शुक्रवार, २० मार्च, २०२०

नाटक - रंगभूमी परिचय : १३. आधुनिक रंगभूमी

नाटक - रंगभूमी परिचय : १३. आधुनिक रंगभूमी
एकोणिसाव्या शतकात जागतिक पातळीवर अनेक घडामोडी घडल्या. १८१५ मध्ये नेपोलिअनचा पाडाव झाला. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्त्वे उगम पावली तशी हळूहळू धुसरदेखील होऊ लागली. औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली. शहरांमध्ये कामगारवर्ग मोठ्या संख्येने उदयास आला. शहरी अर्थव्यवस्थेशी जमवून घेता आल्यामुळे गरिबी आणि गुन्हेगारी यांचे प्रमाण वाढले.
ऑगस्ट कॉम्त या तत्त्वज्ञाने जगातील सर्व ज्ञानशाखांचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठीच व्हावा असे प्रतिपादन केले. त्यातून सामाजिक शास्त्र ही नवीन ज्ञानशाखा उदयास आली. १८५९ मध्ये चार्ल्स डार्विन या जीवशास्त्रज्ञाने जैविक उत्क्रांतीचा सिद्धान्त मांडला. १८९९ मध्ये सिग्मंड फ्रॉइडने मनोविश्लेषणाचा सिद्धान्त मांडला. या सर्व बाबींचे पडसाद तत्कालीन कलाव्यापारावर आणि नाट्यकलेवर पडले.
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात नाटकांमध्ये दिग्दर्शक या संकल्पनेचा उगम झाला. त्या आधी सुरचीत नाटके म्हणजेच वेलमेड प्लेज लिहिले जाऊ लागले होते. या सर्व पार्श्वभूमीवर नाटकांमध्ये वास्तववाद आला. स्वच्छंदतावादी नाटकांचे स्वरूप नाकारुन वास्तवाला अधिक जवळचे असे रूप नाटकांना लाभले. नाटकांमधील अभिनयातदेखील स्वाभाविकता येऊ लागली. व्यक्तिरेखांच्या बाह्यदर्शनाएवढेच महत्त्व आतिल सत्याला देखील आले.
दळणवळणाची आणि संपर्काची अनेक नवनवीन माध्यमे निर्माण झाल्याने जग जवळ येऊ लागले. एका प्रांतातील नाटक दुसऱ्या प्रांतात होऊ लागले, जुने नाटक नव्याने होऊ लागले. युरोपात उगम पावलेला कमानी मंच जवळजवळ जगभर प्रचलित झाला.
वास्तवतावादी नाट्य चळवळीने आदर्शवादी विचार किंवा ऐतेहासिक विषयांच्याऐवजी सद्यकालिन घटना आणि विषय यांवर लक्ष केंद्रित केले. वास्तवतावादी नाटकाचा रंगमंचावर जे जे घडते त्याचा दैनंदिन आयुष्यात दिसणाऱ्या गोष्टींशी साधर्म्य दाखविण्याचा प्रयत्न असतो. प्रेक्षकांना त्याच्या भोवताली ज्या पद्धताची माणसे दिसतात किंवा ज्या पद्धतीने बोलताना, वावरताना दिसतात, ज्या पद्धतीचे ते कपडे घालतात, ज्या ठिकाणी राहतात, त्याच्या जास्तीत जास्त जवळचा अनुभव देण्याचा प्रयत्न वास्तववादी नाटक करते. खऱ्या जगाचा जसाच्या तसा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न अशा नाटकांचा असतो. आपल्या आजुबाजूचे जग हे प्रत्यक्ष निरिक्षणातूनच आपल्याला कळणार आहे असा विश्वास असल्यामुळे वास्तवतावादी नाटककारांनी थेट आपल्या आजूबाजूच्या समाजाबद्दलच आणि शक्य तेवढ्या वस्तूनिष्टपणे नाटके लिहिली
हेन्रिक इब्सेन हा एक महत्त्वाचा वास्तववतावादी नाटककार समजला जातो. पिलर्स ऑफ सोसायटी, डॉल्स हाउस, घोस्ट्स आणि अॅन एनेमी ऑफ पिपल ही त्याची वास्तवतावादी शैलीतील महत्त्वाची नाटके होत. इब्सेनच्या नाटकांमध्ये नाटकातील व्यक्तिरेखांचे स्वतःसाठीचे आणि दुसऱ्यासाठीचे कर्तव्य यांच्यातील द्वंद्व दिसून येते. त्याने स्वगत भाषणे टाळली. त्याच्या नाटकांमध्ये घटनांची मांडणी फारच काळजीपूर्वक केलेली दिसून येते. शिवाय प्रसंगांमध्ये तर्कदृष्ट्या संगती दिसते. इब्सेनच्या नाटकांमध्ये आदर्श किंवा ठराविक व्यक्तिरेखा नसत, तर चुका करणारी माणसे असत. त्याने आपल्या नाटकांमधून रोजची बोलचालीची भाषा वापरली तसेच प्रादेशिक बोलीभाषांचा वापर केला. त्याने आर्थिक अन्याय, लैंगिक बाबतीतला दुटप्पीपणा, असमाधानी नवरा-बायको, गुप्तरोग, दांभिकता अशा समाजाच्या दृष्टीने अनैतिक किंवा विकृत परंतू वास्तविक विषयांवर नाटके लिहिली.
इब्सेननंतर पाश्चिमात्य देशांमध्ये सगळीकडे वास्तवतावादी नाटकांची लाट सुरू झाली. इंग्लंडमध्ये पिनेरो (नाटके सेकंड मिसेस टॅन्क्वेरे, मिड चॅनल, .), गाल्सवर्दी (नाटकेस्ट्राइफ, जस्टिस, .), शॉ (नाटकेसेंट जोन, मेजर बार्बरा, .), स्विडनमध्ये स्ट्रिंडबर्ग (नाटकेफादर, मिस ज्युली) आणि रशियामध्ये निकोलाय गोगोल (नाटके इन्स्पेक्टर जनरल) या नाटककारांनी वास्तवतावादी नाटके लिहिली.
अॅन्टन चेकव्ह या रशियन नाटककाराने आपल्या वास्तवतावादी नाटकांमध्ये किंचित प्रतिकात्मकतेचा वापर केल्यामुळे त्याने लिहिलेल्या सीगल, अंकल वान्या, थ्री सिस्टर्स आणि चेरी ऑर्चर्ड या नाटकांना प्रत्ययवादी नाटके असे संबोधले जाते. तो आपल्या नाटकांमध्ये क्रांतीपूर्व रशियाचे चित्रण करतो. त्याच्या नाटकांमधील व्यक्तिरेखांना आनंदी आणि समाधानी जिवन जगण्याची इच्छा असते पण आजुबाजूच्या परिस्थितीमुळे आणि स्वतःच्याच स्वबाववैशिष्ट्यांमुळे त्यांना ते जगता येत नाही. चेकव्हने आपल्या नाटकांमध्ये कोणत्याही नाटकीय युक्त्यांचा वापर केला नाही. त्याच्या नाटकांमध्ये उत्कट किंवा तीव्र प्रसंग मंचाबाहेर घडतात, मंचावर केवळ त्यांचे पडसाद दिसतात.
नाट्यसंहितांमधील वास्तवतावाद ज्या दिग्दर्शकांनी रंगमंचावर आणला त्यांच्यात आन्द्रे आन्त्वान (फ्रान्स) आणि स्तानिस्लाव्हस्की (रशिया) यांचा उल्लेख करावा लागेल. त्यांनी नाटकांत मंचवस्तू, वेशभूषा, पात्रांची संवादभाषा, हालचाली आणि ध्वनीसंकेत या घटकांद्वारे कृत्रिमता काढून टाकून स्वाभाविकता आणण्याचा प्रयत्न केला. स्तानिस्लाव्हस्कीने अभिनयातील शैलीदारपणाच्याऐवजी  भूमिकेची सत्यानुभूती देण्याकरिता आपली नवी पद्धत विकसीत केली.
स्तानिस्लाव्हस्कीने नट आणि तो साकारत असलेली भूमिका यांच्या एकात्मतेविषयी नवे विचार मांडले. त्याच्या म्हणण्यानुसार, नटाने आपल्या व्यक्तिरेखेचा अभ्यास करण्यासाठी नाटक घडते ती जागा बारिकसारिक तपशिलांसह दृश्यमान करायला हवी, त्यानंतर नटांना त्या परिस्थितीमध्ये तुम्ही सापडला तर कसे वागाल असा प्रश्न करायला हवा. प्राप्त परिस्थिती आणि उद्देश या दोन्ही गोष्टींमधून व्यक्तिरेखेची निर्मिती होते. नटाने व्यक्तिरेखेचे हेतू आपले हेतू करण्यासाठी नाटकाचे छोटे एकक पाडून प्रत्येक घटकांचे हेतू ठरवायला हवेत आणि त्या हेतूंची सलग रेषा आखून क्रियीपदांच्या रूपात असलेल्या हेतूंच्या सहाय्याने आपला अभिनय साकारायला हवा
अपिआ आणि क्रेग यांना कलात्मक रंगभूमी चळवळीचे प्रवर्तक समजले जाते. रंगभूमीवरील वास्तवतावादाला त्यांनी विरोध केला. केवळ दिसते तसे रंगमंचावर हुबेहुब दाखविण्याऐवजी त्यांनी रंग, रेषा, आकार या दृकघटकांचा अगदी साधेपणाने वापर करून दृश्यसौंदर्य साधण्याला महत्त्व दिले. त्यांनी दृश्य आणि श्राव्य कलांचा मेळ घालून एकात्म नाट्यनिर्मितीला प्रेरणा दिली. त्यांच्या विचारांनी एकूणातच रंगभूमीविषयक विचारांना मोठी चालना दिली
मेयरहोल्ड या रशियन दिग्दर्शकाने रंगभूमीवरील रचनावादाचा पुरस्कार केला. दिग्दर्शकाने योजलेल्या परिकल्पनेप्रमाणे नटांना अभिनय करता यावा याकरिता त्याने जैवयांत्रिकी ही अभिनय प्रशिक्षण पद्धती विकसित केली. प्रत्यक्ष जीवन आणि रंगभूमी यांच्याच प्रेक्षकांनी गल्लत करू नये म्हणून रंगभूमी या कलामाध्यमाचे मर्म लक्षात घेऊन नाटकांमध्ये रंगभौमिकता आणली. नाटक हे समाजावर भाष्य करण्याचे यंत्र आहे हे सुचित करण्यासाठी नेपथ्यामध्ये रचनावाद आणला
रंगभूमी ही केवळ मनोरंजन साधणारी कला नसून तिचा उपयोग प्रेक्षकांच्या अबोध मनात दडपल्या गेलेल्या विकार-वासनांना मोकळीक करून देण्यासाठी व्हावा, असे प्रतिपादन आर्तो या फ्रेन्च लेखक-दिग्दर्शकाने केले. व्यक्तिऐवजी घटनांचे सादरीकरण, घटनांमध्ये प्रेक्षकांचा सहभाग, नाट्यसंहितेच्या वर्चस्वाचा त्याग आणि ध्वनी, प्रकाश, प्रतिमांचे प्रक्षेपण याना मुक्त वाव हे त्याच्या नाटकांचे विशेष. रंगभूमीविषयक त्याच्या कल्पनांना त्याने क्रौर्य रंगभूमी असे नाव दिले.
ब्रेख्तने कथक रंगभूमीचा पुरस्कार केला. त्याच्या मते रंगभूमी ही समाजपरिवर्तानाचे महत्त्वाचे साधन आहे. प्रेक्षकांच्या विचारशक्तीला चालना देऊन त्यांना समाजात कृती करायला उद्युक्त करणे हे त्याच्या रंगभूमीचे उद्दिष्ट होते. भावनेऐवजी विचार, नाट्यात्मकतेऐवजी निवेदन, प्रत्यक्षाऐवजी ऐतेहासिकरण, समरसतेऐवजी तटस्थता ही त्याच्या रंगभूमीची वैशिष्ट्ये त्याच्या कॉकेशिअन चॉक सर्कल, मदर करेज, थ्री पेनी ऑपेरा, . नाट्यकृतींमधून प्रतीत होतात.
दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपात अस्तित्वात आलेल्या असंगत नाटकाचा प्रभाव पुढे जगभर दिसून येतो. असंगतवाद्यांच्या मते मानवी आयुष्य हे अर्थहीन, हेतुशून्य, अतार्किक असते. झा पॉल सार्त्र  (नाटके फ्लाईज, नो एक्झिट, .) आणि आल्बेर काम्यू (नाटकेकॅलिगुला, जस्ट्स, .) यांच्या लेखनातून हा विचार सुरुवातीला आला. नंतर सॅम्युअल बेकेट (नाटकेवेटिंग फॉर गोदो, एन्डगेम, .), युजिन आयनेस्को (नाटके लेसन, बाल्ड सॅप्रॅनो, .) या नाटककारांनी जीवनाच्या असंगतीचे चित्रण सुसंगत रीतीने ने करता आशयाप्रमाणे आविष्कारालादेखील असंगत रूप दिले. म्हणून त्यांच्या नाटकांना व्यस्त नाटके असही नाव मिळाले. या नाटकांमध्ये रुढार्थाने कथानक नसते. चर्चा, निवेदने, स्पष्टिकरणे यांना वाव नसतो तर प्रतिमा आणि प्रत्यक्ष दर्शनावर भर असतो. या प्रकारच्या रंगभूमीने मानवी अस्तित्वाच्या निरर्थकतेचे चित्रण करून तसेच रंगभूमीचे पारंपरिक संकेत झुगारून वास्तवाचे नवे भान दिले.   
