भर पडत गेली असेल. आता ह्या गोष्टींचे एकाने दुसऱ्याला प्रशिक्षण देताना अर्थातच आपल्या मनातल्या मनात नोंदवलेल्या गोष्टींच्या आधारेच ते दिलेले असेल. मुद्दा असा, की ज्या कलांमध्ये प्रशिक्षणाची परंपरा आहे, त्यांचे शास्त्र (मार्गदर्शन करायच्या गोष्टींचा संग्रह) असू शकते, विज्ञान नाही. जरी एकाच सायन्स शब्दावरून हे दोन्ही शब्द आलेले असले तरी मराठीत त्याच्या अर्थच्छटा भिन्न असल्याने कलांच्या बाबतीत शास्त्र हा शब्द आपण जितक्या सहजपणे वापरू शकतो, तसा विज्ञान हा शब्द वापरता येणार नाही. आणि प्रयोग हा शब्द शास्त्र परंपरेपेक्षा विज्ञानक्षेत्राच्या जवळ जाणारा असल्याने प्रयोगशाळा ह्या विज्ञानाच्या क्षेत्रात अधिक संभवू शकतात. असे आपण म्हणू शकतो

इसवी सनापूर्वी तिसऱ्या-चौथ्या शतकापासून हेलिनिस्टीक कालखंड सुरु झाला, असे मानतात. ह्या संस्कृतीत इजीप्तमधल्या अॅलेक्झान्ड्रीया येथे किमयाकर्माची सुरुवात झाली असे मानले जाते. इतर धातूंपासून किंवा चक्क मातीपासून सोने बनवण्याच्या कारागिरीलाअलकेमीअसे नाव मिळाले, तेच म्हणजे मराठीत किमया आणि ते करणारे ते किमयागार. ह्या किमयागारांनी अनेक वेगवेगळ्या प्रक्रिया म्हणजेच किमया आजमावून पाहिल्या. रसायनशास्त्र अस्तित्वात येण्यापूर्वी अलकेमी हाच शब्द प्रचलीत होता, नंतर मात्र त्यातला अल हा उपसर्ग गळून पडला. तर अशा प्रकारे प्रयोगशाळांचा उगम इसवीसनापूर्वीच झालेला होता, असे म्हणता येईल. इसवीसनानंतरच्या बाराव्या शतकानंतर निसर्ग, खगोल, गणित अशा अनेक ज्ञानशाखांमध्ये प्रयोगशाळा निर्माण झाल्या. विज्ञानाच्या जोडीला तंत्रज्ञानाचीदेखील वाढ होऊन ह्या काळात अनेक नवनवीन शोध लागले.
 

. रंगभूमीच्या प्रयोगशाळा


भारतीय कला परंपरांना शास्त्राचे अधिष्ठान आहे. ह्या कलांच्या बाबतीत संगीत रत्नाकर, अभिनयदर्पण, नाट्यशास्त्र अशा पद्धतींचे शास्त्रविचार भारतीय परंपरेत निर्माण झालेले आहेत. आणि हे शास्त्रविचार ग्रथीत झालेले असल्यामुळे विशेषतः भारतीय संगीत आणि नृत्य परंपरादेखील ग्रथीत म्हणजे शास्त्रविचारांमध्ये बांधलेल्या अशा झाल्या असे सर्वसाधारपणे म्हणता येईल. त्या तुलनेत पाश्चिमात्य रंगभूमीचे स्वरूप मात्र प्रवाही होते आणि ग्रीक, रोमन, मध्ययुगीन, एलिझाबेथीय किंवा इतालिय देश-कालांतल्या रंगभूमी कलाप्रकारात तेथील भूप्रदेश, राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक परीस्थितीनुसार स्पष्टपणे लक्षात येतील एवढ्या मोठ्या प्रमाणावर बदल झालेले असल्याने कलाप्रकार म्हणून रंगभूमी जरी एकच असली तरी प्रत्येक ठिकाणच्या, प्रत्येक काळातल्या रंगभूमीच्या स्वरूपवैशिष्ट्यांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणावर वैविध्य दिसून येते. सहाजीकच पाश्चिमात्य रंगभूमीच्या बाबतीत विशिष्ट शास्त्र निर्माण झाले, असे विधान करता येऊ शकत नाही. परंतु गेल्या शंभर-सव्वाशे वर्षांमध्ये मात्र रंगभूमी ह्या कलाप्रकाराच्या क्षेत्रातही काही प्रयोगशाळा जन्माला आल्या. वैज्ञानिक प्रयोगशाळांप्रमाणेच ह्या प्रयोगशाळांमध्ये चालणाऱ्या प्रयोगांमागे काही विशिष्ट गृहितके होती, वेगवेगळ्या शक्यता आजमावून पहायचे अविरत प्रयत्न होते, निरिक्षणे होती, अनुमाने होती. कोणत्याच पातळ्यांवर वैज्ञानिक प्रयोगशाळांपेक्षा ह्या प्रयोगशाळा मागे नव्हत्या. परंतु मुळातच विज्ञान आणि कला ह्यांच्या स्वरूपातच फरक असल्यानेरंगभूमी प्रयोगशाळाही अनेकार्थ शक्यता असलेली एक गुंतागुंतीची संकल्पना बनलेली आहे.

प्रबोधनयुगात, म्हणजे साधरणतः तेराव्या-चौदाव्या शतकात मुद्रणतंत्रांचा शोध लागला. तत्कालीन साहित्यासोबत प्राचीन साहित्यदेखील छापले गेले आणि त्याचा प्रसार झाला. आणि मग प्राचीन साहित्यावरुन प्रेरित असे तत्कालीन साहित्य निर्माण होऊ लागले. ह्या प्राचीन-प्रेरीत तत्कालीन साहित्याला नव-अभिजातवाद हे नाव मिळाले. नवअभिजातवादात किमयेचा पुनर्जन्म झाला. आणि विज्ञानाच्या क्षेत्रात प्रयोगशाळा निर्माण झाल्या, तर दृककलेच्या क्षेत्रात स्टुडिओ जन्माला आले. ह्या स्टुडिओजमध्ये चित्रकार, शिल्पकार आपापली कलानिर्मीती करू लागले. कलानिर्मितीचा विविध साधनांनी युक्त असा अवकाश उपलब्ध झाल्याने केवळ पैसे घेऊन सांगीतलेले काम पूर्ण करण्याव्यतिरिक्त हे कलावंत त्या जागेत आशय-विषय, रेखाटन, रंगलेपनाच्या विविध शक्यता आजमावून पाहू लागले. अशा प्रकारे स्टुडियोच्या रूपाने कलेच्या प्रांगणात प्रयोगशाळा निर्माण झाल्या.

साधरणतः नाटक किंवा रंगभूमी ह्या शब्दांना जोडून जेव्हा प्रयोग हा शब्द येतो, तेव्हा तो दोन पद्धतींनीं व्यक्त होतो - एकतर नाटकाचा प्रयोग म्हणजे खेळ किंवा सादरीकरण ह्या अर्थाने आणि दुसरे म्हणजे प्रायोगिक नाटक किंवा रंगभूमी. ‘आशय-अभिव्यक्ती, शब्दसंहिता वा सादरीकरणात जी प्रयोग करू पाहते ती प्रायोगिक रंगभूमी’, अशी प्रायोगिक रंगभूमीची सोपी-सरळ व्याख्या करता येऊ शकते. काही लोक प्रायेगिक रंगभूमीलाच रंगभूमीची प्रयोगशाळा असे मानतात. अर्थात, असे केल्याने ते प्रायोगिक रंगभूमीचे रंगभूमीचा एक स्वतंत्र प्रकार म्हणून अस्तित्व नाकारतात आणि मुख्य धारा रंगभूमीच्या विकासासाठी आवश्यक असे दुय्यम स्थान प्रायोगिक रंगभूमीला देतात, ते सर्वार्थाने चुकीचे आहे

