मराठी संगीत रंगभूमीची पूर्वपीठिका
१८८० ते १९३० ही पन्नास वर्षे म्हणजे मराठी संगीत नाटकाचा सुवर्णकाळ, ह्या काळात मराठी संगीत नाटक उगम पावले आणि विकसीत झाले. पण हे संगीत नाटक नेमके उगम पावले तरी कसे ही फारच मनोरंजक हकिकत आहे, त्या विषयी आपण बोलूच, पण मराठी संगीत नाटक उगम पावण्यासाठी अशी त्या काळात परिस्थिती नेमकी कशी होती त्याचा आढावा म्हणजेच संगीत नाटकाची पूर्वपीठिका आता बघू या.
एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच ब्रिटिशांनी त्याच्या सत्तेचा पाश आवळायला सुरुवात केली होती. १८१७ मध्ये पेशव्यांनी पुणेही त्यांच्या ताब्यात दिले आणि इंग्रजांचा एकछत्री अंमल सुरू झाला. प्रशासन चालवण्यास उपयुक्त असणारे इंग्रजी जाणणारे कर्मचारी निर्माण करण्यासाठी १८५७ मध्ये ब्रिटिशांनी मुंबई विद्यापीठाची स्थापना केली.
विद्यापीठात शिकवण्यात आलेल्या इंग्रजी साहित्याद्वारे महाराष्ट्राला शेक्सपिअरचा परिचय झाला. त्याच्या सुखात्मिका, शोकात्मिका, त्याचे भाषावैभव, त्याच्या नाटकांतील विलक्षण व्यक्तिरेखा ह्यांचे नवे दालनच मराठी माणसांसमोर खुले झाले. ह्या नाटकांनी प्रभावित होऊन अनेकांनी त्यांचे मराठीत अनुवाद केले, काहींनी रुपांतरे केली, तर काहींनी त्यावर आधारित नवीन नाटके लिहिली. एकूण झाले काय तर विद्यापिठांत शिकणाऱ्या आणि न शिकणाऱ्या अशा सर्वांपर्यंतच शेक्सपिअर पोचला.
ह्याच काळात अनेक संस्कृत नाटकांची देखील मराठीत भाषांतरे झाली. संस्कृत नाट्यरचनेचा प्रभाव असलेली स्वतंत्र मराठी नाटके देखील लिहिली गेली. त्यांचे प्रयोग झाले नाहीत. पण विष्णूदासी पद्धतीच्या आख्यान नाटकांचेच प्रयोग प्रचलित होते.
विष्णूदास भाव्यांनी ज्या काळात सीतास्वयंवर हे नाटक रचले, त्या काळी मराठी प्रांतात लोकरंगभूमीचे विविध प्रकार दिसून येत होते. धार्मिक ग्रंथांची प्रवचनं, त्यातील कथानकांवर आधारित किर्तनं, कोकणाकडचा दशावतार, कानडी भाषेतलं यक्षगान, भागवतमेळे, वर्षभरातले विविध व्रतवैकल्ये, सण, समारंभ, बारसे, विवाह, अत्यंसंस्कार असे विविध विधी ह्यानं सगळं सांस्कृतिक वातावरण भरलेलं-भारलेलं होतं. काही धार्मिक प्रसंगी, विशेषतः दसऱ्याच्या दिवशी सोंग काढण्याची परंपरा अनेक ठिकाणी दिसून येते. इथे कथानक आणि संवाद हे घटक नसतात, पण व्यक्तिरेखा, वेषभूषा, थोडं संगीत, नाच हे नाटकातले घटक मात्र दिसून येतात. कथन परंपरेत पारायण – प्रवचन – किर्तन असे विविध टप्पे दिसून येतात. पारायणात वाचन असतं, प्रवचनाच वाचनासोबत थोडं समजावून सांगीतलं जातं, तर किर्तनात समजावून सांगणं एवढ्या मोठ्या प्रमाणावर असतं की त्यासाठी संगीत आणि अभिनय हे घटक वापरले जातात. किर्तनातील गेय काव्य आणि त्याचं गद्य निरूपण ह्यात विष्णूदासांच्या नाटकाचं मूळ आढळतं, शिवाय होनाजी बाळांच्या शाहिरी काव्याचा विष्णूदासांना परिचय होताच. त्यामुळे हे सगळे प्रभाव विष्णूदासी नाटकांवर दिसून येतात.
भारत त्या काळात एक ब्रिटिश वसाहत असल्यामुळे अनेक ब्रिटिश सैनिक अधिकारी भारतात रहात होते. त्यांच्या मनोरंजनासाठी तत्कालिन ब्रिटिश नाटक मंडळ्या भारतात येऊन प्रयोग सादर करत असत. त्यातील काही नाटके शेक्सपिअरची तर काही तत्कालीन ब्रिटिश नाटककारांची होती. त्यांची मंचनाची पद्धत मात्र शेक्सपिअरन कालीन नसून त्याच काळातली असल्यामुळे ही नाटके कमानी मंचाच्या पद्धतीची होती. ह्या नाटकांचे प्रयोग होण्याकरिता ब्रिटिशांनी भारतात काही कमानी-मंच नाटकघरे उभारली. ही नाटके पहायला ब्रिटिश अधीकाऱ्यांसोबतच प्रतिष्ठित धनिक तसेच ब्रिटिशांची चाकरी करणाऱ्या भारतीयांना आमंत्रण असे. अशा प्रकारे त्या काळात युरोपात ज्या पद्धतीने नाटक सादर होत असे, त्या पद्धतीचा परिचय महाराष्ट्रातील जनतेला झाला.
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात पश्चिम भारतात पारशी नाटकांचा उदय झाला. व्यापारी, उद्योजक पारशी समाज यांच्याकडून ह्या नाटकांना अर्थसहाय्य होत असल्यामुळे त्यांना पारशी नाटके असे म्हणत असत. गुजराथी तसेच हिंदुस्थानी भाषांमधून ती नाटके सादर होत असत. सादरीकरणाच्या पद्धतीवर युरोपीय प्रभाव होता, पण त्यांची कथानके मात्र भारतीय पुराणे, अरबी भाषेतील सुरस आणि चमत्कारीक कथा आणि शेक्सपिअरची नाटके ह्यांच्यावर आधारित अशी होती. ह्या नाटकांमधले संगीत आणि नृत्य हे एकोणिसाव्या शतकातल्या तवायफ परंपरेतील होते. पारशी नाटकांचे प्रयोग लाहोर, आग्रा, लखनौ तसेच मुंबई येथे होत असत. बहुतेक सर्व प्रयोग ब्रिटिशांनी बांधलेल्या कमानी-मंच पद्धतीच्या नाटकघरांमध्येच होत असत. कथानक, वेशभूषा आणि संगीत भारतीय परंपरेतील तर सादरीकरणाची आणि अभिनयाची पद्धत काहीशी पाश्चिमात्य असे विलक्षण मिश्रण पारशी नाटकात होते.
अशा प्रकारे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रात किर्तन, दशावतार, लळीत, भारूडासारख्या लोकपरंपरा, विष्णूदासी पद्धतीची आख्यान नाटके, शेक्सपिअरच्या नाट्य-संहिता, त्यांचे मराठी अनुवाद, रुपांतरे, संस्कृत नाटकांचे मराठी अऩुवाद, ब्रिटिश नाटक मंडळ्यांचे नाट्यप्रयोग, कमानी-मंच नाटकघरे, पारशी नाटके असे विविध प्रकार रंगभूमीवर नांदत होते. महाराष्ट्रात मराठी संगीत नाटक उगम पावले त्यामागे त्या काळात ही सर्व पार्श्वभूमी होती.
शतकानंतरची पहाट
१९३१ मध्ये महाराष्ट्रात बोलपटांचे आगमन झाले. तोपर्यंत मराठी नाटक लोकप्रियतेच्या शिखरावर होते, पण मुका चित्रपट जसा बोलायला लागला, तशी लोकांना नाटकापेक्षा त्याचीच गोडी जास्त वाटू लागली, नाटकघरांचे रुपांतर चित्रपटगृहांमध्ये झाले आणि मराठी नाटकाच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली.
१८४३ मध्ये केव्हातरी (५ नोव्हेंबर या दिवशी नव्हे) विष्णुदास भाव्यांनी सांगली येथे सीतास्वयंवर नाटकाचा पहिला प्रयोग सादर केला आणि तेव्हापासून मराठीतल्या नागर, व्यावसायीक नाटकाची परंपरा सुरू झाली. अर्थात काळानुसार आणि बाह्यप्रभावांनी प्रेरीत होऊन नाटकाचे स्वरूपही बदलत गेले. नाटकाची कला जोपासणाऱ्या, नाटकाचा धंदा करणाऱ्या, हौस म्हणून नाटक करणाऱ्या आणि नाटक पाहणाऱ्या अशा सर्वांनी एकत्र यावे, विचारांची, कल्पनांची देवाण-घेवाण करावी या हेतूने १९०५ मध्ये पहिले मराठी नाट्य संमेलन भरवण्यात आले होते. सुरूवातीच्या काळात त्यांना महाराष्ट्र नाटक संमेलन असे म्हणत असत, त्याला आजचे म्हणजे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन हे नाव त्यानंतर कितीतरी वर्षांनी मिळाले. तर १९३९ मध्ये नागपूर येथे भरलेल्या नाट्यसंमेलनात असे ठरवण्यात आले की, १९४३ मध्ये भाव्यांनी सादर केलेल्या सीतास्वयंवर नाटकाला शंभर वर्षे पूर्ण होतील, म्हणून मराठी नाटकांचा शतसांवत्सरिक उत्सव साजरा करावा. त्यानुसार १९४३ च्या नोव्हेंबर महिन्यात सांगली येथे नाट्यसंमेलन आणि मराठी रंगभूमी शतसांवत्सरिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले. सांगलीचे त्यावेळचे संस्थानिक चिंतामणराव पटवर्धन यांनी नाट्यविद्यामंदीर स्थापन करण्यासाठी गावातली जागा दिली होती. (१८४३ मध्ये भाव्यांना मराठीतून नाटक करण्याची कल्पना सुचविणारे संस्थानिक यांचेही नाव चिंतामणराव पटवर्धनच होते, या चिंतामणरावांचे ते आजोबा होते.) आज त्या जागेवर सांगलीत विष्णुदास भावे नाट्यमंदिर आहे, या जागेचा कोनशिला समारंभ दि. ५ नोव्हेंबर १९४३ रोजी पार पडला, आणि म्हणून या पुढे ५ नोव्हेंबर रोजी दरवर्षी मराठी रंगभूमी दिन पाळला जावा असा ठरावही नाट्य महोत्सवात करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी ५ नोव्हेंबर या दिवशी मराठी रंगभूमी दिन साजरा केला जातो. सांगली येथे भरलेल्या नाट्यमहोत्सवात गोविंद बल्लाळ देवल यांच्या संगीत शारदा या नाटकाचा प्रयोग पुन्हा एकदा सादर करण्यात आला. चिंतोबा गुरव या ज्येष्ठ अभिनेत्यांनी त्यात श्रीमंतांची भूमिका केली होती, तर इतर भुमिकांमध्ये गणपतराव बोडस, चिंतामणराव कोल्हटकर, केशवराव दाते, लोंढे, बालगंधंर्व, इ. सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय नट होते. मराठी रंगभूमीवरील ही एक अद्वितीय घटना होती. त्यानंतर महाराष्ट्रभर जवळवळ ७५ ठिकाणी शतसांवत्सरिक उत्सव साजरे झाले. त्यानंतर १९४४ मध्ये मुंबईत मुंबई मराठी साहित्य संघाने मरीन ड्राईव्हवर एक उघडे नाटकघर उभारून त्यात नाट्योत्सव साजरा केला. या नाट्योत्सवाने मराठी नाटकाला नवे चैतन्य मिळाले आणि बोलपटाने उतरणीला लागलेल्या मराठी नाटकाच्या धंद्याला नवे बाळसे मिळाले. बोलपटाच्या आकर्षणाने नाटकापासून दुरावलेला नाटकाचा प्रेक्षक परत एकदा नाटकघराकडे वळला आणि शंभर वर्षांची परंपरा लाभलेले नाटक पाहू लागला.
प्रवीण भोळे
प्राध्यापक आणि विभागप्रमुख
ललित कला केंद्र, गुरुकुल
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ४११ ००७
प्राध्यापक आणि विभागप्रमुख
ललित कला केंद्र, गुरुकुल
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ४११ ००७
praveen@unipune.ac
