नाटक - रंगभूमी परिचय : १२. मध्ययुगिन कालखंड
ग्रीक, रोमन परंपरेमधील प्राचीन युरोपिय रंगभूमीचा अस्त झाल्यानंतर जवळजवळ एक हजार वर्षांनी म्हणजे दहाव्या शतकात नवीन धार्मिक रंगभूमीचा उगम झाला. या काळात रंगभूमीचे अस्तित्व केवळ अंशरूपाने – डोंबारी, गारुडी, नकलाकार, नर्तक याच्यासारखे भटके कलावंत, वीरांच्या कथा गाण्यांमधून सांगणारे कथेकरी आणि जत्रा, उत्सवांमधून मनोरंजनाचे कार्यक्रम सादर करणारे कलावंत या रूपांमधून शिल्लक होते.
दहाव्या शतकात युरोपात बायबल या धर्मग्रंथातील ख्रिस्ताच्या किंवा संतांच्या जीवनातील घटनांवर आधारित असलेली लीला नाटके चर्चमधून सादर होऊ लागली. अद्भूत घटना, चमत्कार आणि सजावट यांचा समावेश असलेल्या लीला नाटकांमध्ये मुख्य भूमिका धर्मगुरू साकारत असत तर इतर भूमिकांसाठी भटक्या कलांवतांना पैसे देऊन बोलवत असत.
प्रबोधनपर नाटके हा नवीन प्रकारदेखील त्यानंतरच्या काळात उदयास आला. मानवी मनातील चांगल्या, वाइट प्रवृत्तींना त्याचप्रमाणे मृत्यू, शक्ती, सौंदर्य, सत्कर्म यासारख्या अमूर्त कल्पनांना पात्रे कल्पून नाट्यरचना केलेली असे. मानवाने या जगात चांगले वागावे, वाइट वागू नये अशा नैतिक प्रबोधनासाठी ही नाटके सादर केली जात असत. चाकांच्या गाड्यांवर ठिकठिकाणी हिंडून ही नाटके सादर केली जात असत.
पंधराव्या शतकात मुद्रणाचा शोध लागल्यानंतर रोमन नाटककारांची अनेक नाटकांचे तसेच साहित्य व कलाविषयक ग्रंथांचे मुद्रण झाले. या नव्या काळातील लोकांना प्राचीन कला, साहित्याची ओळख झाली आणि त्यातून प्रेरित होऊन नाट्यकलेत नवे प्रवाह निर्माण झाले.
पुनरुज्जीवन काळात इटलीमध्ये कॉमेदिया देला’र्त ही लोकनाट्याची परंपरा सुरू झाली. या परंपरेत नट केंद्रस्थानी होता. नावतील देला’र्त हा शब्द नटांचा धंदेवाइकपणा सुचवितो. कॉमेदियाच्या प्रयोगांना सादर करण्यासाठी नाटकघराची गरज असेच असे काही नव्हते. जत्रा-उत्सवांमधून रस्त्याचा कोपरा, मोकळे मैदान, चौकात ते सादर होत असत. हातचलाखी करणारे, जगलर्स, कसरपटू यांसारखे व्यावसायिक लोक त्यात काम करीत असत. कॉमेदिया देला’र्त हे व्यावसायिकरित्या सादर होणारे उत्स्फूर्ताविष्कार असलेले विनोदी नाटक असे. अर्धमुखवट्यांचा वापर असल्यामुळे शरीरिकतेचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असे. ठराविक प्रकारची पात्रे, रूपरेषात्मक कथानके, कथानकांनुसार पात्रांच्या नात्यांमध्ये किंवा संबंधात होणारे बदल आणि लाझी नावाच्या विनोदनिर्मितीच्या पूर्वनियोजीत क्लृप्त्या ही या परंपरेची वैशिष्ट्ये होती.
ही परंपरा सोळाव्या शतकाच्या मध्यात इटलीत सुरू झाली आणि फ्रान्समधून सर्व युरोपभर पसरली. सतराव्या शतकात तिला विशेष बहर आला. पुढील शंभर वर्षांत तिचा जोर ओसरत गेला आणि अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात ही परंपरा खंडीत झाली. या नाटकांच्या उत्स्फूर्ततेच्या तंत्राचा प्रभाव त्या काळातील आणि त्यानंतरच्या अनेक नट आणि नाटककारांवर पडला.