रंगभूमीच्या आधुनिक काळात म्हणजे साधारणपणे विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ज्या नाट्यशैली आकाराला आल्या त्यांच्यात नाटकाचे संघ आणि नाट्यप्रशिक्षण ह्या दोन बाबी समान होत्या. नाट्यसंघ ही नाट्यसंस्थेपेक्षा काहीशी वेगळी अशी संकल्पना आहे. नाट्यसंस्थांची उद्दिष्टे नाटकांची निर्मिती करणे आणि नंतर त्यांचे प्रयोग करत राहणे ही असतात. नाट्यसंघांमध्ये मात्र संघातील सर्व नटांनी दिवसातील विशिष्ट कालावधीसाठी एकत्र राहणे, सर्वांनी मिळून कोणताही विशिष्ट नाट्यनिर्मिती डोळ्यांपुढे ठेवता एकत्र काही स्वाध्याय करणे, कार्यशाळांमध्ये भाग घेणे, स्वतःला सतत प्रशिक्षित करत राहणे ह्या जास्तीच्या कृती असतात. प्रशिक्षण हे दोन पातळ्यांवरचे असू शकते, नाट्यव्यवसायात प्रवेश करण्यासाठी विशिष्ट कालावधीचे विद्यापीठ पातळीवरील प्रशिक्षण घेणे आणि दुसरे म्हणजे नट म्हणून आपली सामग्री, आपले माध्यम अभिव्यक्तीक्षम ठेवण्यासाठीचे निरंतर प्रशिक्षण. नाट्यसंघात्मक कार्य आणि निरंतर प्रशिक्षण ह्या दोन्ही गोष्टी नाटकाच्या प्रयोगशाळा हा अवकाश सिद्ध करतात

. अाद्य प्रयोगशाळा


प्रत्येक काळातील आणि प्रत्येक ठिकाणचे नाटक जसे वेगवेगळे, तसेच त्या त्या काळातील आणि त्या त्या ठिकाणच्या नाटकाच्या प्रयोगशाळा देखील वेगवेगळ्या असणारच. किंबहुना जिथे नाटक आहे तिथे त्याची प्रयोगशाळा असायलाच हवी असाही काही नियम नाही. त्यामुळे नाटकाची प्रयोगशाळा हा कोणता नाट्यप्रकार किंवा कोणते नाट्यकुल (theatre genre) नव्हे. त्यात विविध प्रकारच्या नाटकांचा समावेश असू शकतो. राजकीय संघर्ष किंवा समाजातील समस्या मांडणाऱ्या चळवळी, नट आणि त्याची कला याबाबतचे मूलभूत संशोधन करणाऱ्या, नाटक ही एक प्रयोगकला म्हणून तिचे विविध पैलू शोधणाऱ्या अशा विविध नाटकांचा समावेश असू शकतो. महत्त्वाचे म्हणजे प्रयोगशाळा म्हणजे अशी जागा असते जिथे केवळ नाटकाचा प्रयोग म्हणजेच सादरीकरण हे अंतिम उद्दिष्ट मानता काही अध्यापन-पद्धती राबवल्या जातात किंवा संशोधन केले जाते. प्रयोगशाळांमध्ये सादरीकरण करण्यासाठी नाट्यनिर्मिती करणे हे ध्येय नसते तर ते त्यांचे उपउपज (byproduct) असते

नाटकांच्या इतिहासाकडे नजर टाकली असता, या प्रकारच्या नाटकाच्या प्रयोगशाळा ही आधुनिक संकल्पना आहे असे लक्षात येते. ‘मास्को आर्ट थिएटरया नाट्यनिर्मिती करणाऱ्या संस्थेच्या छत्राखालीथिएट्रिकल स्टुडिओस्थापन करून तिथे नटांच्या कार्यशाळा घेणारा स्तानिस्लावस्की हा या संकल्पनेचा प्रणेता आहे, असे म्हणता येईल. त्याने १९०५ मध्ये स्थापन केलेल्या आपल्या स्टुडिओमध्ये बराच मोठा भाग अभिनय प्रशिक्षणाचा होता. या प्रशिक्षणात शरीर आणि भाषण यासंबंधीच्या मूलभूत व्यायामाचा, सरावांचा तसेच काही विशेष स्वाध्याय (exercise) आणि उत्स्फूर्ताविष्कार (improvisations) यांचा समावेश होता. या प्रशिक्षणामधून नटाची अंतर्गत तसेच बाह्य तयारी करून घेतली जात असे. ज्ञानेंद्रियांची ग्रहणशक्ती तिक्ष्ण करणे, कल्पनाशक्ती वाढीस लावणे, एकमेकांमधील देवाण-घेवाण वाढवणे, ऊर्जेचे किरण, ध्यानाची वलये यांमार्फत स्वशक्तीची जाणीव वाढवणे, इत्यादी प्रशिक्षणाची उद्दिष्टे होती. शिवाय स्टुडिओ म्हणजे नाट्यसंघ होता. लहान-मोठा असा भेद करता सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची तिथली परंपरा होती. नाटकातल्या नटांमध्ये सुसंबंध असणे आवश्यक असते, कारण अभिनय ही प्रक्रिया एवढी वैयक्तिक आहे तेवढीच सांघीक आहे, असे त्याचे म्हणणे होते.

