शुक्रवार, २० मार्च, २०२०

नाटक - रंगभूमी परिचय : १६. पौराणिक, ऐतेहासिक आणि सामाजिक नाटक

नाटक - रंगभूमी परिचय : १६. पौराणिक, ऐतेहासिक आणि सामाजिक नाटक
. पौराणिक नाटक : नाट्यांतर्गत काळ जर पुराण काळ असेल तर ते नाटक पौराणिक ठरते. नाटकांच्या कथानकांचा मूलस्त्रोत प्राचीन ग्रंथ, पुराणे महाकाव्ये हा असतो. पौराणिक नाटक दूरवरच्या भूतकाळाचा आभास निर्माण करते. त्यांत सर्वसामान्य माणसांपेक्षा कित्येक पटींनी उत्तुंग असलेली पुराणकथांमधील व्यक्तिरेखा, समग्र समाजाला ग्रासून टाकणारा प्रचंड संघर्ष आणि या संघर्षातील अतीमानवी भाग यांचा समावेश असतो. जवळजवळ सर्वच प्रांतांमधील रंगभूमीवर पौराणिक नाटके निर्माण झालेली दिसतात. सृष्टीविषयी वाटणाऱ्या कुतुहलापोटी रंगभूमीचा जन्म झालेला असल्यामुळे या सृष्टीचे गूढ उकलू पाहणाऱ्या पुराणकथा आणि त्यांच्यातील अतिविशाल व्यक्तिरेखा सुरुवातीच्या काळांत प्रत्येक प्रांतातील नाटकांच्या विषय ठरल्या. भारतात प्रादेशिक रंगभूमीचा उगम झाल्यानंतर पुराणकथांनी आख्यानकाव्यांमधून रंगभूमीवर प्रवेश घेतला. पौराणिक नाटकांमधील कथा परंपरेने चालत आलेल्या आणि प्रेक्षकांना अगोदरच परिचीत असणाऱ्या असल्यामुळे त्या पुन्हा एकदा करून दाखविण्यामागे आणि पाहण्यामागे धार्मिक श्रद्धा असतात. उदा., दशावतार, रामलीला असे लोकरंगभूमीवरील प्रकार. त्यातील चमत्कार आणि अतिमानवी घटकांमुळे त्या अत्यंत मनोरंजक झालेल्या असतात. शिवाय पारंपरिक कथेचे नवे अर्थनिर्णयन करून त्यायोगे आजच्या जगण्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न असतो. उदा. गिरिश कार्नाड यांचे ययाती हे नाटक. रंगीबेरंगी वेषभूषा,दाढ्या-मिशांनी युक्त रंगभूषा, शिरोभूषणे, देखाव्यांचे पडदे, प्रसंगी नृत्य-संगीताचा वापर, आनंद, दुःख, राग, भीती अशा स्थूल भावना दाखविणारा अभिनय, सहज सोपे, सुगम आणि रसाळ संवाद हे साधारणपणे मराठी पौराणिक नाटकाच्या मंचनपद्धतीचे विशेष होय. संगीत सौभद्र, संगीत स्वयंवर, ययाती आणि देवयानी ही मराठीतील काही प्रख्यात पौराणिक नाटके आहेत.
. ऐतेहासिक नाटक : ज्ञात काळातील इतिहासातील व्यक्ती आणि घटनांवर आधारित नाटकांना ऐतेहासिक नाटक म्हणतात. इतिहासातील एखादा संघर्षमय किंवा नाट्यमय प्रसंग अथवा स्थिती यांचे चित्रण ऐतेहासिक नाटकांमधून केले जाते. परंतु ऐतेहासिक नाटक म्हणजे इतिहास नव्हे. इतिहासातील एखाद्या व्यक्तिमत्वाच्या किंवा घटनेच्या अवतीभवती काही काल्पनिक पात्रांचा किंवा प्रसंगांचा समावेश ऐतेहासिक नाटकात असतो. ऐतेहासिक नाटकातील प्रत्येक व्यक्ती विशिष्ट स्थळ, काळ परिस्थितीशी निगडित असते म्हणून प्रेक्षकांना त्यांचा पूर्वपरिचय असतो. या परिचयाहून वेगळे वर्णन नाटकात आल्यास ते नाटक वादग्रस्त ठरू शकते. जे घडून गेले त्याचा परिचय करून देणे, इतिहासातील व्यक्तिरेखांचे उदात्तीकरण करणे, राष्ट्रभावना देशप्रेम जागृत करणे, प्रेक्षकांना स्मरणरंजनात रमविणे, किंवा ऐतेहासिक घटनेच्या निमित्ताने वर्तमानकालिन घटनेचा अर्थ लावणे, . ऐतेहासिक नाटकांची उद्दिष्टे असू शकतात. ऐतेहासिक नाटकांचे विशिष्ट काळ उभी करणारी किंवा विशिष्ट व्यक्तीचा परिचय करून देणारी रंग-वेशभूषा, ढाली, तलवारी, भाले अशा मंचवस्तू, यमक, ऐतेहासिक भाषा, त्या त्या काळातील प्रांतांतील आचारपद्धती, अभिवादने, अनुप्रास अलंकारंनी युक्त लांबलचक, पल्लेदार संवाद, त्यानुसार केला जाणारा जोशयुक्त वाचिक अभिनय, राग, शौर्य, उत्साह, भीती, . स्थूल भावनांचा भावाभिनय, . मंचनविशेष सांगता येतील.राजसंन्यास (नाटककारराम गणेश गडकरी), रायगडाला जेव्हा जाग येते (नाटककार - वसंत कानेटकर), पानिपत (नाटककारविश्वास पाटील) ही मराठीतील ऐतेहासिक नाटकांची उदाहरणे आहेत. विजय तेंडूलकर लिखित घाशिराम कोतवाल नाटकात संगीत, नृत्य घटकांचा वापर करून बिनवास्तवतावादी पद्धतीने इतिहासकाळामधील घटना दाखवून त्या घटनेचा तत्कालीन अर्थ लावून दाखविण्यात आला होता
. सामाजिक नाटक : नाट्यांतर्गत काळ हा ज्या काळात नाटक सादर होते तो काळ असल्यास ते नाटक सद्यकालिन किंवा सामाजिक नाटक ठरते. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात रंगभूमीवर वास्तवतावाद आल्यांनंतर भवतालच्या परिचित विश्वाचे प्रतिबिंब उमटविणारी आपल्यासारखीच माणसे रंगमंचावर असणारी सामाजिक नाटके मोठ्या संख्येने लिहिली जाऊ लागली आणि मंचित होऊ लागली. विविध पात्रे, त्यांच्या कृती आणि एक ठराविक कालखंड या नाटकांमधून रंगवलेला असतो. त्या कालखंडातील, त्या समाजातील समस्या, प्रश्न किंवा मुद्दे मांडणे हे सामाजिक नाटकाचे उद्दिष्ट असते. योजलेल्या स्थळ, काळाचे अनेक तपशिल पात्रांच्या कपड्यांच्या तऱ्हा, वागण्याची पद्धत, बोलण्याची भाषा, . घटकांद्वारे रंगविलेले असतात. प्रेक्षकांना लगेचच संदर्भ जोडता येतील अशा परिचित स्थितींचे वर्णन सामाजिक नाटकांमधून केलेले असते. या नाटकातील कथानकांना विशिष्ट सामाजिक संदर्भ असतो. विविध व्यवसायाची, वयाची, स्वभावाची माणसे असलेला समाज साधारणेपणे अतिनाट्याच्या पद्धतीने आणि सूचक रितिने रंगविलेला असतो. एका विशिष्ट सामाजिक वातावरणाची निर्मिती या प्रकारच्या नाटकांमध्ये महत्त्वाची ठरते. समाजव्यवस्थेचा माणसांच्या जगण्यावर होणारा परिणाम सामाजिक नाटके दाखवित असतात. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्रात रूढ असलेल्या जरठ-बाला विवाह पद्धतीमधील अनिष्टपणा दाखवून त्यावर टिप्पणी करण्याचे काम गो. . देवल यांनी लिहिलेल्या शारदा या नाटकाने केले, तो मी नव्हेच या नाटकाच्या निमित्ताने प्र. के. अत्रे यांनी विवाह संस्थेतील दांभिकपणावर कोरडे ओढले आहेत. अजित दळवी यांचे डॉक्टर तुम्हीसुद्धा हे नाटक उदात्त समजल्या जाणाऱ्या वैद्यकिय व्यवसायातील अनुचित प्रकारांवर प्रकाश टाकते. प्रशांत दळवी यांचे चारचौघी हे नाटक स्त्रियांच्या स्वतंत्रपणे जगण्याविषयीचे आणि निर्णय घेण्याविषयीचे प्रश्न उपस्थित करते. अधांतर या नाटकामधून जयंत पवार मुंबईच्या लालबाग-परळ भागातील बंद पडलेल्या कापड गिरण्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या पुढच्या पिढीच्या प्रश्नांचा, समस्यांचा वेध घेते. नाटक ही समुहाने आस्वाद घेण्याची कला असल्यामुळे सामाजिक किंवा सद्यकालिन नाटकांद्वारे समाजाची सद्यस्थिती मांडून नाटकांद्वारे समाजपरिवर्तन घडवता येऊ शकते, असा विश्वास सामाजिक नाटक सादर करणाऱ्यांना असतो. आजुबाजूच्या परिचित जगाचे दर्शन असल्यामुळे ही नाटके लोकप्रिय असतात. बऱ्याचदा या नाटकांच्या शेवटी समाजातील प्रश्नांना किंवा समस्यांना उत्तरे सुचविली जातात तर अनेक वेळा केवळ परिस्थितीचे दर्शन घडवून निर्णय काय होऊ शकेल हे प्रेक्षकांवर सोपविले जाते. सद्यकालिन नाटक हे त्या त्या काळातील समाजाविषयीचे असल्याने ते कालसापेक्ष असते. समाजातील रूढी, परंपरा बदलल्यास ते नाटक जुने वाटते.

- प्रवीण भोळे
प्राध्यापक आणि विभागप्रमुख
ललित कला केंद्र, गुरुकुल
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ४११ ००७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अभिनयाच्या किमयाशाळा

  अभिनयाच्या किमयाशाळा १ . प्रयोगशाळा : एक अवकाश अवकाश म्हणजे जागा , जिथे काहीतरी सामावले जाते असे काहीतरी , म्हणजे प्रयोगशा...