शुक्रवार, २० मार्च, २०२०

नाटक - रंगभूमी परिचय : १०. प्राचीन भारतीय रंगभूमी

नाटक - रंगभूमी परिचय : १०. प्राचीन भारतीय रंगभूमी
भारतात काही रंगभूमीपूर्व कलांचा आढळ होता असे प्राचीन भारतीय साहित्यांमधील संदर्भांवरून लक्षात येते. गोष्टी सांगण्याच्या कलेतून आख्यानकाव्यांचा जन्म झाला आणि आख्यानकाव्यांमधून महाकाव्यांची निर्मिती झाली. ही महाकाव्ये मौखिक परंपरेतून पिढ्यानपिढ्या जतन करण्यात आली. महाकाव्यांमधील आख्याने लोकसमुदायासमोर सादर करण्यात येत असत. त्यात वाचिक अभिनयासह संगीताचाही समावेश असे. त्याचप्रमाणे. प्राचीन भारतामधील आर्य संस्कृतीमध्ये यज्ञयाग केंद्रस्थानी होते. त्यांच्या अनुष्ठानामध्ये अनेक गोष्टी अभिनय केल्यासारख्या करावयाच्या असत. वेदवाङ्मयामध्ये काही संवादसुक्ते आढळतात. या सुक्तांचे पठन करताना वाचिक अभिनय आणि हावभावांची जोड मिळून छोटे नाट्यप्रसंग सादर होत असावेत.
..पू. दोनशे ते ..दोनशे या चारशे वर्षांच्या दरम्यान केव्हातरी संस्कृत नाट्यलेखन ते नाट्यप्रयोगाची इत्यंभूत माहिती देणारा नाट्यशास्त्र हा ग्रंथ रचला गेला. भरत हा नाट्यशास्त्राचा कर्ता समजला जातो.
सूत्रधार म्हणजे नाटक करणाऱ्याच्या गटामधील सर्वांत महत्त्वाची व्यक्ती असे. बहुतेक वेळा तोच नाट्यप्रयोगातील मुख्य भूमिका साकारत असे. तसेच तो इतर नटांना संवाद म्हणण्याविषयीच्या आणि हालचाली करण्याविषयीच्या सूचना करत असे. नाट्याचार्य गटामधील नटांना अभिनयाचे प्रशिक्षण देत असत. पुरुष आणि स्त्रिया एकत्रीतरित्या किंवा स्वतंत्रपणे नाटकांधून अभिनय करित असत.
नाट्यशास्त्रामधिल काही अध्यायांमध्ये नाटकांमधील अभिनयाचे अत्यंत तपशीलवार वर्णन दिलेले आहे. नाट्यशास्त्रामध्ये लोकधर्मी म्हणजे सहज, स्वाभाविक आणि नाट्यधर्मी म्हणजे मुद्दाम, संकेतबद्ध पद्धतीने व्यक्त करावयाचा अभिनय अशा अभिनयाच्या दोन पठडींचा उल्लेख केलेला आहे. अभिनय या संज्ञेची व्याख्या (गाभ्या)कडे नेणारा अशी सांगितलेली असून त्यात शरीराच्या हालचाली (आंगिक), भाषण (वाचिक), सोंग सजविणे (आहार्य) आणि भावभावना व्यक्त करणे (सात्त्विक) अशा चार घटकांचा समावेश केलेला आहे
शरीरीच्या मोठ्या, छोट्या आणि सूक्ष्म हालचाली करण्यास उपयुक्त सांध्यांवरून होणाऱ्या वेगवेगळ्या हालचालींच्या सहाय्याने विशिष्ट भावना किंवा अर्थ प्रेक्षकांपर्यंत कशा पद्धतीने पोचविता येतात याचे विवेचन नाट्यशास्त्रामधील आंगिक अभिनयाच्या अध्यायांमध्ये केलेले आहे. एका किंवा दोन्ही हातांच्या गोठविलेल्या स्थितींना मुद्रा असे संबोधले जात असे. त्यांचा वापर कसा आणि कोणकोणत्या कारणांसाठी नाट्यप्रयोगात करता येतो, त्याचेदेखील विस्तृत विवेचन आहे. वाचिक अभिनयाच्या अध्यायांमध्ये नटांचा आवाज, त्यांचे बोलणे, भाषा, व्याकरण, वृत्त, छंद यांचे विवेचन आहे. नटांचा वेश, दागिने आणि त्यांची रंगभूषा हे व्यक्तिरेखेचे आणि अभिनयप्रक्रियेचे भाग मानून त्याविषयीचे वर्णन आहार्य अभिनयात केलेले आहे. शरीराच्या हालचाली, आवाज, पात्रांचे सोंग अशा बाह्यवैशिष्ट्यांमार्फत अमूर्त असे भाव रस या अवस्थेस नेऊन प्रेक्षकांपर्यंत पोचविता येतात, असा दावा केलेला आहे. प्रयोगाचे यशापयश सिद्धींमार्फत मोजले जात असे. विशिष्ट रस निर्माण होऊन ते प्रेक्षकांपर्यंत पोचणे, ही महत्त्वाची सिद्धी होती.
अभिनय हा संस्कृत रंगभूमीवरील अतिशय महत्त्वाचा भाग असला तरी त्या काळातील नटांना मोठी समाजमान्यता होती असे दिसून येत नाही.
विविध धार्मिक प्रसंगी नाटकांचे प्रयोग सादर होत असत. राज्याभिषेक, विवाह, जन्म, प्रवासी घरी परतणे, युद्धात शत्रूवर विजय मिळवणे अशा अनेक प्रसंगी नाट्यप्रयोगांचे आयोजन केले जात असे.
आज आपण ज्याला नाटक असे म्हणतो त्या प्रकाराला संस्कृत रंगभूमीच्या कालखंडामध्ये रूपक असे म्हणत असत. नाट्यशास्त्रात रूपकाचे दहा प्रकार सांगितलेले असून नाटक हा त्यातील एक प्रकार आहे. नाटक या प्रकाराचे कथानक सगळ्यांना माहित असलेले असावे आणि त्याचा नायक हा राजा असावा, असे सांगितलेले आहे. एकूण मांडणीमधून प्रेम आणि शौर्य या भावनांची योजना करावी असेदेखील सांगितलेले आहे. यात पाच ते सात अंक असतात. अभिज्ञानशाकुंतल, स्वप्नवासवदत्ता ही नाटक या प्रकारांची उदाहरणे आहेत. प्रकरण हादेखील एक रूपकप्रकार आहे. संस्कृतनाट्यसंहितांपैकी संहितांपैकी टिकलेल्यांमध्ये मृच्छकटिक हे एक प्रसिद्ध प्रकरण आहे. प्रकरणाचे कथानक कविकल्पित असावे आणि नायक हा ब्राह्मण, व्यापारी किंवा मंत्री असावा, नायिका ही गणिका असावी तसेच प्रेम ही महत्त्वाची भावना असावी असे नाट्यशास्त्रात सांगितलेले आहे. याच पाच ते दहा अंक असतात. समावकार (कपट आणि शृंगारप्रधान), इहामृग (संघर्ष, युद्धयुक्त), डिम (चमत्कारयुक्त), व्यायोग (युद्धयुक्त), उत्सृष्टिकांक (एकच अंक, करुणरसयुक्त), प्रहसन (हास्यकारक), भाण (एकपात्री), वीथी (एक किंवा दोन पात्री) हे रूपकाचे इतर प्रकार होत.
संस्कृत नाटकाचे संवाद गद्य आणि पद्य यांच्या मिश्रणातून लिहिलेले असत. ही पद्ये म्हणजे श्लोक असत, गाणी नसत. काही विशिष्ट प्रसंगी धृवांचे गायन होत असे. नाटकात संस्कृत आणि वेगवेगळ्या प्राकृत भाषा अशा मिश्र भाषेचा उपयोग केला जात असे
प्राचीन भारतीय रंगभूमीवरील नाट्यप्रयोग भावकेंद्री होते. नाट्यशास्त्रात नाटकातील अभिनयातून भाव निर्माण करून प्रकट करण्याविषयी आणि प्रेक्षकांनाही त्यात समाविष्ट करून घेण्याविषयीचा सिद्धान्त मांडलेला आहे. त्यानुसार माणसाला प्रेम, हास्य, दुःख, क्षोभ, उत्साह, भीती, आश्चर्य आणि किळस अशा आठ मुलभूत भावनांचा अनुभव येतो. त्यांच्याशी संबंधित भावांचा उपयोग करून नटांच्या कृतीद्वारे प्रेक्षकांना या भावना अनुभवता येऊ शकतात. तेहतीस येणाऱ्या-जाणाऱ्या स्वरूपाच्या (संचारी किंवा व्यभिचारी) आणि आठ शुद्ध भावनांच्या स्थिती अशा सर्वांच्या सहाय्याने ही क्रिया घडून येते.

नाट्यशास्त्रात तीन वेगवेगळ्या आकारांच्या आणि तीन वेगवेगळ्या आकारमानांच्या नाटकघरांचे वर्णन आहे. आयत, चौरस आणि त्रिकोण हे आकार आणि लहान, मध्यम, मोठा या आकारमानांच्या विविध संगती करून नऊ वेगवेगळ्या प्रकारची नाटकघरे मिळतात. त्यापैकी मध्यम आकारमानाचे आयताकृती (विकृष्ट मध्यम) नाटकघर हे साधारणपणे नाटकांचा प्रयोग बघायला योग्य असे नाटकघर समजले जाते. त्यात साधारणपणे २०० ते ५०० प्रेक्षक मावत असत. प्रेक्षक आणि कलाकार यांच्यात फार अंतर नसे. मंचावर मध्यभागी समई ठेवलेली असे. मंचावरचे येणे-जाणे, नृत्य, मारामाऱ्या वगळता नट त्या समईच्या मागे उभे राहून नाटक सादर करीत असत. जागेच्या या वैशिष्ट्यामुळे अभिनयातील चेहऱ्यावरील हावभाव, हस्तमुद्रा तसेच वाचिक अभिनय आणि रंग-वेशभूषेमधील तपशील या बाबींना महत्त्व प्राप्त झाले असावे.
नाटकाची सुरुवात नांदीने होत असे. देवतांची स्तुती करुन प्रयोग व्यवस्थित पार पडावा अशी विनंती नांदीमध्ये केलेली असे. नांदीनंतर होणाऱ्या प्रस्तावनेतून नाटकाचा आणि नाटककाराचा परिचय करून दिला जात असे. त्यानंतर नाटकातील कथानकाला सुरुवात होत असे. नाटकाचा शेवट भरतवाक्याने होत असे. नाट्यप्रयोग पूर्ण झाल्यावर देवतेला, तसेच नाट्यशास्त्राचा कर्ता भरताला आणि प्रेक्षकांना वंदन करून त्यांचे आभार मानण्यासाठी भरतवाक्याचे गायन केले जात असे
..नंतर पहिल्या ते दहाव्या शतकाच्या दरम्यान शेकडो संस्कृत नाटके रचली गेली. त्यापैकी फारच थोडी आज उपलब्ध आहेत.
संस्कृत नाटकांमध्ये सर्वांत प्राचीन अशी नाटके अश्वघोष या नाटककाराची मानता येतील. त्याची नाटके बौद्ध धर्मातील शिकवणी संदर्भातील होती. परंतु ती त्रुटित स्वरूपात मिळालेली असल्याने कथानकाची पूर्ण कल्पना करता येत नाही. १९१२ मध्ये केरळात ताडपत्रांवर लिहिलेली भास या नाटककाराची तेरा नाटके सापडली. त्याने रचलेले स्वप्नवासवदत्ता हे संस्कृत भाषेतील एक महत्त्वाचे नाटक मानले जाते. कर्णभार आणि उरुभंग या एकांकी नाटकांमध्ये महाभारतातील खलपात्रांचे उदात्तीकरण असून ती नाटके करुणरसप्रधान आहेत. गुप्तकाळातील कालीदास या नाटककाराची मालविकाग्निमित्र, विक्रमोर्वशिय आणि अभिज्ञान शाकुंतल ही नाटके प्रसिद्ध आहेत. ती शृंगाररसप्रधान आहेत. शुद्रकाने रचलेले मृच्छकटिक हे एक लोकप्रिय संस्कृत नाटक होते. यात चारुदत्त आणि वसंतसंनेच्या प्रणयकथेला समांतर अशी राज्यक्रांतीची कथा आहे. इतर संस्कृत नाटककारंमध्ये भवभूती (उत्तररामचरित), विशाखादत्त (मुद्राराक्षस), इत्यादींचा समावेश होतो
गझनीच्या महंमदाच्या वारंवार झालेल्या स्वाऱ्यांनी उत्तर भारतातील राजसत्ता खिळखिळी केल्यानंतर निर्माण झालेल्या अस्थैर्यात नाटकांचा राजाश्रय गेला, संस्कृत भाषेची लोकप्रियता कमी झाली, विविध प्राकृत आणि प्रादेशिक भाषांचा विकास झाला, नाट्यलेखनातील सर्जनाचे महत्त्व कमी होऊन नाट्यशास्त्राच्या काटेकोर नियमपालनाला महत्त्व मिळत गेले आणि संस्कृत नाटक हळूहळू मागे पडत गेले. .. दहाव्या शतकानंतर प्राचीन भारतातील संस्कृत रंगभूमीचा शेवट झाला.

- प्रवीण भोळे
प्राध्यापक आणि विभागप्रमुख
ललित कला केंद्र, गुरुकुल
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ४११ ००७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अभिनयाच्या किमयाशाळा

  अभिनयाच्या किमयाशाळा १ . प्रयोगशाळा : एक अवकाश अवकाश म्हणजे जागा , जिथे काहीतरी सामावले जाते असे काहीतरी , म्हणजे प्रयोगशा...