स्तानिस्लाव्हस्कीने मॉस्को आर्ट थिएटर अंतर्गत स्थापन केलेल्या थिएट्रीकल स्टुडिओमध्ये प्रशिक्षण केंद्रस्थानी होते. स्तानिस्लाव्हस्कीची अभिनयाची पद्धत जरी वास्तववादाच्या जवळ जाणारी असली तर अभिनेत्यांच्या प्रशिक्षणात शारीरिक व्यायाम, तलवारीबाजी, कसरती आणि गायन यांचा समावेश होता. (छायाचित्र सौजन्य ओडिन अर्काइव्हज)


स्तानिस्लावस्कीची प्रयोगशाळेची संकल्पना पुढे नेणारा मेयेरहोल्ड हा मॉस्को आर्ट थिएटरचाच माजी नट होता. स्तानिस्लाव्हस्कीने आपला थिएट्रिकल स्टुडिओ संचलित करण्यासाठी त्याला बोलावले होते. पण नंतर मेयेरहोल्डने स्वतःचेच काही स्टुडिओ सुरू केले

मेयेरहोल्डने अभिनेत्यांच्या शरीर हालचालींमध्ये नेमकेपणा आणि अचुकता येण्यासाठी जैवयांत्रिक स्वाध्यायांची निर्मिती केली.  (छायाचित्र सौजन्य ओडिन अर्काइव्हज)


१९१७ च्या ऑक्टोबर क्रांतीनंतर रशियात सर्वच स्तरांमध्ये आमूलाग्र बदल होऊ लागले होते. लोकांना शिक्षित करणे आणि समाजवादी विचारांची जाणीव लोकांपर्यंत पोहोचवणे ही रंगभूमीची सामाजिक जबाबदारी आहे, असे मेयेरहोल्डला वाटले आणि रंगभूमीच्या माध्यमातदेखील सोव्हिएत समाजात होणाऱ्या बदलांसारखे बदल करायचे त्यांने ठरवले. त्या काळात सोव्हिएत उद्योगधंद्यांमध्ये टेलरवाद (Taylorism) आणि मानसशास्त्र शिक्षणपद्धतीत प्रतिक्षिप्ततावाद (reflexology) या दोन कार्यपद्धतींची विशेष चलती होती. त्याच्यावरच आधारलेली अभिनय-प्रशिक्षणाची नवी शास्त्रशुद्ध प्रणाली मेयेरहोल्डने सुरू केली. त्याने शारीरिक हालचाली आणि आवाजाचे प्रशिक्षण देणारा स्टुडिओ सुरू केला. त्यात तो कॉमेदिआ देलार्तेसारख्या रंगभूमीच्या परंपरेतील अगदी मूलभूत घटकांचे प्रशिक्षण द्यायचा. शारीरिक कसरतींच्या प्रशिक्षणासोबतच मेयेरहोल्डच्या नटांना शरीररचना शास्त्र आणि शरीरक्रियाशास्त्राचादेखील अभ्यास करावा लागत असे. सैद्धान्तिक काटेकोरपणा आणि शारीरिक कष्ट यातूनच त्याचा जैवयांत्रिकीचा (biomechanics) सिद्धांत आकाराला आला.


. ग्रोटोव्स्की आणि बार्बा


येर्झी ग्रोटोव्स्की हा पोलंडमधला नाट्यदिग्दर्शक, रंगभूमी संशोधक आणि नाट्यतत्त्वचिंतक होता. त्याने रंगमंचावरच्या अभिनयापेक्षा एकूणच अभिनय प्रक्रियेचे सैद्धांतिकरण करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या संस्थेचे नावच मुळात प्रयोगशाळा रंगभूमी (laboratory theatre) असे होते

