महाराष्ट्रातील अभिनय प्रशिक्षण : काही निरीक्षणे
मानवी संस्कृतींमध्ये प्रत्यक्ष नाट्यकलेचा पहिला पूरावा प्राचीन इजीप्तच्या संस्कृतीत जरी मिळत असला तरी नाटक आणि रंगभूमी या प्रयोगकला त्याहूनही जून्या असाव्यात हे नक्की. नाट्यकलेच्या प्रारंभापासूनच अभिनय हा नाटक, रंगभूमीचा गाभ्याकडचा, अतिशय महत्त्वाचा असा भाग राहिलेला आहे. आणि अभिनयकलेच्या प्रारंभापासूनच अभिनयाचे प्रशिक्षणही अभिनयकलेशी जोडले गेलेले आहेच. नाटकातील प्रशिक्षणाच्या इतिहासाचा आढावा घेतल्यास, औपचारिक पद्धतीने प्रशिक्षण घेऊन मग नाटकांमधून अभिनय करणे आणि उमेदवारी करत करत अनौपचारिक पद्धतीने अभिनयाचे प्रशिक्षण घेणे या दोन्ही परंपरा दिसून येतात. तरिही नाटकात अभिनय करण्यासाठी त्याच्या प्रशिक्षणाचे महत्त्व आजतागायत कोणाला वाटलेले नाही. ‘तुला अमुक वाद्य वाजवता येते काय?’असा प्रश्न कोणाला विचारल्यास त्याचे उत्तर तो होकारार्थी किंवा ‘मी शिकलेलो नाही’ असे देतो, नृत्याच्या बाबतीत असाच प्रश्न विचारल्यास देखील असेच उत्तर मिळते परंतु ‘नाटकात अभिनय करता येतो काय?’असा प्रश्न विचारल्यास होकारार्थी किंवा ‘मी अद्याप करून पाहिलेले नाही’ असे उत्तर मिळते. म्हणजे इतर कलांचा प्रयोग करण्यासाठी असलेली प्रशिक्षणाची अपेक्षा नाट्याभिनयाच्या बाबतीत केवळ अनुभवाची ठरते. आणि म्हणूनच अभिनयकलेच्या प्रशिक्षणाच्या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होतात.
ज्येष्ठ नाट्याभ्यासक रिचर्ड शेखनर अभिनय प्रशिक्षणाच्या पाच पातळ्या सांगतात. एक, पश्चिमेकडील नाट्यपरंपरेतील नाटक सादर करणाऱ्या परंपरेत नाट्यसंहितांचे अर्थनिर्णयन करण्यासाठी अभिनेत्यांना प्रशिक्षण दिले जाते. वेगवेगळ्या कालखंडात लिहिल्या गेलेल्या शैलींमधील नाटकांचे विश्लेषण करण्यासाठीचे अभिनेते हे सर्व शैलींमधील अभिनय करण्यासाठी केवळ पारंगतच नव्हे तर लवचिक असायला हवेत. हॅम्लेटमधील हॅम्लेट, वेटिंग फॉर गोदोमधील व्लादिमिर, डेथ ऑव्ह अ सेल्समनमधील विली लोमन अशा विविध भूमिका साकारणारा नट वेगळ्याच नाटककाराने लिहिलेली व्यक्तिरेखा प्रेक्षकांपर्यंत पोचवणारा माध्यम असतो. अभिनयाचे प्रशिक्षण हे या माध्यमाला अधिक पारदर्शीपणे व्यक्त करण्याचे प्रशिक्षण असते. दुसरी म्हणजे – कथकली, नोह अशा परंपरांमध्ये नट अभिनय करण्यासाठी केवळ संहितांमधील शब्दांवर अवलंबून नसतात. आपला अभिनय साकारण्यासाठी ते संगीत, विशिष्ट पद्धतीचे हातवारे, नृत्य, वेशभूषा आणि पाठ्य या घटकांचा वापर करतात, इथे ते केवळ शब्दांचे अर्थनिर्णयन करणारे माध्यम नसतात, तर पाठ्यातले शब्द हा त्यांच्या इतर सामग्रीतील एक घटक असतो. त्यामुळे या परंपरांमध्ये अभिनेते सादरीकरणाचे पाठ्य पोचविण्यासाठी प्रशिक्षण घेतात. तिसऱ्या पातळीवरचे प्रशिक्षण हे वैयक्तिक पातळीवरचे असते. एखाद्या विशिष्ठ सादरीकरण परंपरेतील गुपिते गुरुद्वारे शिष्यांकडे सोपवली जातात. विशिष्ठ नाट्यप्रयोगांच्या सादरीकरणासाठी हे प्रशिक्षण नसते, तर ती कला हेच प्रशिक्षण असते, आणि प्रशिक्षित झाल्यामुळे कलावंत आपली कला सादर करतात. प्रशिक्षणाची चौथी पातळी ही आत्माभिव्यक्तीची आहे. स्वतःवर प्रयोग करत करत स्वतःला एवढे प्रशिक्षित करावे की आपल्या आतल्या गोष्टी सहजपणे बाहेर काढता येतील. ग्रोटोव्स्कीच्या कामांमधून दिसणारे प्रशिक्षण या प्रकारचे आहे. प्रशिक्षणाची पाचवी पातळी ही संघभावनेची निदर्शक आहे. विशिष्ट पद्धतीचे प्रशिक्षण घेतल्याने केवळ सादरीकरणाची पठडी तयार होत नाही तर संघ तयार होतात.
हे झाले रिचर्ड शेखनरचे म्हणणे. भारतात, विशेषतः महाराष्ट्रात आपल्याला अभिनय-प्रशिक्षण कोणकोणत्या पातळ्यांवर दिसते, ते जरा बघू या.
दक्षिणेप्रमाणे महाराष्ट्रात रंगभूमीची परंपरा नाही. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या प्रकारची लोकरंगभूमी अस्तित्वात होती, काही ठिकाणी अजूनही आहे. ही त्या त्या प्रांतातली लोकरंगभूमी वंशपरंपरेने चालणारी जाती-धर्मांच्या चौकटीत अडकलेली रंगभूमी आहे. या प्रकारांमध्ये अनौपचारिक पद्धतीचे, सोबत राहून, पाहून पाहून करत प्रशिक्षण होते. परंतु आपल्याकडे या लोककलाप्रकारांना फारशी प्रतिष्ठा व या व्यवसायातून पुरेसे आर्थिक स्थैर्य मिळत नसल्याने प्रत्येक पिढीगणिक या कलांमध्ये प्रशिक्षित होणाऱ्या कलावंतांची संख्या घटत चालली आहे. परंतु अलिकडे काही विद्यापीठांमधून प्रयोगकला म्हणून लोककलांचे औपचारिक प्रशिक्षण दिले जात आहे.
महाराष्ट्रात अभिनय प्रशिक्षणाचा सगळ्यांत लोकप्रिय मार्ग हा अनौपचारिक पद्धतीचा – उमेदवारी करत शिकण्याचा आहे. विविध पातळ्यांवरच्या स्पर्धा हे या प्रशिक्षणाचे महत्त्वाचे निमित्त असते. संपूर्ण महाराष्ट्रामधील विविध केंद्रांवर गेली अनेक वर्षे राज्य नाट्य स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. त्याच बरोबर महाराष्ट्रातल्या विविध शहरांमधून महाविद्यालयीन पातळीवरच्या अनेक एकांकिका स्पर्धांचे आयोजन केले जाते, शिवाय बऱ्याच खूल्या एकांकिका स्पर्धा देखील असतातच. आज महाराष्ट्रातील नाट्य व्यवसायात असलेल्यांपैकी जवळपास नव्वद टक्के कलावंत हे स्पर्धांमधून आलेले आहेत, म्हणजे एका अर्थाने त्यांचे प्राथमिक परंतु अनौपचारिक असे प्रशिक्षण स्पर्धांसाठी होणाऱ्या नाटकांच्या तालमींमधून तसेच प्रयोगांमधून आपल्यासोबतच्या ज्येष्ठ नटांचे निरिक्षण करत, त्यांच्याशी चर्चा करत, त्यांच्या सल्लामसलतीने झालेले असते. बक्षिसे मिळवणे हेच स्पर्धांमधल्या नाटकांचे प्रमुख उद्दिष्ट असल्याने ज्याला बक्षिस मिळेल अशा पद्धतीचा, म्हणजेच आवाज आणि भाषणात विविधता दाखवणारा, हालचालींमध्ये सहजता असणारा, भावनांच्या वेगवेगळ्या छटा दर्शवणारा, विशिष्ट व्यक्तिरेखेचा उत्तम आभास निर्माण करणारा आणि मुख्य म्हणजे प्रेक्षकांवर परिणाम करणारा – अशा पद्धतीचा अभिनय करायला हे अभिनेते आपल्या ज्येष्ठांकडून शिकत असतात. शिवाय चित्रपट आणि मालिकांमधले काही लोकप्रिय अभिनेते यांच्या अभिनयशैलीचा, विशेषतः त्यांच्या अभिनयातील ज्या घटकांमुळे ते लोकप्रिय ठरतात, त्या घटकांचा त्यांच्यावर प्रभाव असतो. आणि मग अशा पद्धतीने प्रशिक्षित झालेले नट जेव्हा मुख्य धारेतल्या नाटकांमध्ये अभिनय करतात, तेव्हा त्यांच्या अभिनयात वर उल्लेख केलेल्या गोष्टी दिसतात.
अनेक वेळेला नट सरळ मुख्य धारेतल्या व्यावसायिक नाटकांमध्ये अभिनय करू लागतात, त्यांना स्पर्धेचीही पार्श्वभूमी नसते. दिग्दर्शकाच्या सांगण्यावरून, इतर नटांचे निरिक्षण करून आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशांमध्ये तसेच वेगवेगळ्या प्रेक्षकसमुहासमोर प्रयोग (म्हणजे परफॉरमन्स या अर्थाने, एक्सपरिमेंट नव्हे) करुन करुन ते स्वतःच्या अनुभवांमधून स्वयंप्रशिक्षित होत असतात. मराठी रंगभूमीवर सध्याच्या काळात अशा प्रकारच्या नटांचेही प्रमाण लाक्षणिय आहे.
अभिनय-प्रशिक्षणाचा महाराष्ट्रातील अजून एक लोकप्रिय प्रकार म्हणजे शिबीरे आणि कार्यशाळा. यांचा कालावधी एका दिवसापासून ते काही महिन्यांपर्यंत असा विविध असू शकतो. उन्हाळ्याच्या किंवा दिवाळीच्या सुट्यांमध्ये मोठ्या संख्येने अशा प्रकारची शिबिरे, कार्यशाळा संपन्न होत असतात आणि त्यांच्यात साधरणपणे दहा ते शंभर व्यक्ती सहभागी होत असतात. संपूर्ण महाराष्ट्रात एका वर्षात आदमासे चार ते पाच हजार नट या पद्धताचे प्रशिक्षण पूर्ण करतात. थोड्या फार फरकाने या कार्यशाळांच्या अभ्यासक्रमामध्ये शरीराच्या हालचाली, आवाजांचे व्यायाम, विविध भूमिका साकारण्याचे अभ्यास आणि नाट्यप्रसंगांचे उत्स्फूर्ताविष्कार यांचा समावेश असतो. मराठी रंगभूमीवर सादर होणाऱ्या नाटकांची एक विशिष्ट अशी शैली नसल्यामुळे अभिनयाच्या प्रशिक्षणातही संकिर्णता आढळते. कोणतीतरी ठोस उद्दिष्ट्ये ठरवून त्यानुसारचा अभ्यासक्रम आखलेला नसल्यामुळे एक साधारणीकृत आराखडा असतो, आणि कोणतीही निश्चित अशी विधाने न करता गुढ वाटावी अशी संदिग्ध विधाने केली जातात. कार्यशाळेचा कालावधी बघता सहभागींना वेगवेगळ्या घटकांचा थोडक्यात अनुभव दिला जातो. यांमधून कोणत्याही पद्धतीचे प्रशिक्षण होण्याऐवजी केवळ परिचय मात्र होतो. सहभागी होणाऱ्यांपैकी फारच थोडे लोक या व्यवसायात जाण्यासाठीचे कौशल्य हस्तगत करण्यासाठी आलेले असल्यामुळे कोणाचा या कार्यशाळा, शिबीरांच्या अभ्यासक्रमाबाबत आक्षेपही नसतो. सहभागींपैकी अनेक लोक ‘नाटकात काम करायची हौस आहे परंतु कधी संधी मिळाली नाही’म्हणून आलेले असतात. इतर प्रयोगकलांच्या प्रशिक्षणाच्या तुलनेत अभिनयाच्या प्रशिक्षणाचे स्वरुप हे मुळातच काहीसे सैल, मोकळेधाकळे, मौज-मजा करत, सांघिक रित्या घेण्याचे असल्यामुळे सहभागींना अशा पद्धतींच्या कार्यशाळांमधून काहीतरी जगावेगळे आणि आयुष्यात पहिल्यांदाच केल्याचे समाधान मिळते. हल्लाच्या घाई-गडबडीच्या आणि