नाटक - रंगभूमी परिचय : १४. नाटकांचे वर्गिकरण
कला या संकल्पनेप्रमाणेच नाटक या संकल्पनेचीदेखील एकच एक व्याख्या करता येणे अवघड असते. याचे एक कारण नाटक या शब्दाने आपण कोणत्या विशिष्ट कलाप्रकाराचा उल्लेख करित असलो तरी वेगवेगळ्या काळांत आणि वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या प्रकारचे नाटक आकाराला आले. शिवाय आशय, विषय, कथानक, व्यक्तिरेखा, नाट्यातंर्गत काळ, सादरीकरणासाठी लागणारा वेळ, सादरीकरणाची जागा, सादरीकरणाचा हेतू अशा अनेकाविध कारणांमूळे त्या त्या प्रकारातील नाटकांचे स्वरूप, नाट्यलिखाणाची शैली आणि सादरीकरणाच्या पठड्या निरनिराळ्या असू शकतात. स्थूलमानाने त्या त्या प्रकारातील नाटकाच्या स्वरूपाची कल्पना येण्यासाठी नाटकांचे वर्गिकरण करता येते. अर्थात, ते केवळ सोयीकरीता असते. प्रत्येक वर्गाची व्याख्या करता येणेदेखील अवघडच असते, शिवाय एकच नाटक एकापेक्षा जास्त वर्गांमध्ये येऊ शकते. वेगवेगळ्या स्वरूपाच्या परिमाणांच्या किंवा निकषांच्या सहाय्याने वेगवेगळी वर्गिकरणे संभवतात.
नाटक - रंगभूमी परिचय : १५. शोकात्मिका, सुखात्मिका
अ. शोकात्मिका : शोकात्मिका हा माणसाच्या जिवनात दुःख आहे हे दाखविणारा नाट्यप्रकार आहे. नाटकातील प्रमुख पात्राचा शोकात्म अंत किंवा विनाश घडवून आणणाऱ्या गंभीर आणि महत्त्वपूर्ण कृतीचे चित्रण करणारी नाट्यात्म कृती म्हणजे शोकात्मिका असे विवेचन ऍरिस्टॉटल या तत्त्वज्ञाने त्याच्या काव्यशास्त्र या ग्रंथात केलेले आहे. इस्किलस, सोफोक्लिज आणि युरिपिडिज या ग्रीक नाटककारांनी या प्रकाराचे विपूल लेखन केले.
शोकात्मिका या प्रकाराचा ठळकपणे उठून दिसणारा विशेष म्हणजे दुःखपूर्ण शेवट. हा शेवट प्रमुख पात्राच्या भीषण मृत्यूत किंवा दारुण दुःस्थितीत होतो.परंतु केवळ तसा शेवट असलेले प्रत्येक नाटक हे शोकात्मिका ठरत नाही. शोकात्मिकेत मानवाचे या विश्वाशी असलेले नाते चित्रित केलेले असते. मानव अंतिम शक्तिसमोर पराधीन आणि अगतिक असला तरी त्या शक्तीचे गूढ जाणण्याची त्याला दुर्दम्य इच्छा असते. त्यामुळे तो तिला एकतर सामोरा जातो किंवा तिचे आव्हान स्विकारतो आणि मानव विरुद्ध प्रबळ शक्ती असा संघर्ष निर्माण होतो. या संघर्षात मानवाचा पराभव होतो, आणि त्याच्या दुःखाच्या अटळतेवर शिक्कामोर्तब होते. त्या अर्थाने शोकत्मिकांमधील घटना अपरिहार्य असतात. शोकात्मिकेतील पात्रे आपल्यावर आलेली संकटे दूर लोटायचा प्रयत्न करतात, परंतु जेवढा ते अधिकाधिक प्रयत्न करतात, तेवढे अधिकाधिक ते त्यात खेचले जातात.
भव्योदात्तता हे शोकात्मिकेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे शोकात्मिकेची भाषा काव्यात्म असते. नंतरच्या काळात मात्र या काव्यात्मकतेचे प्रमाण कमी झालेले दिसून येते. प्रेक्षकांवरील परिणामाच्या दृष्टीने शोकात्मिकेत करुणा आणि भय या भावनांना महत्त्व असते. या भावनांच्या उत्कट परिणामांसाठी शोकात्मिकेचा नायक आहे त्याहून मोठा रंगविण्याची प्रथा ग्रीक नाटककारांमध्ये होती.