ग्रोटोव्स्कीचे मुख्य ध्येय अभिनेत्याने विकसित आणि परिपक्व होणे हे होते. नटांना वेगवेगळी कसबे शिकवणे त्याला मान्य नव्हते. नटांना सहजपणे आपल्या शारीरिक क्षमतांच्या पलीकडे जाता यावे या पद्धतीचे वातावरण उपलब्ध करून देणे हे त्याच्या प्रयोगशाळा रंगभूमीचे उद्दिष्ट होते. कोणताही भिडभाड बाळगता नटाला आपल्या स्वतःला प्रेक्षकांना पूर्णपणे समर्पित करता यायला हवे असे ग्रोटोव्स्की सुचवतो. आपल्या हातवाऱ्यांमधून, शरीरस्थितीतून, वृत्तीतून, शारीरिक अभिव्यक्तीमधून नटांनी आपल्या स्वत्त्वाचे पापुद्रे उलगडून दाखवायला हवेत, असे त्याला वाटत असल्यामुळे त्याच्या प्रयोगशाळा रंगभूमीचा भर हा प्रशिक्षणावर होता. प्रशिक्षण हे नव्या गोष्टी शिकण्यासाठी नसून आपल्यातल्या नको असलेल्या गोष्टी काढून टाकण्यासाठी त्याने वापरले. स्वतःला पारदर्शकपणे, पूर्णपणे अभीव्यक्त करण्याच्या आड जे जे शारीरिक अडथळे येतात, मर्यादा येतात, त्या दूर करण्यासाठी प्रत्येक नटासाठी वेगवेगळ्या अभ्यासक्रमाची प्रयोगशाळा रंगभूमीत योजना होती

आपल्या हातवाऱ्यांमधूनशरीरस्थितीतूनवृत्तीतूनशारीरिक अभिव्यक्तीमधून नटांनी आपल्या स्वत्त्वाचे पापुद्रे उलगडून दाखवायला हवेत असे ग्रोटोव्स्कीला वाटत असल्यामुळे त्याच्या प्रयोगशाळा रंगभूमीचा भर हा प्रशिक्षणावर होता. द कॉन्स्टन्ट प्रिन्स या नाटकात रायझार्ड शिस्लॅक. (छायाचित्र सौजन्य ओडिन अर्काइव्हज)


प्रयोगशाळा रंगभूमीमधील प्रशिक्षण हे नटाच्या शारीरिकतेच्या सर्व शक्यता आजमावून पाहणारे होते. तिथे ग्रोटोव्स्की आणि त्याच्या सहकाऱ्यांनी स्वाध्यायांची एक साखळी विकसित केली होती. तिला त्यांनीशारीरिक क्लेषांचे स्वाध्यायअसे नाव दिले होते. त्यात विविध योगासने, कोलांट्या-उड्या, लांब-उड्या, इत्यादींचा समावेश होता. ग्रोटोव्स्कीच्या मते, ‘नटाचे प्रशिक्षण केवळ मंचावर अभिनय करण्यासाठी नसावे. स्वतःच्या शरीरातल्या ऊर्जेचे प्रवाह ओळखण्यासाठी, शरीराची अंतर्बाह्य ओळख पटवून देणारे असावे’. 

ग्रोटोव्स्कीच्या प्रयोगशाळा रंगभूमीची परंपरा पुढे चालू ठेवणारा त्याचा पाईक म्हणजे डेन्मार्कचा युजेनिओ बार्बा होय. त्याच्या संस्थेचे नाव ओडिन तिएत्रेत. ओडिन ही केवळ नाट्यनिर्मिती करणारी संस्था नव्हे. तिच्या छत्राखाली यूएसटी (युरोप आणि आशिया खंडांमधील रंगभूमींच्या परस्परसंबंधांचा अभ्यास करणारे विद्यापीठ), इस्टा (आंतरराष्ट्रीय रंगभूमी मानवशास्त्र विद्यालय), सीएलटीएस (रंगभूमी प्रयोगशाळा अभ्यास केंद्र), ओडीन वीक (ओडिन परंपरेच्या प्रशिक्षणाची तोंडओळख करून देणारा वार्षिक कार्यक्रम), फेस्ट्युग (डेन्मार्कमधील होल्स्टेब्रो शहराचा द्वैवार्षिक उत्सव), ट्रान्झिट (नाटकातील स्त्रियांसाठीची कार्यशाळा), बार्टर (समाजातील उपेक्षित वर्गांसाठी सादरीकरणाच्या देवाण-घेवाणीचा कार्यक्रम), विविध चर्चासत्रे, कार्यशाळा, चित्रपटनिर्मिती, पुस्तक प्रकाशन असे विविध उपक्रम पार पाडले जातात

ओडिनमध्ये अभिनेत्यांच्या स्वप्रशिक्षणावर भर आहे. तेथील नट स्वतःच स्वतःचा प्रशिक्षणाचा ढाचा आखतात आणि स्वतःला प्रशिक्षीत करतात. इबेन नागेल रास्मुसेन ही अभिनेत्री आपली स्वयंप्रशिक्षणाची रीत उलगडून दाखवताना. (छायाचित्र टॉर्बेन हूस)


आपली विशिष्ट प्रशिक्षण पद्धती हे ओडिनचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. संस्थेच्या वैशिष्ट्यपूर्ण तालीम प्रक्रियेच्या आणि नाट्यनिर्मितीच्यामागे प्रशिक्षण हा एक महत्त्वाचा घटक आहे. केवळ प्रशिक्षम नव्हे तर निरंतर प्रशिक्षण हे ओडिनचे वैशिष्ट्य आहे. या प्रशिक्षणात नवीन तंत्र शिकायला विरोध आहे. याचा अर्थ असा की, प्रशिक्षणाच्या माध्यमातून अप्रत्यक्षरीत्या नवनवीन शारीरिक कौशल्ये विकसित करण्याचा तो भाग आहे. ओडीनचे नट बैजींग ऑपेराच्या नटांप्रमाणे कसरतीचे शिक्षण घेत नाहीत, भारतीय शास्त्रीय नृत्यातील चिन्हभाषा शिकत नाहीत, ऑपेरा गायकाप्रमाणे अतिउच्च स्वरातले गाणे शिकत नाहीत. पण ह्या सगळ्या गोष्टींची मूलतत्त्वे मात्र शिकतात, शिवाय ह्या गोष्टी कशा शिकल्या जातात हे ही शिकतात. कोणताही विशिष्ट अभ्यासक्रम स्वीकारलेला नसल्यामुळे ओडिनची शिक्षणपद्धती तत्त्वकेंद्री आणि सर्वसमावेशक झालेली आहे. कोणत्याही पद्धतीच्या अनुकरणाला आणि सजावटीला त्यात वाव नाही. शरीरातली ऊर्जा कशी वापरावी, तोल कसा साधावा, प्रेरणेच्या सहाय्याने कृती कशी निर्माण करावी अशा मूलभूत तत्त्वांचा त्यात समावेश असतो. या मूलभूत तत्त्वांना चिटकून राहून नवीन गोष्टी शोधणे आणि जमिनीवर पडता तोल सांभाळण्याची कृती करणे, मोकळ्या मैदानात आवाजाचा योग्य वापर करणे अशा समस्यांमधून मार्ग काढण्यासाठी त्यांना नवीन वाटा शोधाव्या लागतात. अशाप्रकारे त्यांच्या प्रशिक्षणाच्या भात्यात नवीन अभ्यासांची, स्वाध्यायांची भर पडत जाते आणि प्रशिक्षण हेच संशोधन ठरते.

आपले सिद्धान्त आणि त्याच्या उपयोजनाचे काम ओडिनमध्ये युजेनिओ बार्बा गेली चाळीस वर्ष करत आहे. या परंपरेला तोछोटी परंपराम्हणतो. ओडिनमध्ये आज नऊ नट कार्यरत आहेत. निरंतर प्रशिक्षण आणि मध्येमध्ये येणारे नाट्यनिर्मिती आणि सादरीकरणाचे थांबे यांच्यामार्फत ही छोटी परंपरा १९६४ पासून अखंडितपणे पुढे चालू आहे


. किमयाशाळा


गेल्या काही वर्षांमध्ये युरोप आणि अमेरिकेत नाटकांच्या अशा अनेक प्रयोगशाळा आकाराला आल्या, त्यातल्या महत्त्वाच्या काही म्हणजे : जॅक कॉप्युचीव्हीए कोलंबीए’, एव्हजिनी वाख्तनगव्हचीथर्ड स्टुडिओ’, पीटर ब्रूकचीसीआयटीआर’, ज्युलिअन बेक आणि ज्युडिथ मेलिना यांचीलिव्हिंग थिएटर’, जोन लिटलवूडचीथिएटर वर्कशॉप’, एटिनी दक्रूचीमाइम स्कूलआणि अरिआन मुश्किनचीतिएत्र दू सोलाय’. 

