शुक्रवार, २० मार्च, २०२०

नाटक - रंगभूमी परिचय : १७. व्यावसायिक, हौशी, समांतर, प्रायोगीक रंगभूमी

नाटक - रंगभूमी परिचय : १७. व्यावसायिक, हौशी, समांतर, प्रायोगीक रंगभूमी
. व्यावसायिक रंगभूमी : नाट्यवर्गिकरणाचे परिमाण पैसा हे धरल्यास पैशांसाठी नाटक करणारे आणि पैसे देऊन नाटक करणारे जेथे संभवतात अशी व्यावसायिक रंगभूमी संभवते. अशा प्रकारच्या रंगभूमीवरील नाट्यनिर्मिती करण्यासाठी निर्मात्याने नफा होण्याच्या किमान गुंतविलेले पैसे परत मिळविण्याच्या उद्देश्याने पैसे गुंतविलेले असतात. नाटककार, नट, तंत्रज्ञ आणि पडद्यामागचे कलाकार या सगळ्यांनाच केलेल्या कामाचा मोबदला म्हणून प्रयोगागणिक पैसे मिळावेत अशी अपेक्षा असते. नाट्यप्रयोग सादर करण्यासाठी नाटकघराचे भाडे भरलेले असते. नेपथ्य, प्रकाश, ध्वनी, . सामुग्री विकत घेतलेली असते किंवा पैसे देऊन भाड्याने घेतलेली असते. प्रयोगाला प्रेक्षक यावेत म्हणून पैसे खर्च करून जाहिरात केलेली असते. पैसे देऊन प्रेक्षक तिकिट काढतात आणि नाटक बघतात. अशा प्रकारे पैशांचे व्यवहार केंद्रस्थानी असलेली व्यावसायिक रंगभूमी असते. महाराष्ट्रात एकोणिसाव्या शतकात नाटकांचा राजाश्रय गेल्यानंतर विष्णूदासभाव्यांनी तिकिटे लावून नाटकांचे प्रयोग करायला सुरुवात केली, तेव्हापासून महाराष्ट्रात व्यावसायिक रंगभूमीची मुहुर्तमेढ झाली असे मानले जाते. भाव्यांनी तर नटांसोबत व्यावसायिक करारपत्रदेखिल केलेले असल्याचे पुरावे आढळतात. नंतरच्या काळात सुरू झालेल्या संगीत रंगभूमीने नाट्य व्यवसायाला समृद्ध केले. मराठीतील व्यवसायिक नाटक हे दौऱ्यांचे नाटक आहे. वेगवेगळ्या गावांमध्ये किंवा शहरांमध्ये दौरे काढून नाटक सादर केले जाते. व्यवसाय होण्यासाठी लोकांना आवडतील, पचतील असे विषय, लोकप्रिय नट-नट्या, नेत्रदिपक नेपथ्य आणि परिणामकारक पार्श्वसंगीताचा वापर या गोष्टी व्यावसायिक नाटकात बहुतेककरून वापरलेल्या दिसतात. संगीत मानापमान, मोरुची मावशी, तो मी नव्हेच, ती फुलराणी, रायगडाला जेव्हा जाग येते, नटसम्राट, ऑल बेस्ट ही मराठी व्यावसायिक रंगभूमीवरील काही लोकप्रिय नाटके आहेत. मराठी व्यावसायिक नाटकांचे नाटककार म्हणून कृ. प्र. खाडिलकर, प्र. के. अत्रे, पु. . देशपांडे, वि. वा. शिरवाडकर, वसंत कानेटकर, . प्रसिद्ध आहेत. बालगंधर्व, केशवराव भोसले, काशिनाथ घाणेकर, प्रभाकर पणशिकर, श्रीराम लागू, भक्ती बर्वे-इनामदार, विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर, प्रशांत दामले, भरत जाधव, . प्रसिद्ध अभिनेते आहेत.
. हौशी रंगभूमी : पैसा हे परिमाण मानून नाटकांचे वर्गीकरण केल्यास एका टोकाला व्यावसायिक रंगभूमी मिळत असेल तर दुसऱ्या टोकाला हौशी रंगभूमी मिळते. येथे पैसा केंद्रस्थानी नसून करणाऱ्यांची हौस केंद्रस्थानी असते. नाटक करणाऱ्यांना नाटकातून पैसे मिळण्याची अपेक्षा नसते, नाटक पहायला येणारेदेखील बऱ्याच वेळा पैसे देता फुकट नाटक पहायला आलेले असतात. अनेकदा नाटकातून नफा मिळवण्यासाठी कोणीच एकाने पैसे गुंतविलेले नसतात, तर उलट नाटक करणाऱ्यांनीच आपल्या खिशातून किंवा इतरांकडून वर्गणी गोळा करून नाटकाला पैसे लावलेले असतात. नाट्यप्रयोगाचे निमित्त स्नेहसंमेलन, उत्सव किंवा विविध प्रकारच्या स्पर्धा असतात. त्यामुळे नाटक बघायला आलेले प्रेक्षक नाटकात काम करणाऱ्या आपल्या नातेवाईकांचे, मित्रांचे किंवा ओळखिच्यांचे कौतुक करायला आलेले असतात. अर्थात या सगळ्यांत पैशांचे व्यवहार अजिबातच होत नाहीत असे मात्र काही नाही. नाटकघराचे, तंत्रसामग्रीचे भाडे द्यावे लागते, पडद्यामागच्या काही कलावंतांना पैसे द्यावे लागतात, स्पर्धेची प्रवेश फी भरावी लागते. त्यामुळे शंभर टक्के हौशी नाटक शक्य नसते. भारतात इंग्रजी अंमल सुरू झाल्यानंतर स्थलांतरित झालेला चाकरमानी मध्यमवर्ग उदयाला आला. नोकरी सांभाळून आपली हौस पूर्ण करण्यासाठी हा वर्ग संगीत, नाट्य, साहित्यकलेची साधना करू लागला आणि त्यातूनच मराठी हौशी रंगभूमीचा उगम झाला. महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेने मराठी हौशी नाटकांना समृद्ध केले. साठीच्या दशकात वेगवेगळ्या शहरांमध्ये महाविद्यालयीन पातळीवर एकांकिका स्पर्धा सुरू केल्यामुळे उत्साहाने भरलेला तरुण वर्ग नाटकांकडे वळला. नोकऱ्याच्या ठिकाणी, नव्याने उदयाला आलेल्या गृहसंस्थांमध्ये, तसेच समान आवड असलेल्या सामाजिक संस्थांमध्ये मनोरंजनासाठी विविध उपक्रम राबविले जात असत त्यात नाटकाचा प्रयोग सादर करणे ही एक महत्त्वाची घटना ठरू लागली. आणि महाराष्ट्रात हौशी रंगभूमीने आपले स्थान निर्माण केले. दिवसभराची नोकरी सांभाळून रात्री उशिरापर्यंत तालमी करणाऱ्या कलावंतांपैकी काही कलावंतांनी नंतर आपल्या नोकऱ्या सोडल्या आणि व्यावसायिक रंगभूमीवर उड्या घेतल्याचीही उदाहरणे दिसून येतात. मुंबई येथील आविष्कार, पुण्यातील थिएटर अकॅडमी, कोल्हापूर येथील प्रत्यय, . हौशी नाट्यसंस्थांनीनाट्यनिर्मिती करून मराठी रंगभूमीवर मोलाची भर तर घातलीच आहे, पण विविध शिबीरे, कार्यशाळा, स्पर्धा, प्रकाशन, . उपक्रमांमधून महाराष्ट्रातील नाट्यचळवळीला हातभार लावलेला आहे.
. समांतर रंगभूमी : प्रेक्षक हे परिमाण लावून नाटकांचे वर्गिकरणकरावयाचेठरविल्यास एका टोकाला पूर्णपणे प्रेक्षकांचा अनुनय करणारी नाटके सापडतील. समाजातील मोठ्या समुहाला आवडणारी,रुचणारी, भावणारी, झेपणारी आणि पचणारी अशी नाटके सादर होत असल्यामुळे या गटाला मुख्य धारा रंगभूमी असे संबोधले जाते. याच्या विरुद्ध टोकाला समांतर रंगभूमी शक्य होते. या रंगभूमीवर प्रेक्षकांना आवडेल, रुचेल, भावेल, पचेल किंवा झेपेल याचा विचार करता आम्हाला उत्कटपणे काहीतरी सांगायचे आहे, मांडायचे आहे, दाखवायचे आहे असा विचार करून नाटके सादर केली जातात. समांतर रंगभूमीवर प्रेक्षकानुनयापेक्षा कलावंताची स्व-अभिव्यक्ती अधिक महत्त्वाची असते. महाराष्ट्रात विशेषतः स्वातंत्र्योत्तर काळात समांतर रंगभूमीच्या चळवळीने जोर धरल्याचे दिसून येते. तत्कालिन समाजात जगताना त्या समाजात घडणाऱ्या परिवर्तनाला सामोरे जात असताना आपले म्हणणे मांडण्यासाठी प्रेक्षकांना हे आवडेल की नाही याचा विचार करता काही नाटककार, दिग्दर्शक, नट आणि तंत्रज्ञांनी प्रेक्षकांना आवडणाऱ्या मुख्य धारेला समांतर अशी आपली नवीन धारा, नवा प्रवाह निर्माण केला तोच हा समांतर रंगभूमीचा प्रवाह. प्रेक्षकांचा विचार करणारी म्हणजे प्रेक्षकांशी फटकून वागणारी रंगभूमी नव्हे. सुरुवातीच्या काळात समांतर प्रवाहातील अनेक नाटके नंतर प्रेक्षकांना आवडल्यामुळे लोकप्रियदेखील ठरलेली दिसून येतात
. प्रायोगिक रंगभूमी : संकेत हे परिमाण योजल्यास नाटकांचे मुख्य दोन वर्ग संभवू शकतात :साचेबद्ध आणि प्रायोगिक. संकेत म्हणजे चिन्ह किंवा खुणा. आपल्या रोजच्या जिवनात आपण जे संकेत वापरतो त्यांना सांस्कृतिक संकेत म्हणतात. उदा., अभिवादनाच्या विविध पद्धती. नाटक घडण्याच्या बाबतीत जे संकेत वापरले जातात त्यांना रंगभूमीय संकेत म्हणतात. उदा., तीन घंटा झाल्यानंतर पडदा उघडणे. नाटकाच्या प्रयोगांतर्गतमंचावर जे संकेत वापरले जातात त्यांना नाटकिय संकेत म्हणतात. उदा., करुण भाषण म्हणणाऱ्या पात्रावर ठळक प्रकाश आणि सारंगी किंवा व्हायलिनचे पार्श्वसंगीत. कोणत्याही प्रकारच्या संकेतांच्या बाबतीत ते पाळणे, नाकारणे आणि नवे संकेत निर्माण करणे अशा तीन शक्यता संभवतात. जेथे आशय-विषयापासून ते सादरीकरणापर्यंत सगळ्यांचेच वापरुनवापरुन गुळगुळीत झालेले नाटकिय संकेत वापरलेले असतात, आयते साचे आणि ठराविक गणिते वापरलेले असतात, काय सादर करावयाचे आहे आणि ते कसे करावयाचे आहे हे ठरलेले असते, ताजे, नवे असे काही नसते त्या रंगभूमीला साचेबद्ध रंगभूमी म्हणतात. दुसऱ्या टोकाला प्रायोगिक रंगभूमी संभवते. अर्थात एकही जुना संकेत वापरणारी शंभर टक्के प्रायोगिक रंगभूमी संभवू शकत नाही. पण जेथे उपलब्ध संकेतांमध्ये भर घालण्याचा प्रयत्न असतो, काही गोष्टी नव्या संकेतांशिवाय शक्य होणार नाही अशी जिची धारणा असते, जी जुने संकेत मोडते, नव्या संकेतांना जन्म देऊ पाहते, काय सादर करावयाचे आहे आणि ते कसे करावयाचे आहे या दोन्ही पातळ्यांवर सतत काहीतरी नवे करून पाहणे, शोधणे हे जिचे ध्येय असते तिला प्रायोगिक रंगभूमी म्हणतात. प्रायोगिक रंगभूमी आशय, अभिव्यक्तीमध्ये, शब्दसंहितेमध्ये किंवा सादरीकरणामध्ये काही प्रयोग करू पाहते.
प्रयोग करणे म्हणजे प्रयत्न करणे किंवा शोध घेणे. प्रायोगिक रंगभूमीवर रंगभूमीच्या माध्यमातील नाविन्याचा शोध घेतला जातो. आजवर झालेले असे काहीतरी करून पाहिलेले असते. केवळ वेगळे काही करणे म्हणजे प्रयोग नसतो, तर ज्यामागे काही विशिष्ट विचार किंवा दिशा स्पष्ट असतात आणि जाणिवपूर्वक प्रयत्न केलेला असतो, त्यालाच प्रयोग म्हणता येतो, तेथेच प्रायोगिकता येते. तसेच केवळ एखाद्या घटकामधील छोटासा वेगळेपणा म्हणजेदेखील प्रायोगिकता ठरत नाही.प्रयोगाचे यश हे नेहमीच अनिश्चित असल्यामुळे नाट्यप्रयोगाच्यायशापयशापेक्षा प्रायोगिक रंगभूमीवर आवश्यक, अटळ आणि अपरिहार्य हे मुद्दे अधिक महत्त्वाचे असतात
आशय-विषय, प्रतिक-प्रतिमांचा वापर, नव्या पठडींची निर्मिती, वेगवेगळ्या पठड्यांचे संकर, पठड्यांच्यास्वरूपातील बदल, अर्थनिर्णयाचे वेगळे स्तर हुडकणे, वेगळ्या जीवनदृष्टीने किंवा नवतत्त्वज्ञानाच्याजाणिवेने जुन्या तपशिलाकडे बघणे, अपरिचीतवस्तूस्थिती पुढे आणणे, . बाबींपासून ते प्रयोगाच्या सादरीकरणात, नेपथ्य, प्रकाश, रंग-वेशभूषा, पात्रमंचरचना, आवाजाचा वापर, अभिनयाची शैली, . नाटकाच्या कोणत्याही अंगात प्रयोग होऊ शकतात.
प्रायोगिक ही संकल्पना कालसापेक्ष असल्यामुळे कालचेप्रायोगिक नाटक आज साचेबद्ध ठरते. तसेच प्रायोगिक रंगभूमीवर रंगभूमी या संकल्पनेलाच बदलण्याचे किंवा तिचा विस्तार वाढविण्याचे प्रयत्न होत असल्याने असा वेगळा प्रयोग जेव्हा होतो तेव्हायाला नाटक का म्हणावे?’ असे प्रश्न उपस्थित होऊ शकतात. प्रायोगिक रंगभूमीमुळे रंगभूमी या कलाप्रकाराची व्याप्ती आणि विस्तार वाढतो.
मराठी रंगभूमीवर विष्णूदास भावे, ज्योतिबा फुले, अण्णासाहेब किर्लोस्करांपासून ते विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार, सतीश आळेकर, गो. पु. देशपांडे, शाम मनोहर, रत्नाकर मतकरी, जयवंत दळवी, शफाअत खान, राजीव नाईक, संजय पवार, प्रशांत दळवी, प्रेमानंद गज्वी, दत्ता भगत, मकरंद साठे, अच्युत वझे, . नाटककारांनी काही विशिष्ट जाणिवांनी आणि जीवनदृष्टींनी नाट्यलेखनात प्रयोग केले असे म्हणता येईल तर दिग्दर्शकांच्या बाबतीत दामू केंकरे, सत्यदेव दुबे, विजया मेहता, वामन केंद्रे, विजय केंकरे, चंद्रकांत कुलकर्णी, . दिग्दर्शकांची नावे घेता येतील.

- प्रवीण भोळे
प्राध्यापक आणि विभागप्रमुख
ललित कला केंद्र, गुरुकुल
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ४११ ००७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अभिनयाच्या किमयाशाळा

  अभिनयाच्या किमयाशाळा १ . प्रयोगशाळा : एक अवकाश अवकाश म्हणजे जागा , जिथे काहीतरी सामावले जाते असे काहीतरी , म्हणजे प्रयोगशा...