प्राचीन भारतीय नाट्यवाङ्मयामध्ये करुण रसाचा उल्लेख असला तरी शोकात्मिका मात्र नाहीत. सोळाव्या शतकात इंग्लंडमध्ये आणि त्यानंतर विसाव्या शतकात पाश्चिमात्य देशांमध्ये शोकात्मिकांचे लेखन झालेले दिसून येते.
शोकात्मिकांचे काळांनुसार तीन प्रकार पडतात. ग्रीक शोकात्मिका नियतीनिष्ट शोकात्मिका मानल्या जातात, त्यांच्यात मनुष्य आणि नियती हा संघर्ष दिसून येतो.अहंकार आणि अज्ञानामुळे मनुष्य त्याच्याहून श्रेष्ठ अशा नियतीला आव्हान देतो आणि त्यामुळे त्याचा विनाश होतो, असे ग्रीक शोकात्मिकांमध्ये रंगविलेले असते. शेक्सपिअरने लिहिलेल्या शोकात्मिका या स्वभावनिष्ट शोकात्मिका समजल्या जातात. त्यांमध्ये मनुष्याच्या स्वतःतील स्वभावदोषामुळे तो विनाशाचे कारण ठरतो. हॅम्लेटची निर्णय घेता न येण्याची क्षमता, मॅकबेथची अतिमहत्त्वाकांक्षा, लियरचे आंधळे प्रेम किंवा ऑथेल्लोच्या मनातील संशय हे त्यांचे स्वभावदोष त्यांची शोकात्मिका घडवून आणतात. गेल्या शतकात लिहिल्या गेलेल्या शोकात्मिकांना आधुनिक शोकात्मिका असे म्हटले जाते. येथे माणसाची नियती किंवा त्यांचे स्वभावदोष शोकात्मिकेचे कारण ठरत नाहीत तर आजुबाजूच्या परिस्थितीमुळे पात्रांची शोकात्मिका अपरिहार्य असते म्हणून त्यांना सामाजिक शोकात्मिका असेदेखील म्हटले जाते. ऑर्थर मिलरने लिहिलेले डेथ ऑफ अ सेल्समन किंवा मराठीमधील जयंत पवार लिखित अधांतर या आधुनिक शोकात्मिकाआहेत.
आ. सुखात्मिका : सुखात्मिका हा शेवट गोड होणारे कथानक असलेला, मनोरंजन करण्याच्या हेतूने खेळकर शैलीत रचलेला, हलकाफुलका नाट्यप्रकार असतो. सुखात्मिका बहुतेक वेळा प्रेक्षकांना हसविणाऱ्या असतात. मनुष्याचा स्वभाव आणि त्याचे वागणे, बोलणे, त्याचे विचार यांच्या सुखद नाट्यदर्शनाला सुखात्मिकेत महत्त्व असते. सुखात्मिका या बव्हंशी आशावादी असतात, प्रेक्षकांना दिलासा देणाऱ्या असतात. सुखात्मिकेत दुःखाकडून सुखाकडे होणारा प्रवास दाखविलेला असतो. जीवनातील ताण निर्माण करणारे प्रसंगदेखील सुखात्मिकेत प्रक्षकांना सुखद वाटतील अशा पद्धतीने रंगविलेले असतात. सुखात्मिका मानवी जीवन जगण्याच्या प्रेरणेचा आविष्कार करीत असते. मानवी जीवनातील चैतन्यमयतेला चित्रित करीत असल्याने आनंद आणि हास्य यांचा आविष्कार सुखात्मिकेत असतो. सुखात्मिका मानवी जीवनातील विसंगतीवर प्रकाश टाकते आणि शेवटी त्यांचे विसर्जन करीत सुखात रुपांतर घडवून आणते. सुखात्मिकांमध्ये माणसाच्या हातून होणाऱ्या चुका, मूर्खपणा, असहिष्णूता, सुधारता येतील असे दोष, व्यक्ती-व्यक्तींमधील विसंवाद, इ. गोष्टी हास्यास्पद कशा होत जातात ते दाखविलेले असते.