 प्राचीन भारतातील संस्कृत नाटकांच्या निर्मितीविषयीची माहितीनाट्यशास्त्रया ग्रंथातून मिळते. अनेक संकेतांनी युक्त अशा प्राचीन संस्कृत नाटकातल्या अभिनयासाठी नट हा प्रशिक्षित असावा हे तर उघडच आहे. पण ह्याखेरिजही अनेक व्यायाम प्रकार ग्रंथामध्ये सांगितलेले आहेत. यावरून त्या काळात प्रशिक्षण हे केवळ नाट्य कारकीर्द सुरू होण्यापर्यंतचे नसून सततचे होते हे लक्षात येते. पण तरीही हे कार्य प्रयोगशाळा पद्धतीचे होते असे मात्र म्हणता येणार नाही

स्वातंत्र्योत्तर भारतीय रंगभूमीवर मात्र विविध प्रांतात नाटकांच्या प्रयोगशाळा आकाराला आल्याचे दिसतेयासंदर्भात कन्हाईलाल, रतन थियम, बन्सी कौल, कोवलम नारायण पण्णिकर तसेच वीणापाणी चावला यांचे कार्य उल्लेखनीय ठरते

विविध शक्यता आजमावून पाहण्यासाठी मंचाशिवायचा असा वेगळा अवकाश, वेगळी हक्काची जागा उपलब्ध असणे, ही नाटकाच्या प्रयोगशाळेची एक महत्त्वाची पूर्वअट आहे. याप्रमाणेच काही समान उद्दिष्टांनी एकत्र येऊन नटांचा एक संघ बनणे, सगळ्यांमध्ये विशिष्ट आणि समान मुल्ये असणे, आपल्या कलाद्रव्याचे संशोधन करणे आणि अभिनयाची एक विशिष्ट अशी प्रशिक्षण पद्धती विकसीत होणे, ही सगळी नाट्यअभिनयाच्या प्रयोगशाळांची महत्त्वाची वैशिष्ट्ये असतात.

अलकेमी अर्थात किमया या शब्दाला जसा ऐतेहासिक संदर्भ आहे, तसाच त्याला मराठी भाषेत एक विशिष्ट अर्थ आहे. शक्य कोटीतील परंतु अशक्य असलेली अशी गोष्ट शक्य करून दाखवणे म्हणजे किमया करणे होय. अशा गोष्टी जो करतो तो किमयागार. आणि जिथे या गोष्टी घडतात ती जागा म्हणजे किमयाशाळा. या पृथ्वीवर जेव्हापासून माणूस आहे तेव्हापासून कुठल्या ना कुठल्या स्वरूपात नाटक आहेच. स्थळा-काळानुसार नाटकाच्या स्वरूपात आपसूक काही बदल होत गेले तरी, काही गृहीतके मांडून केवळ सादरीकरणाचा विचार करतादेखील नाटकाच्या स्वरूपात बदल घडवून आणणाऱ्या या प्रयोगशाळा म्हणजे एका अर्थाने अभिनयाच्या किमयाशाळाच होत

——————————————————————————————————

संदर्भ-सूची

Chemi, Tatiana. A Theatre Laboratory Approach to Pedagogy and Creativity: Odin Teatret and Group Learning. Cham: Palgrave Macmillan, 2018.

Schino, Mirella. Alchemists of the Stage: Theatre Laboratories in Europe. Holstebro/Malta/Wroclaw: Routledge Icarus Publishing Enterprise, 2009.

Watson, Ian. Towards a Third Theatre: Eugenio Barba and the Odin Teatret. London, New York: Routledge, 1995

भोळे, प्रवीण. अभिनय-शैली : तुलनात्मक अभ्यास. (अप्रकाशित पीएच. डी. प्रबंध). पुणे विद्यापीठ, पुणे, भारत. २००७



प्रवीण भोळे
प्राध्यापक आणि विभागप्रमुख
ललित कला केंद्र, गुरुकुल
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ४११ ००७

praveen@unipune.ac.in

(पूर्वप्रसिद्धी : संवाद दिवाळी २०२०)

अभिनयाच्या किमयाशाळा

  अभिनयाच्या किमयाशाळा १ . प्रयोगशाळा : एक अवकाश अवकाश म्हणजे जागा , जिथे काहीतरी सामावले जाते असे काहीतरी , म्हणजे प्रयोगशा...