नाटक - रंगभूमी परिचय : ११. भारतीय लोकरंगभूमी
इ.स. दहाव्या आणि अकराव्या शतकात भारतावर वायव्येकडून झालेल्या आक्रमणांमधून भारतीयांना इस्लाम धर्माचा परिचय झाला. सक्तीची सामुदायीक धर्मांतरे, बौद्ध धर्माची घटलेली लोकप्रियता, हातातून निसटलेली सामाजिक आणि राजकीय सत्ता या सर्व कारणांमुळे हिंदू धर्मामध्ये वैष्णव चळवळ सुरू झाली. विष्णूचा अवतार असलेल्या कृष्णाप्रती माणसाची भक्ती हा या चळवळीचा गाभा होता. वैष्णवांनी मनुष्य आणि परमेश्वर यांच्यामधील कठोर नियम, काटेकोर विधी आणि धर्मगुरू हे सर्व अडथडे दूर करून सामान्य माणसाला थेट देवासमोर आणले. देवांचे केवळ नामस्मरण हा ईश्वरप्राप्तीचा महत्त्वाचा मार्ग ठरला.
हिंदू धर्मामधील ही वैष्णव चळवळ अगदी खेड्यापाड्यापर्यंत पोचली. देवाचे नाव घेण्यासाठी भजन, किर्तन, पूराणांचे वाचन या गोष्टी नित्यनेमाने होऊ लागल्या. पूराणकथांचे आपल्या बोलीभाषांमधून साभिनय सादरीकरण हा ईश्वर उपासनेचा एक मार्ग ठरला. अशी सादरीकरणे पाहणे यातदेखील भक्तीचा भाग असल्यामुळे त्यांना प्रेक्षकांची गर्दी होऊ लागली आणि वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये आपापल्या बोली भाषांमधील प्रादेशिक, देशी रंगभूमी आकार घेऊ लागली. विविध कालखंडात, विविध प्रांतांमध्ये निर्मित आणि विकसीत झालेल्या प्रादेशिक रंगभूमीवरील विविध नाट्यप्रकारांना लोकरंगभूमी असे म्हटले जाते.
लोकरंगभूमीवरील प्रत्येक प्रकाराची आपापली अशी खास वैशिष्ट्ये असतात. हेतू, सादरीकरण, वेशभूषा, रंगभूषा, मंचनपद्धती, अभिनय, संगीत, नृत्य, इत्यादी विविध घटकांचे वेगळेपण दिसत असले तरी त्यांच्यामध्ये काही ढोबळ साम्ये दिसून येतात. दक्षिण भारतीय प्रकार हे नृत्यप्रधान आहेत, त्यांच्यामधल्या काहींना तर नृत्यनाट्य म्हणूनच ओळखले जाते. उदा., केरळमधील कथकली आणि कृष्णअट्टम. उत्तर भारतीय प्रकारंमध्ये संगीत, विशेषतः गायन केंद्रस्थानी असते. उदा., राजस्थानचा खयाल, मध्य प्रदेशामधील माच, उत्तर प्रदेशामधील नौटंकी आणि पंजाबमधील स्वांग. जात्रा (बंगाल),
भवई (गुजराथ) आणि तमाशा (महाराष्ट्र) या प्रकारांमध्ये संवाद महत्त्वाचे असतात. भवई आणि तमाशात विनोद आणि उपहास यांचादेखील उपयोग केलेला असतो.
काही प्रकारची बाहुली-नाट्येदेखील लोकरंगभूमीचा भाग आहेत. वेगवेगळ्या प्रांतांमध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या बाहुल्या वापरल्या जातात. गोम्बियट्टा (कर्नाटक), पवैकुथू (तमिळनाडू), रावणछाया (ओडिशा) आणि तोल्लू बोमालू (आंध्र प्रदेश) या प्रकारांमध्ये छाया नाट्याचा वापर होतो, म्हणजे बाहुल्यांच्या सावल्या पडद्यावर पाडून सादरीकरण केले जाते. गोपलीला (ओडिशा) आणि पवैकथकली (केरळ) या प्रकारांमध्ये हातमोज्यांच्या बाहुल्या वापरल्या जातात, तर कठपुतळीच्या (राजस्थान) प्रयोगांमध्ये दोऱ्यांनी नियंत्रित होणाऱ्या बाहुल्या वापरल्या जातात.
बिहारमधील सराईकेला, ओरिसामधील मयुरभंज आणि बंगालमधील पुरलीया हे छाऊ नृत्याचे प्रकार त्यामधील नाट्यमय घटकांमुळे लोकरंगभूमीचेच प्रकार मानले जातात. मुडियेट्ट, तेय्यम हे केरळमधील विधिनाट्याचे प्रकार, पंडवानी (छत्तिसगड), बुर्राकथा (आंध्र प्रदेश) यासारखे वेगवेगळ्या प्रांतामधील विविध प्रकारचे कथागायन, नाट्यशास्त्रात वर्णन केलेल्या अभिनयाशी जवळीक दाखविणारे केरळमधील चाक्यार कुथू, नांग्यार कुथू, राजस्थानमधील खावड नृत्य असे प्रत्यक्षपणे नाट्याच्या परिघात न येणारे, परंतु वेशभूषा, मुखवट्यांचा वापर, व्यक्तिरेखा, अभिनय या नाट्यमय घटकांचा समावेश असलेले प्रकारदेखील भारतीय लोकरंगभूमीवरील प्रकार म्हणून ओळखले जातात.
भारतामधील विविध प्रांतांमध्ये लोकरंगभूमींचे जे विविध प्रकार दिसून येतात, त्यांच्यामधील काही प्रकारांमध्ये निवेदन महत्त्वाचे असते (किर्तन) तर काहींमध्ये पात्रांची सोंगे काढली जातात (रामलीला). काही एकल प्रकार आहेत (बुर्राकथा) तर काही समुहाने सादर होणारे आहेत (जात्रा). काही प्रकार धार्मिक विधी म्हणून सादर होतात (तेय्यम) तर काही प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी म्हणून सादर होतात (तमाशा). काही प्रकारांचे सादरीकरण स्थळ रस्ता असते (थेरुकुटू), काहींचे घरासमोरील अंगण असते (गोंधळ) तर काही देवळांमध्ये सादर होतात (अंकिया नाट). काही प्रकारांच्या कथानकात लौकिकता असते (स्वांग).काहींमध्ये रंग-वेशभूषेचा कमीतकमी वापर केला जातो (माच) तर काहींमध्ये प्रचंड वापर केला जातो (तेय्यम). काही प्रकारंमध्ये संगीताला महत्त्व असते (खयाल), काहींमध्ये नृत्याला (यक्षगान), काहींमध्ये विनोदाला (तमाशा), तर काही प्रकारांमध्ये सांकेतिकता महत्त्वाची असते (मुडियेट्ट).
भारतामधील वेगवेगळ्या लोकनाट्य परंपरांचा आढावा घेतल्यास बहुतेक सर्व लोकनाट्य प्रकारांमध्ये पुढील पाच घटकांचा समावेश दिसतो : विधी, सूत्रधार, विदुषक, संगीत आणि नृत्य.
प्रत्यक्ष पूजा, मंगलाचरण, ईश्वराचे स्तवन, प्रार्थना, इत्यादी बाबींचा विधींमध्ये समावेश होतो. वेगवेगळ्या नाट्यपरंपरांमध्ये मुख्य सादरकर्त्याला निरनिराळी नावे आहेत. यक्षगानात त्याला भागवतार म्हणतात, थेरुकुटूमध्ये त्याला कट्टी आकरन म्हणतात, तर तमाशात सरदार म्हणतात. गद्यामधून, पद्यामधून, गाण्यामधून किंवा साथीदारांसोबतच्या संवादामधून, प्रश्नोत्तरांमधून गोष्ट सांगणे हे त्यांचे कार्य असते. तमाशामधील सोंगाड्या, दशावतारामधील शंखासुर, भवईमधील रंगळो, यक्षगानामधील हास्यागार, थेरुकुटूमधील कोमली ही विदुषकाची विविध रूपे आहेत. विनोदनिर्मितीसोबतच तत्कालिन घटनांवर उपरोधीक भाष्य करणे हे त्यांचे कार्य असते. बहुतेक सर्व लोकनाट्यांमध्ये संगीत, नृत्याचा समावेश असतो.
बव्हंशी लोकपरंपरा या निवेदनपर आहेत. निवेदन करताना, गोष्ट सांगताना लोककलाकार वेगवेगळ्या साधनांचा उपयोग करून आपली निवेदने अधिक परिणामकारक पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोचवित असतात.
लोकरंगभूमीवरील नट कथन करतो. कथनाची क्रिया परिणामकारक पद्धतीने होण्याकरिता तो विनोद, संगीत, वेशभूषा, चित्रे, बाहुल्या, इत्यादींची मदत घेतो. कथन शक्यतो बोलीभाषेतच असते, बऱ्याचवेळा ते लययुक्त, तालयुक्त, क्वचित मंत्रोच्चारासमान असते. लोकरंगभूमीवरील नट शारीरिक हालचाली, बोलणे, चित्रविचित्र रंग-वेशभूषा, इ. घटकांच्या मदतीने विनोदनिर्मिती करतो. अनेक लोकपरंपरांमध्ये सोंगे काढली जातात.
लोकरंगभूमीवर विधीनाट्यामधील अनेक घटकांचा उपयोग असतो. पुनरावृत्ती, संकेतबद्धता, प्रतिकांचा वापर, इ. घटकांचा त्यात समावेश होतो. तसेच अतिशयोक्ती हेदेखील लोकरंगभूमीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. बोलणे, हालचाली, कृती अशा विविध बाबींमधून बऱ्याच वेळा विनोदी पद्धतीने अतिशयोक्ती दिसून येते. त्याचप्रमाणे लयत्त्व हे लोकरंगभूमीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. संगीत, नृत्य, हालचाली, संवादांमधील किंवा निवेदनातील यमक, अनुप्रास या अलंकारांचा वापर या सर्वांमधून लय जाणवत असते.
लोकरंगभूमीचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे उत्स्फूर्तता हे होय. जवळजवळ सर्वच लोकनाट्यप्रकारांना लिखित संहिता नसते. गाणी किंवा पद्यभाग ठरलेला असतो, गद्य निवेदने आणि संवाद मात्र उत्स्फूर्त असतात. बऱ्याचवेळा स्थानिक घडामोडींवर उत्स्फूर्तपणे भाष्य केले जाते. बोलण्याप्रमाणेच काही कृती, हातवारे आणि लकबीदेखील उत्स्फूर्तपणे सादर केल्या जातात.
नागर रंगभूमीवरील बहुतेक नाटके लिखित स्वरूपाची असतात, प्रमाण भाषेत सादर होतात आणि शक्यतो गद्य असतात. नाटकांचे प्रयोग बंदिस्त नाटकघरांमध्ये, बहुतकरून कमानीमंचावर सादर होतात. नेपथ्य, प्रकाश, मुद्रित संगीत या घटकांचा विशेष विचार केलेला असतो आणि प्रयोगापूर्वी औपचारिक तालमी घेऊन प्रयोग काटेकोर रचलेला असतो. बहुतेक सर्व लोकनाट्यप्रकारांना लिखित संहिता नसते, ते बोलीभाषेत सादर होतात. त्यात संगीत, नृत्याचा समावेश असतो, त्याचे प्रयोग शक्यतो उघड्यावर, अलिकडे बंदिस्त जागेत सादर होतात. लोकरंगभूमीवर अभिनय हाच सगळ्यात महत्त्वाचा नाट्यघटक असतो, काही प्रकारांमध्ये रंग-वेशभूषेला महत्त्व असते. औपचारिक तालमी होत नाहीत तर उत्स्फूर्ततेवर भर असतो.
कोटी शिवराम कारंथ, वल्लथोल मेनन यांनी अनुक्रमे यक्षगान आणि कथकली या प्रकारांचे नवीकरण केले. हबीब तन्वीर, भानू भारती, बन्सी कौल, शाहीर साबळे, वामन केंद्रे या दिग्दर्शकांनी नागर रंगभूमीवर लोकरंगभूमीवरील घटकांचा वापर आधुनिक जाणिवा मांडण्यासाठी करून घेतलेला आहे.
- प्रवीण भोळे
प्राध्यापक आणि विभागप्रमुख
ललित कला केंद्र, गुरुकुल
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ४११ ००७
प्राध्यापक आणि विभागप्रमुख
ललित कला केंद्र, गुरुकुल
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ४११ ००७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा