मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०१६

तंजावरी नाटकांचे बेट



तंजावरी नाटकांचे बेट
मराठी नाटक जिथून उगम पावलं, त्या विविध लोककलांपासून ते आजपर्यंतच्या नाटकांपर्यंत बदलांची एक सलग रेषा दिसू शकते. त्या त्या काळातल्या लोकजीवनाच्या प्रभावाने नाटकांचे विषय बदलत गेले, नाट्यसादरीकरणाची पद्धत बदलत गेली म्हणून प्रत्येक काळातले नाटकही बदलत गेले. मागच्या नाटकांमधल्या काही गोष्टींचे अनुकरण करत, काही नाकारत तर काही गोष्टी नव्याने सामावत त्या त्या काळातले नाटक सिद्ध होत गेले. अशा प्रकारे नाटकाच्या इतिहासाचा एक अखंड प्रवाहच निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. पण इतिहास मोठा मनोरंजक असतो, त्यात काही प्रवाह मध्येच निर्माण होतात, काही आपल्या दिशा बदलतात, तर काही प्रवाह लुप्त देखील होतात.
मराठी नाटकांच्या बाबतीत एका महत्त्वाच्या प्रवाहाचा उल्लेख करायलाच पाहिजे. महाराष्ट्रापेक्षा लांब, तामिळनाडूमधील तंजावर येथे सतराव्या ते एकोणिसाव्या शतकात मराठीतून काही नाटके लिहिली गेली आणि सादरही झाली. त्यांना मराठी भाषेतील आद्य नाटके म्हणावी लागतील.
तंजावरातील भोसले घराण्यातील व्यक्तींनी मोठ्या प्रमाणावर नाट्यलेखन केलं. स्थानिक थेरूकुतू, भागवतमेळ्यासारख्या लोकनाटकांचा त्याच्या सादरीकरणावर बराच प्रभाव होता, तर लिखाण नाट्यशास्त्र परंपरेत उल्लेख केल्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न होता. नाटकांत नृत्य-संगीताचा वापर बऱ्याच मोठ्या प्रमाणात केला जात असे. संगीत वृंद गायन-वादन करीत असे, सूत्रधार हा गद्यात भाषण करीत असे तर नट मुख्यत्वेकरून गायल्या जाणाऱ्या पदांवर नृत्य करीत असत, एका अर्थाने ते नट कमी आणि नर्तक अधिक असत. त्या नाटकांनाही नृत्य-नाट्य म्हणणे अधिक योग्य ठरेल. नाटकांची कथानके बव्हंशी धार्मिक असत. नाटकांचे प्रयोग राजदरबारात सादर होत असत आणि दरबारातील मानकरी, सरदार, उमराव हेच बहुधा प्रेक्षक असत. नाटकात स्त्रियांच्या भूमिका पुरूषच करीत असत आणि नाटकातल्या प्रस्तावनेतला सूत्रधार आणि कंचुकी नामक विदुषकाचा संवाद बऱ्याचदा अश्लील असे.
शहाजी भोसले, प्रतापराव भोसले आणि सर्फोजी भोसले ह्या तीन राजांनी विपूल नाट्यलेखन केलं. बहूतेक सर्व नाटकांचे विषय देव-देवतांच्या विवाहांचे होते. सीताकल्याण, लक्ष्मीनारायणकल्याण. श्रीकोर्वंजी ही त्यातली काही महत्त्वाची नाटकं होत.
१८५५ मध्ये इंग्रजांनी तंजावरवर वर्चस्व मिळवले आणि भोसले घराण्याची राजसत्ता गेली. त्यानंतर तिथे फारसे नाट्यलेखन वा सादरीरकण झाले नाही. तंजावरी नाटकांचा प्रवाह हा तिथेच लुप्त झाला. त्याचा शोध नंतर विसाव्या शतकात लागला. ज्येष्ठ इतिहासकार वि. का. राजवाडे ह्यांना एका रामदासी मठात तंजावरी नाटकांची बाडे सापडली. त्या संहितांचा उपयोग भरतनाट्यम नृत्य परंपरेतले प्रसीद्ध नर्तक पार्वतीकूमार, सुचेता चापेकर ह्यांनी केला. त्यातील पदांवर त्यांनी भरतनाट्यम शैलीतल्या नृत्यरचना बसवून सादर केल्या. तंजावरी नाटकांमधील पदांचे नाते संस्कृत नाट्य परंपरेतील धृवांशी सांगता येते. तंजावरी परंपरेत त्यांना दरू असे संबोधत असत. सुचेता चापेकरांच्या नृत्य संचयात करनाटकी तालांच्या साथीवर तंजावरी नाटकांमधील मराठी भाषेतले अनेक दरू सादर होताना दिसतात.
महाराष्ट्र आणि तंजावर ह्यांच्यात भौगोलिक अंतर असल्यामुळे तेथील नाटकांचा महाराष्ट्रातील नाटकांवर कोणत्याच प्रकारचा प्रभाव पडलेला दिसून येत नाही. नृत्यातून थोड्या प्रमाणात ह्या परंपरेचा पुन्हा उदय झालेला असला तरी मराठी नाटकांशी त्याची कुठल्याही प्रकारे नाळ जुळलेली दिसत नाही. अशी ही मराठी नाटकाची आद्य परंपरा नाटकाच्या इतिहासात एखाद्या बेटाप्रमाणे मराठी नाटकापासून आपलं वेगळं असं अस्तित्व राखून आहे.    
(पूर्वप्रसिद्धी दै. प्रभात)

अभिनयाच्या किमयाशाळा

  अभिनयाच्या किमयाशाळा १ . प्रयोगशाळा : एक अवकाश अवकाश म्हणजे जागा , जिथे काहीतरी सामावले जाते असे काहीतरी , म्हणजे प्रयोगशा...