शोकात्मिकांप्रमाणेच सुखात्मिकांचे मूळ प्राचीन ग्रीक नाटकांमध्ये आहे. ओळीने तीन शोकनाटके सादर केल्यानंतर दिवसाच्या शेवटी प्रेक्षकांना हसविणारे सुखात्म असे सॅटिर नाटक सादर करायची परंपरा होती. ऍरिस्टोफेनस व मिनॅन्डर या ग्रीक नाटककारांनी आणि प्लॉटस व टेरेन्स या रोमन नाटककारांनी सुखात्मिकेला परिणत स्वरूप दिले. याच सुखात्मिकांपासून प्रेरणा घेऊन सोळाव्या ते अठराव्या शतकापर्यंत शेक्सपिअर, बेन जॉन्सन, मोलिएर, कॉग्निव्ह, इ. नाटककारांनी सुखात्मिका या नाट्यप्रकाराला विविधांगांनी समृद्ध केले.
शोकात्मिकेशी तुलना केली असता, सुखात्मिकेची अनेक वैशिष्ट्ये स्पष्ट होतात. जसे, शोकात्मिकेत माणसाच्या अलौकिक गुणाचे दर्शन असते, तर सुखात्मिकेत त्याच्या लौकिक दोषांचे दर्शन असते. शोकात्मिकेत जीनवातदुःखअटळ असते असे दाखविलेले असते, सुखात्मिकेत दुःख टाळता येईल असा दिलासा दिला जातो. शोकात्मिका मनाची घालमेल वाढवते तर सुखात्मिका मनावरील ताण हलका करते. शोकात्मिकेत माणूस बलिष्ठ शक्तीशी एकाकी झुंज देत असल्याने ती व्यक्तिकेंद्री असते तर सुखात्मिकेमधील संघर्ष सामाजिक स्वरूपाचा असल्यामुळे ती समाजलक्ष्यी असते. शोकात्मिकेचे आवाहन सार्वकालिन, सार्वजनिन असू शकते, सुखात्मिका मात्र विशिष्ट काळात, विशिष्ट समाजात जेवढ्या लागू होतात तेवढ्या सगळीकडे आणि सगळ्या काळांमध्ये लागू होतीलच असे नाही. शोकात्मिकेत नायक हा आहे त्याहून मोठा भासतो, तर सुखात्मिकेतील सगळीच पात्रे आहे त्याहुन छोटी, कोणतेतरी न्यून असलेली रंगविलेली असतात. प्रेक्षकांना शोकात्मिकेतील नायकाविषयी आदर वाटतो आणि त्याच्या परिस्थितीविषयी हळहळ वाटते तर सुखात्मिकेतील पात्रांविषयी गंमत वाटत असते. शोकात्मिकेचे आवाहन मुख्यतः भावनेला असते तर सुखात्मिका विचारांना आवाहन करते.
सुखात्मिकेचे तीन प्रमुख प्रकार मानले जातात. पहिला प्रकार वृत्तीप्रधान सुखात्मिका. या प्रकारांच्या सुखात्मिकेत व्यक्तींच्या विशिष्ट स्वभाववृत्तींमधून विनोद निर्माण होता. उदा., गो. ब. देवलांच्या संशयकल्लोळ नाटकात नायक फाल्गुनरावाच्या कोणत्याही गोष्टींचा संशय घेण्याच्या स्वभावामुळे विनोदी प्रसंगांची मालिकाच उभी राहते. या सुखात्मिका परिस्थितीजन्य असतात. त्यांच्यामधील समस्या अवास्तव पद्धतीने ताणल्या जातात पण शेवटी सगळे घोटाळे आणि गैरसमज दूर होतात. सुखात्मिकांचा दुसरा प्रकार म्हणजेआचारविडंबन करणारी सुखात्मिका. ही अधिक बौद्धिक आवाहन करणारी असते. या सुखात्मिकेतील विनोद तत्कालीन आचार-विचार, सामाजिक दोष किंवा शिष्ट, बढाया मारणारे, कंजूष यांसारख्या व्यक्तिनमुन्यांवर आधारित असतो. स्वतःचामोठेपणा मिरवत असताना आपला छोटेपणा वेशीवरटांगणारीउच्चभ्रू समाजातील पात्रे, चतुर आणि हजरजबाबी संवाद, चातुर्यपूर्ण विनोद यांच्यावर भर असतो. उदा., प्र. के. अत्रे लिखित साष्टांग नमस्कार, पु. ल. देशपांडे लिखित तुझे आहे तुजपाशी, इ. तिसरा प्रकार म्हणजे कारस्थानप्रधान सुखात्मिका. एकमेकांविरुद्ध रचलेली कारस्थाने आणि त्यासाठी केलेल्या खटपटी यांना त्यात अग्रस्थान असते.
