शुक्रवार, २० मार्च, २०२०

नाटक - रंगभूमी परिचय : ९. ग्रीक आणि रोमन रंगभूमी

नाटक - रंगभूमी परिचय : . ग्रीक आणि रोमन रंगभूमी
प्राचीन ग्रीक देशात सुपिकता आणि मद्य यांचा देव डायनायससच्या आदराप्रित्यर्थ सादर होणाऱ्या धार्मिक विधियुक्त वृंदगानांतून (म्हणजेच दिथीरॅम्ब्ज) तसेच धार्मिक वृंदनृत्यातून ग्रीक नाटकांची मूळे दिसतात. वृंद आणि वृंदप्रमुख यांच्या परंपरागत समुहगानात थेसपिस या ग्रीक मनुष्याने प्रथमच समुहगानात उल्लेख असलेल्या व्यक्तिरेखांना भूमिका म्हणून जिवंतपणे सादर केले. त्यामुळेच ग्रीक रंगभूमीवरचा तो पहिला नट ठरला. त्याच तो अपूर्व प्रयोग घेऊन तो अथेन्सला गेला. सुरुवातीला या प्रकारावर बरीच टीका झाली, पण ..पू. सहावे शतकात पिसिस्ट्रॉटस या शासनकर्त्याच्या काळापासून अथेन्सच्या डायनायससच्या उत्सवांत या प्रकारंच्या स्पर्धा घ्यायला सुरुवात झाली, त्या प्रकाराला नंतर नाटक म्हणू लागले. नंतर वसंतऋतूंमधील उत्सवांमध्ये शोकनाटकांची स्पर्धा घेण्याची प्रथा पडली. डायनायससच्या उत्सवांमध्ये क्रीडाप्रकारांच्या स्पर्धा असत, वृंदगान पठनाच्या स्पर्धा असत आणि शेवटच्या तीन दिवसात शोकनाटकांच्या सादरीकरणाच्या स्पर्धा असत. कोणत्याही एका उत्सवामधील नाट्यस्पर्धेमध्ये ऑरकॉन या सरकारी अधिकाऱ्यांने निवडलेल्या तीनच नाटककारांना भाग घेता योत असे. प्रत्येक नाटकाकाराच्या तीन शोकनाटके आणि एक सॅटिरनाटक अशा चार नाटकांचे प्रयोग दाखविले जात असत. सुरुवातीच्या नाटकांमध्ये नाटककार हाच स्वतः एक नट असे आणि वृंदगानाप्रमाणे तो वृंदाच्या साथीने नाटक सादर करित असे. वेगवेगळे मुखवटे घालून तो वेगवेगळ्या भूमिका साकार करित असे. थेसपिसने कदाचित याच पद्धतीने नाट्यप्रयोग सादर केला असावा असे म्हणता येऊ शकते. एस्किलसने  एकाऐवजी दोन नटांची योजना केली तेव्हापासून नट आणि नाटककार हे दोन स्वतंत्र व्यवहार निर्माण झाले. नंतर नटांची संख्या नंतर तीन आणि नंतर चार झाली
एस्किलस (नाटके - प्रॉमिथीयस बाउंड, अॅग्मेम्नन, पर्शिअन्स, .), सोफोक्लिज (नाटके - इडिपस रेक्स, अॅन्टिगनी, .), युरिपिडिज (नाटके - मेडिआ, इलेक्ट्रा, .)  आणि अॅरिस्टोफेनस (नाटके - फ्रॉग्ज, बर्डस्, क्लाउडस्, .)  हे प्राचीन ग्रीक रंगभूमीवरील महत्त्वाचे नाटककार होत
ग्रीक नाटकांमध्ये अभिनय करणारे सर्व नट पुरुष असत आणि एका नाटककाराच्या चारही नाटकांमध्ये एकच नटसंच काम करित असे. स्त्रियांच्या भूमिका पुरुषच करित असत.

ग्रीक नाटकघरांमध्ये प्रेक्षकावकाश, वृंदालय, रंगमंच आणि स्केने या अंगांचा समावेश असे. टेकडीच्या नैसर्गिक उतारावर अर्धवर्तुळाकार पायऱ्यांच्या स्वरूपात प्रेक्षकावकाश असत असे. प्रेक्षकावकाशाच्या सर्वात खालच्या पायरीजवळ गोल आकाराचे वृंदालय असे. या जागेत ग्रीक नाटकातील वृंद गायन नर्तन करीत असे. वृंदालयाच्या पायऱ्या नसलेल्या परिघाजवळ रंगमंच असे. या रंगमंचावर बोलणारे नट असत आणि नाटकातील बहुतेक प्रसंग तेथेच दाखविले जात असत. रंगमंचाच्या मागच्या जागेला स्केने म्हणत असत. स्केनेच्या प्रेक्षकांकडे असलेल्या भिंतीला तीन दारे असत.
..पू. तिसऱ्या शतकापासून रोमन साम्राज्याच्या विस्ताराबरोबरच ग्रीक रंगभूमीचा ऱ्हास होत गेला आणि ..पू. दुसऱ्या शतकात तिचा अस्त झाला.
रोममध्येदेखील ग्रीकांप्रमाणे वेगवेगळ्या देवतांचे उत्सव होत असत, त्यात धार्मिकतेपेक्षा करमणुकीला प्राधान्य असे. साधारणपणे ग्रीक नाटकांवर आधारित नाटके सादर होत असत, परंतु रोमन जनतेला शोकात्मिकांच्या मानाने सुखात्मिकांमध्ये अधिक रस वाटल्याने रोमन सुखात्मिका अधिक प्रमाणावर विकसीत झाल्या. नट-नाटककारांना ग्रीक रंगभूमीवर असलेली प्रतिष्ठा मात्र रोमन रंगभूमीवर नव्हती. बरेचसे कलावंत हे गुलाम असत. ..पू. दुसरे शतक ते .. पहिले शतक हा रोमन रंगभूमीचा कालखंड मानला जातो.
रोमन नाटकघराची रचना ही जवळपास ग्रीक नाटकघरांप्रमाणेच होती. पण आसमंतात टेकड्या नसल्यामुळे प्रेक्षकावकाशाच्या नैसर्गिक उताराऐवजी लाकुड आणि मातीच्या सहाय्याने कृत्रिमरित्या उतार तयार केला जात असे. रोमन नाटकांमध्ये वृंद नसल्यामुळे वृंदालयाचा गोल आकाराने बराच लहान आणि अर्धगोल झाला, तर स्केनेची जागा सुसज्ज इमारतीने घेतली, भिंतीवरील दारांची संख्या वाढून पाच झाली. अनेक पुतळे आणि कमानी यांचा वापर करून नाटकघराच्या दर्शनी भागात सजावट करण्यात येत असे.
रोमन रंगभूमीवरील प्लॉटस् (नाटके - टू मेनेकमी, पॉट ऑफ गोल्ड, .), टेरेन्स (नाटके - मदर इन लॉ, ब्रदर्स, .) हे सुखात्मिका लिहिणारे तर सिनेका (नाटके - मीडीआ, फेड्रा, .) हा शोकात्मिका लिहिणारा प्रसिद्ध नाटककार होता
याच काळात काही भटके कलावंत रस्त्यांवर कसरती आणि नकलांचा मनोरंजक खेळ सादर करीत असत, त्यांना माइम असे म्हणत असत. यात पुरुषांसोबत स्त्रियादेखील काम करीत. हा प्रकार विनोदी आणि बराचसा चावट असत असे. यात मुखवट्यांचा वापर नसे.
रोमन रंगभूमीविषयी अधिक माहिती :
https://www.youtube.com/watch?v=kgDNgTSDd-Q

- प्रवीण भोळे
प्राध्यापक आणि विभागप्रमुख
ललित कला केंद्र, गुरुकुल
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ४११ ००७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अभिनयाच्या किमयाशाळा

  अभिनयाच्या किमयाशाळा १ . प्रयोगशाळा : एक अवकाश अवकाश म्हणजे जागा , जिथे काहीतरी सामावले जाते असे काहीतरी , म्हणजे प्रयोगशा...