शुक्रवार, २० मार्च, २०२०

नाटक - रंगभूमी परिचय : १९. दलित रंगभूमी, रस्ता नाटक

नाटक - रंगभूमी परिचय : १९. दलित रंगभूमी, रस्ता नाटक
. दलित रंगभूमी : पारंपरिक वर्णाधिष्टित समाजरचनेमुळे होणाऱ्या अन्यायाच्या सततच्या भानामधून आणि अन्याय स्विकारण्यास दिलेल्या नकारातून निर्माण झालेल्या जाणिवांना मांडणारी रंगभूमी म्हणजे दलित रंगभूमी होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंदोलनांमुळे दलितांच्या जीवन जाणिवा बदलल्या. या आंदोलनांमधून घेतलेल्या प्रेरणांमधून दलित रंगभूमीची निर्मिती झाली. बुद्धिनिष्टा, तर्कशुद्धता, अंधश्रद्धेला आणि व्यक्तिपूजेला विरोध हे डॉ. आंबेडकरांच्या विचारसरणीचे महत्त्वाचे विशेष. माणूस म्हणून जगण्याचा हक्क नाकारणाऱ्या संस्कृतीला आणि परंपरेला त्यांनी आव्हान दिले. अन्यायाचा प्रतिकार आणि न्यायाची प्रतिष्ठापना हा त्यांचा महत्त्वाचा हेतू होता. याच प्रेरणामधून दलित रंगभूमीची मूल्यसंकल्पना सिद्ध झाली.
आजच्या दलित रंगभूमीला तमाशा, लोकनाट्याची दीर्घ परंपरा आहे. त्याकाळातील वगांमध्ये आजच्याएवढा प्रखर विद्रोह जरी नसला तरी अन्यायाची जाणिव विडंबनाच्या रूपाने मांडली जात होती. १८५५ मध्ये लिहिले गेलेले ज्योतिबा फुले यांचे तृतीय रत्न हे मराठीतील समकालिन वर्तमान मांडणारे पहिले विद्रोही नाटक मानले जाते. हे नाटक भारतीय परंपरेतील चातुर्वर्ण्य समस्येवर भाष्य करते. १९३० च्या सुमारास सुरू झालेल्या आंबेडकरी जलश्यांपासून या रंगभूमीवर क्रांतिकारक जाणिव सुरू झाली. किसन फागुजी बनसोडे, गुरुदास ढेमरे, भीमराव धोंडिबा बारडकर, हिरामण जाधव, . शाहिरांच्या आंबेडकरी जलश्यांमधून विद्रोहाच्या ठिणग्या दिसून येतात. अण्णाभाऊ साठे यांनी लोकनाट्यातील शृंगाराला फाटा देऊन परिवर्तनवादी भूमिकेतून परंपरेला नकार आणि सामाजिक बांधिलकी मानणारी वगरचना केली
सुरुवातीच्या काळातील दलित नाटके सवर्ण आणि दलित अशा द्विधृवात्मक रचनेतून साकार झालेली होती. . भी. चिटणिस यांच्या युगयात्रा या नाटकाने शंबूक हा दलित नायक निर्माण करून नकाराचे तत्त्वज्ञान मांडले. दलित रंगभूमीवरील महत्त्वाचे नाटककार म्हणून प्रकाश त्रिभूवन, भी. शि. शिंदे, रामनाथ चव्हाण, . नावे घेता येतील. दलितांच्या तीन पिढ्यांचे चित्रण करून प्रत्येक पिढीचा दृष्टीकोन वस्तूनिष्टपणे मांडणारे दत्ता भगत यांचे वाटा-पळवाटा हे मराठी रंगभूमीवरील एक महत्त्वाचे नाटक मानले जाते. प्रेमानंद गज्वी यांनी घोटभर पाणी, किरवंत या नाटकांमधून दलित जाणिवांची व्याप्ती विस्तृत केली. संजय पवार यांनी लिहिलेले कोण म्हणतं टक्का दिला? हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर प्रचंड गाजले. आशय आणि अभिव्यक्ती या दोन्ही पातळ्यांवर दलित नाटकांनी मराठी रंगभूमीवर एक वेगळा ठसा उमटवला आहे
. रस्ता नाटक : नाटक पहायला आपण नाटकघरात जातो. तेथे प्रेक्षकांना बसायला खुर्च्या ठेवलेल्या असतात. नाटक चांगले दिसावे म्हणून खुर्च्यांची विशिष्ट पद्धतीने रचना केलेली असते. नाटक उंचवट्यावर घडते. नटांवर प्रकाश टाकला जातो. प्रेक्षकांना उन, पाऊस लागू नये म्हणून छप्पर असते, उकडू नये म्हणून पंखे, वातानुकुलिन यंत्रणा असते. बाहेरचे आवाज आत येऊ नये म्हणून ध्वनीरक्षक यंत्रणा केलेली असते. नटांचे आवाज येग्य पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोचावेत म्हणून ध्वनीवर्धक लावलेले असतात.या सर्व सुखसोयी प्रेक्षकांना नाटकाचा आस्वाद चांगल्या पद्धतीने घेता यावा यासाठी केलेल्या असतात. या सर्व सुखसोयी नाकारून प्रतिकुल परिस्थितीमध्ये, रस्त्यात उघड्यावर, कधी उन्हात तर कधी पावसातही आजुबाजूने वाहतुकीचे आवाज येत असताना, मध्यभागी गोलात नाटक सादर होत असते. प्रेक्षक उभे राहून एकमेकाच्या डोक्यांमधील जागेमधून ते नाटक पहात असतात. कारण कलात्मकतेपेक्षा हे नाटक चळवळ या प्रक्रियेशी जोडलेले असते. कथानक, नेपथ्य, प्रकाशयोजना, . रंगमंचिय व्यापारांच्या बंधनातून मुक्त होऊन, तत्कालिन समाजातील राजकिय-सामजिकविचार मांडण्यासाठी रस्त्यावर सादर होणाऱ्या नाटकांना रस्तानाटक असे म्हणतात. १९६३ मध्ये अमेरिकेतील न्यू यॉर्क येथे स्थापन झालेल्या ब्रेड ऍण्ड पपेट थिएटरने रस्ता नाटकांचे शेकडो प्रयोग केले. तेव्हापासून हा प्रकार जगभर लोकप्रिय झाला
रस्त्यावरील माणसांना कुतुहल वाटेल, खेचून घेईल असा विषय, समुहाच्या मानसिकतेला हात घालणारी सहज, सोपी भाषा तसेच सहज, मुक्त आणि जिवंत अभिनय यांच्या एकत्र परिणामातून रस्ता नाटक सादर होत असते. सर्व पात्राची सारखी वाटेल अशी वेशभूषा, एखादी टोपी किंवा काठीसारख्या हस्तवस्तूच्या सहाय्याने किंवा ओढणीचा वापर करून वेगवेगळी पात्रे दाखविणे, गोल फिरून मोठ्याने संवाद म्हणणे, घोषणा लिहिलेल्या फलकांचा वापर, शरीराच्या हालचालींमधून स्थलसूचन, एखादे ढोलके किंवा ताट-वाटीसारख्या वाद्यांचा वापर, कमालीची उत्स्फूर्तता . वैशिष्ट्यांमधून रस्तानाटकाचा प्रयोग सादर होतो.
बंगालमध्ये बादल सरकार, दिल्लीमध्ये सफ्दर हाश्मी यांनी अनेक ज्वलंत विषयांवर रस्ता नाटके सादर केली. महाराष्ट्रात दलित रंगभूमीने समतेच्या चळवळीचे मोठे हत्यार म्हणून रस्ता नाटकांचा उपयोग करून घेतला.राखिव जागा, स्त्री-पुरुष समानता, न्यायालयाचाचुकिचा निर्णय, विद्यार्थ्यांची शुल्कवाढ, व्यसनमुक्ती, हुंडाबंदी, समलैंगिकता, . मुद्द्यांवर प्रतिक्रिया म्हणून रस्ता नाटके सादर झालेली आढळून येतात.
भारतात लोकरंगभूमीवरील अनेक प्रकार रस्त्यांवरच सादर होत असल्याचे दिसतात. लोकरंगभूमी मनोरंजनाबरोबर प्रबोधनाचे कामकरीत असल्याने पोतराज, वासुदेव, बहुरूपी, . लोककलावंतदेखील रस्ता नाटकांचेच आविष्करण करतात असे म्हणता येईल.

- प्रवीण भोळे
प्राध्यापक आणि विभागप्रमुख
ललित कला केंद्र, गुरुकुल
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ४११ ००७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अभिनयाच्या किमयाशाळा

  अभिनयाच्या किमयाशाळा १ . प्रयोगशाळा : एक अवकाश अवकाश म्हणजे जागा , जिथे काहीतरी सामावले जाते असे काहीतरी , म्हणजे प्रयोगशा...