इ. फार्स किंवा प्रहसन : हा सुखात्मिकेचाच एक प्रकार असतो. फार्स सादर करण्याची प्रथा इंग्लंडमध्ये होती, तिच्या प्रभावाने मराठीतही ही पद्धत सुरू झाली. प्रहसनाचा मुख्य भर विनोदनिर्मितीवर असतो आणि काय वाट्टेल ते करुन प्रेक्षकांना हसविणे हेच या प्रकाराचे उद्दिष्ट असते. अतिशयोक्ती, असंभवनिय घटना, विदुषकी चाळे, अंगविक्षेप, शाब्दिककोट्या, पात्रांच्या जलद हालचाली, धावपळ, वेड्यावाकड्या मुद्रा, द्वयर्थी बोलणे, इ. प्रहसनाची वैशिष्ट्ये आहेत. प्रहसनात व्यक्तिरेखा, कथानक यांना फारसे महत्त्व नसते. प्रहसनाची कथावस्तूगुंतागुंत वाढवत नेणाऱ्या घटनांनी युक्त असते. प्रहसनांमध्ये नटांची शारीरिकता आणि समयसूचकता महत्त्वाची असते. नाटकातील पात्रे आगमन-निर्गमनासाठी बऱ्याचदा दारांऐवजी खिडक्या किंवा अन्य ठिकाणांचा वापर करतात, कपाटांमध्ये, बिछान्याखाली, पेट्यांमध्ये लपतात. वेषांतर हे बऱ्याच प्रहसनांचे महत्त्वाचे लक्षण आहे. मराठीत बबन प्रभूंचे झोपी गेलेला जागा झाला, प्र. के. अत्रेंचे भ्रमाचा भोपळा ही प्रहसने विशेष प्रसिद्ध आहेत.
ई. मेलोड्रामा किंवा अतिनाट्य : एकोणिसाव्या शतकात गाणी असलेल्या नाटकांना मेलोड्रामा म्हणत असत, हळूहळू त्याच्यातील संगीत बाजूला पडले आणि आश्चर्यचकित करणारे प्रसंग व थरारक किंवा रोमांचक शेवच असणाऱ्या सर्वच नाटकांना मेलोड्रामा किंवा अतिनाट्य म्हटले जाते. नेपथ्य, रंगमंच सजावट, पात्रांचे पोषाख, पात्रांचा शैलीदार अभिनय तसेच अत्यंत आदर्श किंवा अत्यंत वाईट अशी ठोकळेबाज पात्रे, लक्षवेधी घटना, नाट्यपूर्ण प्रसंग, क्रौर्य, दुःख आणि विनोद यांची सरमिसळ, सत्प्रवृत्त पात्रांचा दुष्ट स्वभावाच्या पात्रांनी केलेला छळ ही अतिनाट्याची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. नाटकांत नायक सर्व पातळ्यांवर पराभूत होऊन खलनायकाचा विजय होणार असे वाटत असतानाच घटना प्रसंगांना कलाटणी मिळते आणि शेवटी नायक विजयी होतो. याकरिता अतिनाट्यांमध्ये योगयोग आणि पात्रांचे स्वभाव परिवर्तन ही सामग्री वापरली जाते. पल्लेदार संवाद, चेहऱ्याच्या हालचाली आणि वाचिकातून साधणारा उत्कट भावभिनय, थरारक पार्श्वसंगित व प्रकाशयोजना ही अतिनाट्याच्या मंचनाची काही प्रमुख वैशिष्ट्ये होत. मराठीत राम गणेश गडकरी लिखित भावबंधन, बाळ कोल्हटकर लिखित वाहतो ही दुर्वांची जुडी, वसंत कानेटकर लिखित अश्रुंची झाली फुले, इ. काही गाजलेली अतिनाट्ये आहेत.
- प्रवीण भोळे
प्राध्यापक आणि विभागप्रमुख
ललित कला केंद्र, गुरुकुल
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ४११ ००७
प्राध्यापक आणि विभागप्रमुख
ललित कला केंद्र, गुरुकुल
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ४११ ००७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा