युजेनिओ बार्बा (छायाचित्र : प्रवीण भोळे)
ही गोष्ट जेवढी बार्बाची आहे, तेवढीच ती ओडीनचीही आहे.
बार्बा आणि ओडिन ह्यांना एकमेकांपासून वेगळं करताच येत नाही. खरं तर बार्बा आणि
ओडिन ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. बार्बा म्हणजेच युजेनिओ बार्बा, ते एक
नाट्य-दिग्दर्शक, अभिनय प्रशिक्षक आणि नाट्य-तत्वचिंतक आहेत आणि ओडिन ही त्यांची
नाट्यसंस्था. आपल्या ओडिनमधल्या नटांसोबत त्यांनी अभिनय प्रशिक्षणाची आणि
नाट्यनिर्मितीची स्वतःची अशी खास, आगळी-वेगळी वाट विकसीत केली आहे. स्वतःच्या
कामाविषयी, तसंच एकूणातच रंगभूमीविषयी त्यांनी अनेक निबंध, लेख, पुस्तकं लिहिलेली
आहेत. 1964 मध्ये त्यांनी ओडिन ह्या नाट्य-संस्थेची स्थापना केली तेव्हापासून ते
आजपर्यंत त्यांनी जवळजवळ चाळीस नाटकं दिग्दर्शित केलेली आहेत. त्यातली काही
एकपात्री आहेत, तर काही अनेक पात्री आहेत (अनेक पात्री म्हणजे चाळीस ते पन्नास
कलांवत असलेली). त्यातली बरिचशी छोट्या, समिप नाटकघरांत सादर होणारी तर काही
मोकळ्या मैदानात सादर होणारी आहेत. नटाच्या कलेचा बारकाईने अभ्यास करण्यासाठी तसेच
त्या अभ्यासाच्या अजून वेगवेगळ्या शक्यता शोधण्यासाठी त्यांनी 1979मध्ये आंतरराष्ट्रीय
रंगभूमी मानवशास्त्र विद्यालयाची म्हणजेच इस्टाची (International School for Theatre Anthropology) स्थापना केली. द ड्रामा रिव्ह्यू, न्यू
थिएटर क्वार्टर्ली अशा नावजलेल्या रंगभूमीविषयक नियतकालिकांच्या
संपादक मंडळांचे ते सदस्य आहेत. आपल्या नाटकांचे प्रयोग करत, व्याख्यानं देत,
कार्यशाळा घेत ते जगभर हिंडत असतात. ते म्हणतात, ‘माझं शरीर
हाच माझा देश आहे, मी जगात कुठेही असलो, तरी माझ्याच देशात असतो.’ ओडिनची स्वतःची पुस्तक प्रकाशन संस्था आहे, त्याचप्रमाणे ही संस्था
रंगभूमाविषयक चित्रपटांचीही निर्मिती करते, डेन्मार्कमधल्या ज्या होल्स्टेब्रो
गावात त्यांची संस्था आहे, त्या गावच्या वार्षिक जत्रेचं संयोजन करते, जगभरातल्या
नाटकवाल्यांना आपल्या प्रशिक्षण शैलीचा परिचय करून देण्यासाठी ओडिन-वीकचं आयोजन
करते, महत्त्वाचं म्हणजे, ओडिनचे कलावंत जगभरातील उपेक्षित समाजघटकांसोबत
सादरीकरणाची देवाण-घेवाण करतात. एकूणात, बार्बा आणि ओडिन, नाटक आणि नाटकासोबत असे
अनेक उपक्रम करत असतात.
बार्बाचा जन्म 29 ऑक्टोबर 1936 रोजी इटलीच्या दक्षिण टोकाजवळच्या
ब्रिन्डिसी या बंदरावर झाला. त्यांचे वडिल सैन्यात होते. मुसोलिनीच्या बाजूने
त्यांनी अनेक युद्धांमध्ये भाग घेतला होता. बार्बा दहा वर्ष वयाचे असतानाच त्यांचे
वडिल वारले. वडलांचा वारसा पुढे चालवण्यासाठी त्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध
सैनिकी शाळेत पाठवण्यात आलं. पण तिथल्या कडक शिस्तीत त्यांचं मन रमेना. वयाच्या
चौदाव्या वर्षी, आयुष्यात पहिल्यांदा नाटक पाहिल्याचं त्यांना आठवतं. ह्या नाटकात
त्या वेळच्या फॅशनप्रमाणे एक खराखुरा घोडा होता. घोड्याच्या तुलनेत इतर नटांचे
हावभाव त्यांना फारच खोटे वाटले. इतर नट हसण्याचं, रडण्याचं, आश्चर्यचकित होण्याचं
अनुकरण करत होते, पण त्या अनुकरणात ना उर्जा होती, ना विश्वास. घोडा अर्थातच अभिनय
करत नव्हता, आपण कोणी दुसरे आहोत याची बतावणीही तो करत नव्हता. पण तरीही तो
रंगमंचावर महत्त्वाची भूमिका पार पाडत होता. त्याच्या हालचाली म्हणजे कोणाचं
अनुकरण नव्हतं. बार्बांच्या मते त्या खऱ्या कृती होत्या. त्या घोड्याची उर्जा आणि
त्याची मंचावरची उपस्थिती त्यांना महत्त्वाची वाटली. रंगमंचावरच्या नटाच्या
उपस्थितीला प्राधान्य देणाऱ्या रंगभूमीचा आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या प्रशिक्षण
पद्धतीचा बार्बांचा शोध ह्या घटनेपासून सुरू झाला, असं म्हणायला काही हरकत नाही.
कसंबसं त्यांनी सैनिकी शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर
इटलीच्या सैन्यात भरती व्हायच्या ऐवजी देश सोडला. खिशात पुरेसे पैसे नसताना,
रस्त्यांवरच्या वाहनांना लिफ्ट मागत, भटकत भटकत ते नॉर्वेत जाऊन पोचले. सुरुवातीला
तिथं त्यांनी काही हातमजूरीची कामं केली. नंतर एका मालवाहू जहाजावर खलाशी म्हणून
लागले, त्या नोकरीनिमीत्त ते जगाच्या अनेक भागांत फिरून आले. गाठीशी थोडे पैसै जमा
झाल्यावर त्यांनी ऑस्लोच्या विद्यापिठात प्रवेश घेतला. पैसै असेपर्यंत शिक्षण,
संपले की पुन्हा खलाशीगिरी, पैसे साचले की शिक्षण पुढे सुरू, असं करत करत त्यांनी
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. शिकत असतानाच त्यांना रंगभूमी माध्यमाची आवड
निर्माण झाली. पोलंडमधल्या वॉर्साच्या रंगभूमी प्रशिक्षण संस्थेत
नाट्य-दिग्दर्शानाचे शिक्षण घेण्यासाठी त्यांना युनेस्कोकडून शिष्यवृत्ती मिळाली
आणि ते पोलंडमध्ये आले. दुसरं महायुद्ध संपून जवळजवळ पंधरा वर्ष उलटून गेली होती.
क्षतीग्रस्त पोलंड मात्र अजूनही युद्धाच्या खुणा मिरवत होता. पडक्या इमारती,
वाळू-विटांचे ढीग, जुने-मोडके रणगाडे पाहून तरुण युजेनिओ व्यथित होऊन जाई. ह्या
पार्श्वभूमीवर शाळेत मात्र स्वच्छंदतावादी, श्रीमंती नाटक शिकवलं जात होतं. ह्या
विरोधाभासामुळे त्यांचं अभ्यासातलं लक्ष उडालं आणि ते शाळा बुडवून वॉर्साच्या
आजुबाजूच्या खेडोपाडी हिंडू लागले, जनजीवन न्याहाळू लागले. असंच एक दिवस, ओपोले या
गावात हिंडत असताना त्यांना एक नाटकघर दिसलं, कुतूहलापोटी ते नाटक बघायला गेले पण
त्यांना ते नाटक काही फारसं आवडलं नाही. नंतर उपहारगृहात त्यांची त्या नाटकाच्या
दिग्दर्शकाशी ओळख झाली. अर्थातच बार्बांनी नाटकाविषयीचं आपलं खरं मत सांगितलं,
त्यावर त्या तरुण नाट्यदिग्दर्शकानं आपण हे नाटक कसं केलं, त्याची तालिम कशी केली
हे सांगितलं. प्रक्रिया ऐकल्यानंतर बार्बांनी दिग्दर्शकाला तालमीला उपस्थित रहायची
परवानगी मागितली. त्या दिग्दर्शकाचं नाव होतं, येर्झी ग्रोटोव्स्की. तालमींमधली
नटांची प्रशिक्षणाची पद्धत पाहून त्यांना, खलाशी म्हणून हिंडत असताना दक्षिण
आशियात पाहिलेल्या नाट्यप्रकारांची विशेषतः कथकलीची आठवण झाली. अर्थात,
ग्रोटोव्स्कीच्या नटांना त्याची काहीच कल्पना नव्हती. नंतर दोन वर्ष त्यांनी
ग्रोटोव्स्कीचा सहाय्यक म्हणून काम केलं. तसं पाहिलं तर ग्रोटोव्स्की हे
बार्बांपेक्षा फक्त तीन वर्षांनी मोठे, पण आजही बार्बा ग्रोटोव्स्कींचा गुरू
म्हणून नम्रतेनं उल्लेख करतात. ग्रोटोव्स्कींचं अत्यंत महत्त्वाचं पुस्तक, टूअर्ड्स
पूअर थिएटर हे पुस्तक बार्बांनीच त्यांच्याकडून लिहून घेतलं आणि प्रकाशितही
केलं.
![]() |
| ग्रोटोव्स्कीसह ओडिनमध्ये. (छायाचित्र : रोअल्ड पे) |
पोलंडमधल्या व्हिसाची मुदत संपल्यानं त्यांना पुन्हा
नॉर्वेला यावं लागलं. रंगभूमीविषयक स्वतःच्या कल्पना आणि ग्रोटोव्स्कींकडून
शिकलेल्या तत्वांचं उपयोजन करण्यासाठी 1964 मध्ये त्यांनी ऑस्लो इथे ओडिन थिएटर या
नाट्यसंस्थेची स्थापना केली. परंतु एका अपरिचीत, अननुभवी, परदेशी तरुणाच्या
नाट्यसंस्थेत कोण जाणार? ऑस्लो
विद्यापिठाच्या नाट्य विभागात प्रवेश न मिळालेल्या सोळा तरुण तरुणींना घेऊन
त्यांनी संस्थेचं काम सुरू केलं. त्यातले बरेचसे बार्बांसारखेच बिगारी कामगार
होते. म्हणून दिवसा काम आणि रात्री थोडावेळ व शनिवार-रवीवार पूर्णवेळ यापद्धतीनं
प्रशिक्षण सुरू केलं. हळूहळू नटांची संख्या कमी होत होत चारवर आली. महत्त्वाची
गोष्ट अशी की त्यातले दोन नट अगदी आत्ता-आत्तापर्यंत आजही बार्बासोबत ओडिनमध्ये
काम करत होते (टॉर्गेर वेथॉल या नॉर्वेजीय नटाचं काही वर्षांपूर्वी निधन झालं, पण
जवळजवळ पंचेचाळीस वर्ष ते ह्या संस्थेत बार्बांबरोबर काम करत होते). अपुरी जागा,
अपुरे आर्थिक पाठबळ असूनही ओडिनने आपले प्रशिक्षणाचे आणि नाट्यनिर्मितीचे काम सुरू
ठेवले. उरलेल्या चार नटांना घेऊन ओडिननं आपलं पहिलं नाटक सादर केलं, ऑरनिटोफिलेन
म्हणजेच पक्षीप्रेमी.
या नाटकाचे त्यांनी युरोपातील अनेक देशांत प्रयोग केले. ते
डेन्मार्कच्या दौऱ्यावर असताना होल्स्टेब्रो गावातल्या एका परिचारिकेनं त्यांचं
नाटक पाहिलं आणि त्यांना आपल्या गावी प्रयोग करायला बोलावलं. गावच्या पंचायतीला
नाटक आवडलं. त्यांनी ओडिनला थोडी जागा आणि वर्षाकाठी थोडी आर्थिक मदत देऊ केली आणि
1966 पासून बार्बा त्यांच्या ओडिनसह होल्स्टेब्रोला स्थायिक झाले. पहिल्या चारपैकी
दोन नट त्यांच्यासोबत डेन्मार्कला आले, शिवाय अजून काही नवीन नट त्यांना येऊन
मिळाले. नव्या-जुन्या नटांसह ओडिनचे प्रशिक्षणाचे आणि नाट्यनिर्मितीचे काम ह्या
नव्या जागेत जोमात सुरू झाले.
ओडिनची नाट्यनिर्मिती पद्धत अगदी विलक्षण आहे. दिग्दर्शक
बार्बा आधी आपल्या नाटकाचे आशयसूत्र ठरवतात. त्यानुसार ओडिनचे कलावंत आपापले
शारीरिक आणि वाचिक उत्स्फुर्ताविष्कार तयार करतात. बार्बा त्या सगळ्यांची सांगड
घालतात आणि नाट्यप्रयोग उभा राहतो. एक नाटक उभे राहण्यासाठी साधारणपणे अडिच ते तीन
वर्षांचा कालावधी लागतो. मीन फार्स हूस (1972) हे नाटक दस्तायवस्कीच्या
साहित्यकृतींवर आणि जीवनावर आधारित होतं. कम अँड द डे विल बी अवर्स (1976)
हे नाटक एकोणिसाव्या शतकातील अमेरिकेतल्या युरोपिय स्थलांतरीत आणि मुळ अमेरिकी
रहिवासी ह्यांच्या संघर्षावर आधारित होतं. बेर्टोल्ट ब्रेख्तचं आयुष्य आणि त्यांची
राजकिय विचारधारा हे आशयसूत्र ठरवून 1980 मध्ये ओडिननं ब्रेख्तस् ऍशेस ह्या
नाटकाची निर्मिती केली. इन द स्केलेटन ऑव्ह द व्हेल (1996), ज्युडिथ (1986)
ही नाटकं बायबलमधल्या काही प्रसंगांवर आधारित होती. अँडरसन्स ड्रिम (2004)
ह्या नाटकात हॅन्स ख्रिश्चन अँडरसन्सच्याच नाही तर एकूणच परिकथा विश्वाचा समावेश
आहे. द ग्रेट सिटीज अंडर द मून (2006) ह्या नाटकाचा विषय अमेरिकेनं जगावर
लादलेली युद्धं हा आहे.
![]() |
| ओडिन थिएटर, होल्स्टेब्रो (छायाचित्र : प्रवीण भोळे) |
आपली विशिष्ठ प्रशिक्षण पद्धती हे ओडिनचं एक महत्त्वाचं
वैशिष्ट्य आहे. ओडिनच्या वैशिष्ट्यपूर्ण तालिमप्रक्रियेच्या आणि नाट्यनिर्मितीच्या
मागे प्रशिक्षण हा एक महत्त्वाचा घटक आहे. ओडिनच्या संदर्भात प्रशिक्षण हा शब्द
जेव्हा येतो तेव्हा ओडिन ही एखादी अभिनयाचं प्रशिक्षण देणारी संस्था असावी असा
गैरसमज होऊ शकतो, पण तसं काही नाही. ओडिनचे नट हे स्वतःच स्वतःला प्रशिक्षित करत
असतात. आणि केवळ प्रशिक्षण नाही तर निरंतर प्रशिक्षण हा त्यांचा विशेष आहे. या
प्रशिक्षणात नट कोणते नवीन तंत्र शिकत नाही तर नवनवीन शारीरिक कौशल्यं विकसीत करत
असतात. म्हणजे ते बैजिंग ऑपेराच्या नटांप्रमाणे कसरती शिकत नाहीत किंवा भारतीय
शास्त्रिय नृत्यासारखी चिन्हभाषा शिकत नाहीत. कोणताही विशिष्ठ अभ्यासक्रम
स्विकारलेला नसल्यामुळे ओडिनची शिक्षणपद्धती तत्वकेंद्री आणि सर्वसमावेशक झालेली
आहे. कोणत्याही पद्धतीच्या अनुकरणाला किंवा सजावटीला त्यात वाव नाही. शरीरातली
उर्जा कशी वापरावी, तोल कसा साधावा, प्रेरणेच्या सहाय्याने कृती कशी निर्माण करावी
अशा मूलभूत तत्वांचा त्यात समावेश असतो. या मूलभूत तत्वांना चिटकून रहात, नवीन
गोष्टी शोधणं आणि जमिनीवर न पडता तोल सांभाळायची कृती करणं, मोकळ्या मैदानात
आवाजाचा योग्य वापर करणं – अशा समस्यांमधून मार्ग काढायसाठी त्यांना नवीन वाटा
शोधाव्या लागतात. अशा प्रकारे , त्यांच्या प्रशिक्षणाच्या भात्यात नवनवीन
अभ्यासांची, स्वाध्यायांची भर पडत जाते. ओडिनची ही पद्धत निवडवादी तर आहेच पण
बहुसांस्कृतिक आणि सर्वसमावेशक अशी आहे. पृथ्वीवरच्या वेगवेगळ्या प्रांतामधल्या
कलांमधल्या मूलभूत तत्वांमधून निवड करून बार्बा परंपरेतले नट ह्या सर्व आयात
तत्वांचा आपल्या अभिनयात उपयोग करतात. प्रामुख्याने कथकली, ओडिसी, छाऊ, नोह, बाली नृत्य,
काबूकी ह्या आशियायी प्रयोगकलांमधून अनेक तत्वं त्यांनी घेतलेली आहेत.
बार्टर हा ओडिनचा अजून एक विशेष. समाजातील वंचित वर्गाला
नाटकांचे प्रयोग पहाणं परवडत नाही, त्यांना फुकट काही दाखवणं हा त्यांच्या
स्वाभिमानावर हल्ला असू शकतो. अशा वेळेस ओडिनचे नट काय करतात? ते अशा वस्त्यांमध्ये जातात, तिथल्या
लोकांना आपले खेळ करून दाखवतात आणि त्यांना त्यांचे खेळ करायला लावतात,
त्यांच्याकडून त्यांची गाणी, नाच शिकतात. अशा प्रकारे सादरीकरणाची देवाण-घेवाण
होते, एक सामाजिक अभिसरण घडून येतं.
गेल्या वर्षी ओडिनला पन्नास वर्ष पूर्ण झाली, लवकरच
बार्बांचंही वय ऐशी होईल. बार्बांच्या तरुणपणीची आणि ओडिनच्या जन्मापासूनची
स्वतःला प्रशिक्षित करण्याची आस मात्र आजही कायम आहे. अभिनयाची कला शिकून साध्य
करता येते यावर बार्बांचा आणि सर्व ओडिनवाल्यांचा दृढ विश्वास आहे.
नाट्यप्रयोगांना केवळ साध्य न समजता, त्यांच्या थांब्यांवर क्षणभर थांबत ही
प्रशिक्षणाची गाडी सतत सुरूच आहे.
अशी ही बार्बांची, तितकीच
ओडिनचीही गोष्ट. आभाळातून तीन फळं खाली पडली. पहिलं मिळालं अर्थातच बार्बांच्या
नटांना, दुसरं ही गोष्ट वाचणाऱ्यांना आणि तिसरं मिळेल ते ह्या गोष्टीतून बोध घेऊन
कार्यप्रवृत्त होतील अशा नटांना.