पोलंडमधील नाट्यगुरू येर्झी ग्रोटोव्स्की रंगभूमी निर्माण करणाऱ्या सामग्रीचा शोध घेत रमगभूमीच्या मूळांपर्यंत गेला. नेपथ्य, प्रकाश, . नाट्यघटक नाकारुन केवळ नट आणि प्रेक्षक हे दोनच घटक त्याने अपरिहार्य मानले. म्हणून तो आपल्या रंगभूमीला गरिब रंगभूमी असे संबोधतो. तो रंगभूमीला आदिम काळातील उत्सव-समारंभाच्या समतुल्य मानतो. ज्याप्रमाणे आदिम काळातील समाज समारंभाच्या निमित्ताने एकत्र येऊन सामुहिक अनुभव घ्यायचा, त्याचप्रमाणे रंगभूमीच्या माध्यमातून समाजातील माणसे एकत्र येऊन एक समान, सामाजिक अनुभव घेऊ शकतात असे त्याचे म्हणणे होते. म्हणूनच त्याच्या नाटकात आदिम रचना, हालचाली, कृती आणि प्रतिमांचा समावेश होता तसेच मंचावकाश आणि प्रेक्षकावकाशाच्या विविध शक्यतांचा त्याने शोध घेतला. कॉन्स्टन्ट प्रिन्स, अॅक्रोपोलिस ही ग्रोटोव्स्कीने दिग्दर्शित केलेली काही महत्त्वाची नाटके होत.
पीटर ब्रूक हा आधुनिक रंगभूमीवरील सर्वांत महत्त्वाचा नाट्यदिग्दर्शक समजला जातो. पठड्यांचे वैविध्य,साधेपणा, नटकेन्द्रीत्व, तत्त्वगामीपणा, सर्वसमावेशकता आणि बहुसांस्कृतिकता ही पीटर ब्रूकने दिग्दर्शित केलेल्या नाटकांची वैशिष्ट्ये सांगता येतील. त्याने दिग्दर्शित केलेली किंग लिअर, मारा/साद, युएस, मिडसमर नाइट्स ड्रिम, महाभारत ही नाटके विशेष गाजली
एखादा नट रंगमंचावर असताना प्रेक्षकांचे लक्ष त्याच्यावर खिळून राहण्यासाठीचे चैतन्य कसे साधता येईल या विषयीचे संशोधन डेन्मार्कमधील नाट्यदिग्दर्शक युजेनिओ बार्बा आपल्या ओडिन रंगभूमीमध्ये घेत आहे. जगभरातील निरनिराळ्या सादरीकरण परंपरांमधील साम्यतत्त्वे हुडकून त्यांच्या सहाय्याने सारसंग्रही भूमिकेतून अभिनय प्रशिक्षणचा आपला वैशिष्ट्यपूर्ण ढाचा ओडिन रंगभूमीने तयार केलेला आहे. त्या ढाच्याच्या सहाय्याने नाट्यनिर्मिती केली जाते. मायथोस, इगो फाउस्ट, उर हॅम्लेट ही ओडिनची काही महत्त्वाची नाटके होत
रंगभूमीच्या उगमापासून ते आजवर नाटकाच्या स्वरूपात अनेक स्थित्यंतरे दिसून येतात. विसाव्या शतकाच्या शेवटी आलेल्या जागतिकीकरणाच्या लाटेमुळे अजूनही नवे विचार, नवी तंत्रे रंगभूमीच्या माध्यमात येऊ लागली आहेत. प्रसार माध्यमांच्या तसेच समाज माध्यमांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे रंगभूमी कलेची व्याप्ती पसरत चालली आहे. रंगभूमी ही कला जिवंत असल्याचे ते लक्षण आहे.

- प्रवीण भोळे
प्राध्यापक आणि विभागप्रमुख
ललित कला केंद्र, गुरुकुल
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ४११ ००७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अभिनयाच्या किमयाशाळा

  अभिनयाच्या किमयाशाळा १ . प्रयोगशाळा : एक अवकाश अवकाश म्हणजे जागा , जिथे काहीतरी सामावले जाते असे काहीतरी , म्हणजे प्रयोगशा...