१५५८ ते १६०३ या कालवधीत इंग्लंड देशावर पहिल्या एलिझाबेथ राणीचे राज्य होते. ज्या काळात स्त्रियांना नाटकांमध्ये काम करायला परवानगी नव्हती, त्याच काळात एका स्त्रीच्या कालकिर्दीत इंग्रजी नाटक आणि रंगभूमी यांचे सुवर्णयुग आले हा एक विचित्र योगायोग म्हणावा लागेल.याच काळात नाटकाचा व्यवसाय करायच्या परंपरेची सुरुवात झाली. नाटकांना असलेली धार्मिक पार्श्वभूमी जाऊन निधर्मी नाटकांची सुरुवात झाली.
सोळाव्या शतकात इंग्लंडमध्ये राजघराणे, सरदार, उमराव यांसारख्या निवडक लोकांकरीता खाजगी तर तमाम जनतेकरीता सार्वजनिक अशी दोन प्रकारची नाटकघरे निर्माण झाली. या नाटकघरांमधून काही आश्रयदात्यांच्या नावाने काही नाटकमंडळ्या नाटकाचा व्यवसाय करू लागली होती.
प्रत्येक नाटकमंडळीत साधारणपणे वीस ते पंचवीस लोक असत. त्यांतील काही भागधारक असत. प्रयोगाच्या उत्पन्नामधून झालेला नफा ते समान हिश्शात वाटून घेत असत. बऱ्याचदा या मंडळीच्या मालकीचे एखादे नाटकघर असे. मंडळीत काही पगारी लोकही असत. ते नाटकामधील छोट्याछोट्या भूमिका, सहाय्यक, वाद्यवादक अशी कामे करीत. नाटकात स्त्रियांच्या भूमिका पुरुष करीत असत. वयाने मोठ्या असलेल्या चरित्र भूमिका प्रौढ पुरुष तर नायिकांच्या आणि तरुण स्त्रियांच्या भूमिका बारा ते चौदा वयोगटातील, सडपातळ बांध्याची, आवाज न फुटलेली, देखणी मुले करीत असत.
विल्यम शेक्सपिअर (नाटके – हॅम्लेट, किंग लिअर, अ मिडसमर नाइट्स ड्रिम, रिचर्ड द थर्ड, इ.), ख्रिस्तोफर मार्लो (नाटके - डॉक्टर फॉस्टस, द ज्यू ऑफ माल्टा, इ.), बेन जॉन्सन (नाटके – वोल्पोने, अल्केमिस्ट, इ.) हे या काळातील महत्त्वाचे नाटककार तर रिचर्ड बर्बेज, एडवर्ड अॅलिन, विल्यम केम्प हे त्या काळातील काही प्रख्यात नट होते.
सुरुवातीच्या काळातील खानपानघरांमधील मोकळ्या जागांमध्ये नाटक सादर करावयाच्या परंपरेचे प्रतिबिंब सार्वजनिक नाटकघरांच्या रचनेवर पडले असावे. ही नाटकघरे बिनाछपराची, साधारण गोलाकार अशी होती. या नाटकघरांची क्षमता दोन ते तीन हजार प्रेक्षक एवढी होती. मध्यभागी असलेल्या मोकळ्या जागेला पिट असे म्हणत असत. त्यात सर्वांत कमी दराचे तिकिट काढून आलेले प्रेक्षक उभे राहून नाटक बघत असत. या पिटाच्या मध्यापर्यंत पुढे आलेला फलाट म्हणजे मुख्य रंगमंच. पिटाच्या भोवती छतयुक्त गॅलऱ्यांचे दोन-तीन मजले असत. त्यात अधिक दराचे तिकिट काढून आलेले प्रेक्षक बसत. फलाटाच्या मागच्या बाजूला रिकामी जागा असे शिवाय वरच्या गॅलऱ्या आणि खिडक्या ही रंगमंचाची कायमस्वरूपी पार्श्वभूमी असे. थोड्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या नेपथ्यवस्तू वगळता स्थळाचे सूचन संवादांमधूनच होत असे. प्रेक्षक आणि नट यांना विभाजित करणारा पडदा किंवा कमान नव्हती. आकर्षक पोषाख परिधान केलेले नट, नाटककारांनी लिहिलेले काव्यमय संवाद आणि त्याला नटांनी दिलेली वाचिक अभिनयाची व शैलीदार हातवाऱ्यांची जोड ही एलिझाबेथीय रंगभूमीची वैशिष्ट्ये होती.
- प्रवीण भोळे
प्राध्यापक आणि विभागप्रमुख
ललित कला केंद्र, गुरुकुल
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ४११ ००७
प्राध्यापक आणि विभागप्रमुख
ललित कला केंद्र, गुरुकुल
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ४११ ००७

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा