शुक्रवार, २० मार्च, २०२०

नाटक - रंगभूमी परिचय : १८. संगीत नाटक, नृत्यनाट्य, मूकनाट्य

नाटक - रंगभूमी परिचय : १८. संगीत नाटक, नृत्यनाट्य, मूकनाट्य
. संगीत नाटक : संगीत हा नाटकांचा एक घटक असतो. काही नाटकांमध्ये गद्य संवादांमागे, प्रसंगांच्या शेवटी-सुरुवातीला किंवा दोन प्रसंगांमधल्या अंधाराच्या वेळी पार्श्वसंगीत वाजविण्यात येते. पण काही नाटकांमध्ये गाणी असतात आणि पात्रे गद्याप्रमाणे गीतांमधूनही संवाद करतात, त्यांचा उल्लेख संगीत नाटक या संज्ञेने केला जातो. प्राचीन काळापासून नाटकांमध्ये संगीताचा उपयोग केला जातो. प्राचीन भारतीय नाटकांमध्ये पात्रे गद्यात पद्यात संवाद करीत आणि विशिष्ट प्रसंगी संगीत वृंद धृवा नावाची गाणी गात असे. भारतीय लोकरंगभूमीवरदेखील मुक्त प्रमाणात संगीताचा वापर दिसून येतो. दशावतार, यक्षगान, किर्तन या लोकरंगभूमीप्रकारांमधील घटक वापरून विष्णुदास भावे यांनी एकाणिसाव्या शतकात काही आख्यान नाटके सादर केली. त्यातील पात्रे गद्य संवाद करीत आणि संगीत वृंदात बसलेला सूत्रधार गाण्यांमधून कथेचे निवेदन करीत असे. ब्रिटिश नाटकांच्या प्रभावातून निर्माण झालेल्या पारशी नाटकांमध्ये पात्रांच्या तोंडी गाणी वापरलेली असत. मराठी संगीत नाटकांची सुरुवात 1880 साली अण्णासाहेब किर्लोस्करांच्या संगीत शाकुतलने झाली असे मानण्यात येते. किर्लोस्करांनीकालिदासाच्या नाटकातील गद्याचे सरळ भाषांतर केले आणि पद्यांच्या ऐवजी श्लोक, दिंडी, साकी, विविध मात्रावृत्ते तसेच किर्तन, तमाशा, लोकगीते आणि स्त्रीगीतांमधीलआर्या, कटाव, चुर्णिका, . प्रकारची रचना करून त्यांना गेय रूप दिले आणि संगीत नाटक हा प्रकार मराठी रंगभूमीवर रूढ झाला.
अठराव्या शतकात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील धृपद परंपरेऐवजी ख्याल गायकी रुजू होऊ लागली होती. ख्याल गायकीमध्ये पारंगत होण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक गायक उत्तरेकडे ग्वाल्हेर आणि इतर ठिकाणी स्थलांतरीत झाले. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ते जेव्हा महाराष्ट्रात परत आले, तेव्हा संगीत नाटकांना लोकप्रियता मिळू लागली होती. भास्करबुवा बखले, रामचंद्रबुवा वझे या अशा उत्तरेकडून आलेल्या गुरूंनी अनेक गायक नटांना गाण्यांची तालिम दिली. नंतर त्यांनी संगीत नाटकांमधील पदांना चाली देण्याचे काम केले. अशा प्रकारे मराठी संगीत नाटकांमध्ये ख्याल गायकीवरआधारित रागसंगीताचा प्रवेश झाला. रागदारीचिजा, टप्पा, ठुमरी, कजरी, होली, कवाली, गजल, . ढंगाची पदे मोठ्या संख्येने येऊ लागली. भाऊराव कोल्हटकर, नानासाहेब जोगळेकर, बालगंधर्व, केशवराव भोसले, सवाई गंधर्व, मा. दीनानाथ, इत्यांदीसारखे गायक-नट मिळाल्यानंतर संगीत नाटकांमध्ये नाट्यापेक्षा संगीताचे महत्त्व वाढले. किर्लोस्करांनंतर गो. . देवल (नाटकेशारदा, संशयकल्लोळ, .), कृ. प्र. खाडिलकर (नाटकेमानापमान, स्वयंवर, .), श्री. कृ. कोल्हटकर (नाटकेवीरतनय, गुप्तमंजूषा, .), रा. . गडकरी (नाटकेभावबंधन, एकच प्याला, .) या नाटककारांनी लिहिलेल्या अनेक नाटकांनी संगीत रंगभूमी गाजविली.
संगीत नाटकांचा जमानाओसरल्यावर नाटकांमध्ये पदांची संख्या कमी झाली. उदा., मो. . रांगणेकरांचे कुलवधू. 1960 च्या सुमारास संगीत नाटकांचे पुनरुज्जीवन झाले. विद्याधर गोखले यांचे पंडितराज जगन्नाथ, वसंत कानेटकरांचे मत्स्यगंधा, पुरुषोत्तम दारव्हेकरांचे कट्यार काळजात घुसली ही नाटके गाजली. हल्ली क्वचित प्रमाणावर नवे संगीत नाटक लिहिले जाते, जुन्या नाटकांचे मात्र प्रयोग सुरू आहेत.
. नृत्यनाटक : नाटकातील कृती जेथे नृत्य हालचालींमधून व्यक्त होते, त्या प्रकारच्या नाटकाला नृत्यनाटक म्हणतात. नृत्य हा परंपरागत भारतीय नाटकांचा अविभाज्य घटक होता. नाट्यशास्त्रात वर्णन असलेल्या प्राचीन भारतीय नाटकांचे स्वरूप हे नृत्यनाटकांचेच होते. दहाव्या शतकापर्यंत सट्टक या नाट्यप्रकारातील राजशेखराने रचलेल्या कर्पुरमंजिरी या नाटकातून संगीतयुक्त नृत्यनाट्याचा विकास झालेला दिसून येतो. प्रादेशिक भाषांमधील उपरूपके म्हणजेच नाटकांचे छोटे-छोटे प्रकार विकसीत झाले, त्यांनी नृत्य हा नाट्याचा एक अंगभूत घटक मानून त्याचे नाटकांमधील स्थान बळकट केले. बाराव्या शतकात रचल्या गेलेल्या जयदेवाच्या गीतगोविंद या काव्याने अनेक नृत्यनाटकांना प्रेरणा दिली. नंतरच्या काळात उदयाला आलेल्या लोकरंगभूमीवरदेखील नृत्य या घटकाचे महत्त्व अबाधित राहिल्याचे दिसून येते. मणीपूरमधील रासलीला, आडिशामधील छाऊ, केरळातील कथकली, कृष्णअट्टम, कर्नाटकातील यक्षगान या लोकरंगभूमीप्रकारांमध्ये नृत्याचे प्राबल्य दिसून येते. अव्वल इंग्रजी कालखंडानंतर भारतात आलेल्या कमानी मंचाच्या प्रभावामुळे नाटकातील नृत्याचे महत्त्व कमी झाले. मराठी नाटकांमध्ये तर ते नगण्य प्रमाणावर दिसून येते. घाशिराम कोतवाल या नाटकात दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी तत्कालिन आशय पोचविण्याच्या संदर्भात नृत्याचा वापर करून घेतला. शिवाजीची आग्र्याहून सुटका, प्रतिमा, लीलावती, मेघदूत, . नृत्यनाटके मराठी रंगभूमीवर सादर झालेली आहेत.
. मूकनाट्य : इंग्रजीत माइम असे नाव असलेल्या मूकनाट्याचा उगम इसवीसनाच्या आसपास रोमन साम्राज्यात झाला. सर्व तऱ्हेच्या भूमिका करणे किंवा सर्व माणसांच्या किंवा पशुपक्ष्यांच्या नकला करणे असा मूळ अर्थ असलेल्या या कलेत गुलाम किंवा भटके कलावंत काम करीत. रोमन साम्राज्यकाळी नाट्यगृहात करमणूक करणारा नट आणि त्याचा खेळ यांना उद्देशून ही संज्ञा वापरली जाई. केवळ शारीरिक हालचाली, अंगविक्षेप, हातवारे यांच्या साहाय्याने पण मूकपणाने एखादी पौराणिक कथा आणि त्या कथेतील सर्व पात्रे यांचे दर्शन घडविणे म्हणजे मूकनाट्य होय. प्रत्यक्ष मंचवस्तू वापरता तिचा आभास निर्माण करणे यात या कलेचे कसब दिसून येते.
आधुनिक काळातही विशेषतः नाताळच्या सणात मूकनाट्याचे प्रयोग होत असत. त्यांचे स्वरूप मात्र विनोदी नृत्यनाट्यासारखे असे. बहुधा परिकथेतला नायक आणि त्याची आई ही पात्रे त्यांत असत,नायकाचे सोंग एखादी मुलगी घेत असेतर आईची भूमिका एखादा लोकप्रिय विनोदी नट करीत असे. इतर कथांतून पँटालून, हार्लेक्विन, कोलंबाईन् ही पात्रे असत.इटलीच्या कॉमेदिया देलार्त या नाट्यप्रकारात अनेक प्रसंग केवळ मूकअभिनयानेच व्यक्त केले जात. फ्रान्समध्ये मूकनाट्याची परिणती बॅलेच्या रूपाने झाल्याचे दिसून येते.एटिनी दक्रू या मुकाभिनय कलावंताने या जुन्या कलेचा जीर्णोद्धार केला. दक्रूने मूकनाट्याने एखादा प्रसंग, गोष्ट किंवा वस्तू दाखविण्याच्या ऐवजी शरीरातील उर्जा प्रवाह ओळखून शरीर हालचालींचे रचनात्मक त्रिमितीय स्वरूप दाखविणे हे उद्दिष्ट मानले. मार्सेल मार्सो या मुकाभिनयपटूने मूकनाट्याना जगभर लोकप्रिय केले. भारतात नाट्यशास्त्रातील आंगिक अभिनयाशी सांगड घालून जोगेश दत्ता, निरंजन गोस्वामी यांनी मूकनाट्य प्रचलित केले. महाविद्यालयीन पातळीवरील युवा महोत्सवांमध्ये या प्रकाराच्या स्पर्धा घेतल्या जात असल्या तरी मराठी रंगभूमीवर एकही ठळक उदाहरण दिसून येत नाही. काही एकांकिकामध्ये किंवा नाटकांमध्ये विशिष्ट परिणाम साधण्याकरिता मुकाभिनयाचा उपयोग केला जातो.

- प्रवीण भोळे
प्राध्यापक आणि विभागप्रमुख
ललित कला केंद्र, गुरुकुल
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ४११ ००७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अभिनयाच्या किमयाशाळा

  अभिनयाच्या किमयाशाळा १ . प्रयोगशाळा : एक अवकाश अवकाश म्हणजे जागा , जिथे काहीतरी सामावले जाते असे काहीतरी , म्हणजे प्रयोगशा...