स्पर्धेच्या काळात ताण निवारणासाठी अभिनय प्रशिक्षणाचे महत्त्व त्यांचे आयोजक अधोरेखीत करत असतात. अर्थातच, अशा बहुतेक कार्यशाळा, शिबिरांचा हेतूच नाट्यबाह्य असल्यामुळे त्यांची चर्चा करण्याची खरे तर गरजच नाही. व्यक्तिमत्व विकास आणि ताण निवारण या उद्दिष्टांमुळे अशा प्रकारच्या कार्यशाळा, शिबीरे उपयोजीत रंगभूमीचा भाग ठरतात, परंतु क्वचितच त्यांच्या अभ्यासक्रमाची रचना त्या पद्धतीने केलेली दिसते. अशा कार्यशाळा, शिबिरे संचालित करणाऱ्यांपैकी फारच थोड्या लोकांनी अभिनय-प्रशिक्षणपद्धतीचा वा उपयोजीत रंगभूमीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असतो. पूर्वाश्रमी काही नाटकांमधून केलेल्या अभिनयाच्या अनुभवाच्या जोरावरच या कार्यशाळा चालविल्या जातात. एकूणात या पातळीवरच्या प्रशिक्षणाच्या बाबतीत – प्रशिक्षक, प्रशिक्षणार्थी आणि प्रशिक्षण कार्यक्रम यांची वर्षाकाठी संख्या भरपूर असूनही त्यांची उद्दिष्ट्ये आणि कार्यपद्धती यांचा एकमेकांशी मेळ नसल्यामुळे, त्यांचा परिणाम मोजणारी कोणतीही यंत्रणा विकसीत होउ शकलेली नाही, परिणामी काही दिवसांचा हौसेचा मामला या पलीकडे तरी महाराष्ट्रात अभिनय विषयक शिबीरे, कार्यशाळा यांचे महत्त्व दिसून येत नाही.
काही सायंकालीन व छोटे अभ्यासक्रम हा देखील अभिनय-प्रशिक्षणाचा एक प्रकार महाराष्ट्रात दिसून येतो. छोट्या कार्यशाळांच्या तुलनेत यांची व्याप्ती मर्यादीत परंतु आवाका अधीक खोलवर दिसून येतो. परंतु महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरे वगळता अशा अभ्यासक्रमांचे अस्तित्व दिसून येत नाही. अशा अभ्यासक्रमांचे नियोजन शिबिरे, कार्यशाळांच्या तुलनेत अधीक तपशिलवार असते खरे, पण इथे देखील ‘इच्छा आहे पण संधी न मिळालेले’च सहभागी अधिक असतात. अभ्यासक्रम शिबिरांप्रमाणेच पण जास्त कालावधीचा, प्रत्येक सहभागीला काहीतरी करण्याची अधीक संधी मिळवून देणारा असतो. अभ्यासक्रमाच्या शेवटी कोणतेतरी सादरीकरण हे अशा अभ्यासक्रमांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असते. पण अनेक ठिकाणी संपूर्ण अभ्यासक्रमाचे यशापयश जणू या अंतिम सादरीकरणावर अवलंबून आहे एवढे महत्त्व या सादरीकरणांना दिले जाते, आणि अभ्यासक्रमांच्या सुरुवातीला काही नाट्यखेळ खेळल्यासारखे करुन अंतिम सादरीकरणांची तयारी सुरु होते, आणि या नाट्यनिर्मितीद्वारेच प्रशिक्षण होते असे भासवले जाते. अशा अभ्यासक्रमांचे प्रशिक्षक बहुतेक वेळा केवळ अनुभवी असतात, अभिनय-प्रशिक्षण पद्धतीचा अभ्यासक्रम त्यांनी क्वचितच पूर्ण केलेला असतो. असे अभ्यासक्रम पूर्ण केलेले सहभागी, बराच काळ एकमेकांच्या सोबत काम केलेले असल्यामुळे आपला छोटा नाट्यगट तयार करतात आणि स्पर्धांमध्ये भाग घेतात, त्यातले काही यथावकाश व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश करतात. परंतु बऱ्याच वेळा असे निदर्शनास येते की, अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षण कालावधीतीतल औपचारिक प्रशिक्षणापेक्षा विविध निमित्ताने केलेल्या नाट्यप्रयोगांमार्फत अनुभवांतून प्रशिक्षण अधीक झालेले आढळते. शिवाय या प्रशिक्षणांती सहभागी कोणत्या विशिष्ट शैलीत पारंगत झाल्याचे वा त्याला स्वतंत्र व नवा दृष्टीकोन लाभल्याचे उदाहरण अगदी अभावानेच दिसते.
महाराष्ट्रात अभिनय प्रशिक्षणासाठी विद्यापीठ आणि महाविद्यालयीन पातळयांवर अनेक वेगवेगळे अभ्यासक्रम विकसीत झाल्याचे दिसतात. पैकी काही विद्यापीठांमधील अभ्यासक्रम हे शासनातर्फे अनुदानित तर काही विनाअनुदानीत आहेत, काहींचे स्वरुप व्यावसायिक अभ्यासक्रम असे आहे तर काहींचे अव्यावसायिक असे आहे. काही ठिकाणी महाविद्यालयांमध्ये तीन वर्षांचे पदवी अभ्यासक्रम आहेत तर काही ठिकाणी ते चार वर्षांचे आहेत. एकुणातच शासनाची या विषयाकडे पाहण्याची कोणतीही ठाम वा निश्चित अशी भूमिका दिसून येत नाही. वेगवेगळ्या विद्यापीठांमधील अभ्यासक्रमांचे स्वरुप पहाता बहुतेक ठिकाणी – ते ना धड निव्वळ शैक्षणिक ना पूर्णपणे व्यवसायोपयोगी असे दिसून येतात. विद्यापिठांच्या अभ्यासमंडळांनी तयार केलेल्या या अभ्यासक्रमांच्या रचनेचे ठाम उद्दिष्ट दिसून येत नाही. दुर्दैवाचा भाग असा कि, महाराष्ट्रातील व्यावसायिक नाटकांमध्ये आज जेवढे मनुष्यबळ कार्यरत आहे त्यातले विस टक्के देखील नाट्यविषयक पदवीधर नाहीत. याचा अर्थ असा जे पोटापाण्यासाठी नाटकाचा व्यवसाय करतात, त्यातल्या ऐशीपेक्षा जास्त टक्के लोकांना तो व्यवसाय करण्यासाठी विद्यापिठांमधल्या नाट्य वा अभिनय विषयक पदवीची गरज भासत नाही. याउलट काही विद्यापिठांमधले विभाग वगळता, इतर विभागांमधून उत्तिर्ण झालेल्या नाट्य वा अभिनय विषयक पदवीधारकांपैकी पाच टक्के देखील नाट्य व्यवसायात कार्यरत नाहीत. म्हणजेच व्यवसायात जे आहेत ते विद्यापीठांमार्फत प्रशिक्षित नाहीत, आणि जे विद्यापीठांचे पदवीधर आहेत ते व्यवसाय करत नाहीत. यावरूनच महाराष्ट्रातील विद्यापीठ व महाविद्यालयीन पातळीवरच्या नाट्य प्रशिक्षणाची दिशा व दशा कळून यावी.
महाराष्ट्रात, आपल्या अंगी नाट्यगूण आहेत असा ज्याला साक्षात्कार होतो, तो स्पर्धांमधून अभिनय करू लागतो. स्पर्धांमधून त्याचा प्रवेश मुख्य धारेत होतो. त्यामुळे त्याला स्वतःला प्रशिक्षित करून घेण्याची गरज भासत नाही. ज्यांना अशी संधी मिळत नाही ते संधी मिळण्यासाठी प्रशिक्षणाकडे वळतात. अभिनय-प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांपैकी फारच थोड्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणात रस असतो, बहूतेक सगळे संधी निर्माण करण्याकरता आलेले असतात. त्यांना रंगमंचावर येण्याची संधी मिळावी, एवढीच त्यांची नाट्यप्रशिक्षणाकडून माफक अपेक्षा असते. त्यामुळे अभ्यासक्रमातून आपल्याला कोणते सैद्धांतिक वा प्रात्यक्षिक ज्ञान मिळते आहे, या पेक्षा वर्षभरात दोन-तीन वेगवेगळ्या नाटकांमधून अभिनय करायला मिळतो, हेच त्यांच्यासाठी खूप असते आणि म्हणून तेवढे मिळाल्यावर ते खूष होतात. दुय्यम गुणवत्तेचे विद्यार्थी आणि त्यांचे अल्पसमाधान असल्यामुळे अशा विभागांमधील प्राध्यापक जेवढ्यास तेवढेच देण्याचा प्रयत्न करतात. आणि एकूणातच विद्यापीठ पातळीवरचे नाट्यप्रशिक्षण हा एक खेळ बनून राहतो. अशा विभागांमधले विद्यार्थी स्वतःला नाटकांमध्ये अभिनय करायला सक्षम करण्याऐवजी पदवीनंतर, पदव्युत्तर शिक्षण, त्यानंतर नेट-सेट, एम. फिल, पिएच. डी असे सततचे कागदोपत्री शिक्षण घेण्यात, वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकाच्या जागेसाठी अर्ज करण्यात आणि त्यांच्या जागा वाढवून घेण्यातच धन्यता मानतात. (सध्या शालेय पातळीवर नाट्यप्रशिक्षण सुरू व्हावे अशी एक मोहिम जोर धरते आहे, याचे कारणही शालेय विद्यार्थ्यांच्या विकासापेक्षा नाट्य-पदवीधरांना रोजगार उपलब्ध व्हावा असेच असावे.)
अर्थात, सर्वच विद्यापीठांमध्ये ही परिस्थिती नाही. काही विद्यापीठांच्या नाट्यविभाग प्रमुखांच्या धोरणी दूरदृष्टीने मराठी रंगभूमीला वळण आणि दिशा देणारे नाट्यकर्मी तयार केले आहेत.
नाट्यप्रशिक्षण घेऊन नाटक न करता चित्रपट, मालिकांमध्ये अभिनय करण्याने चित्रपट वा मालिकांमधल्या अभिनयावर काय परिणाम झाला आहे हा वेगळा विषय, पण नाट्यप्रशिक्षण घेऊन नाटकांत अभिनय न करणे हा मात्र एक नवा प्रश्न उपस्थित झालाय.
नाट्यप्रशिक्षणाची महाराष्ट्रात दिसून न येणारी पातळी म्हणजे प्रयोगशाळा रंगभूमी (प्रायोगिक नव्हे). या प्रकारातील अभिनेते नाट्यप्रयोगातील अभिनयाला साध्य न मानता साधन मानून स्वतःला निरंतर प्रशिक्षित करत रहातात, नाट्यभिनयाच्या विविध शक्यता शोधत राहतात,अभिनय या संकल्पनेच्या व्याख्येची चौकट बदलण्याचा सतत प्रयत्न करत राहतात. पश्चिमेकडे ग्रोटाव्स्कीने, बार्बाने अशा प्रयोगशाळा सुरु केल्या, आपल्याकडे पण्णिकर, रतन थियम, बन्सी कौल यांनी तसे काम केले. महाराष्ट्रातही अशा तऱ्हेच्या प्रयोगशाळा सुरू होऊन अभिनय-प्रशिक्षणाची वेगळी पातळी गाठली जाईल, अशी सदिच्छा.
- प्रवीण भोळे.
(पूर्वप्रसिद्धी शिक्षणवेध दिवाळी अंक २०१४)