शनिवार, २८ मार्च, २०२०

बाविशी सापळ्यात मराठी लोककलावंत

बाविशी सापळ्यात मराठी लोककलावंत

पहिले मराठी नाटक कोणते?’ या विषयावर मराठी नाटक करणाऱ्या आणि पाहणाऱ्या सगळ्यांनाच वाद घालायला आवडते. तंजावर या महाराष्ट्रापासून अनेक कोस लांब असलेल्या प्रांतात लिहिली गेलेली नाटके पहिली की विष्णूदास भाव्यांचेसीता-स्वयंवरकी ज्योतीराव फुल्यांनी लिहिलेल्यातृतीय रत्नया नाटकाकडे पहिलेपणाचा मान जातो की किर्लोस्करांचे शाकुंतल, सौभद्र पहिले मानावे का वि. . किर्तने यांचेथोरले माधवराव पेशवे’?, प्रत्येक प्रवाहाची आपापली कारणे आहेत, त्यातली काही आपापल्या परीने योग्य आहेत तर काही विशिष्ट आणि -नाटकीय हेतूने दुराग्रही आहेत. मग पहिले नाटक तरी कोणते ? हा प्रश्न अनुत्तरीतच रहातो. अभ्यासकांमध्ये एक मतप्रवाह असाही आहे, वरीलपैकी किंवा कोणतेही एक विशिष्ट नाटक मराठीतील पहिले नाटक नाही. कारण महाराष्ट्राला, मराठी भाषेला अतिशय संपन्न अशी लोक-रंगभूमीची परंपरा आहे. साधारणपणे तेराव्या-चौदाव्या शतकापासून वेगवेगळ्या लोकनाट्यांचा आढळ असल्याचे पुरावे मिळतात. वेगवेगळ्या प्रांतांमध्ये, वेगवेगळ्या बोलीभाषांमध्ये, एकल किंवा सामुदायिक, काही निवेदन-प्रधान तर काही संवाद, संभाषण असलेली, काही गायन-वादन-नृत्ययुक्त तर काही विनोदयुक्त अशी विविध प्रकारची लोकनाट्ये कधी विशिष्ट प्रसंगी तर कधी अशीच, कधी मंदिरांमध्ये, कधी बाजारात, रस्त्यांत तर कधी घरांच्या अंगणांत सादर होत होतीच. त्यातला धार्मिकतेचा भाग हळूहळू कमी होत गेला आणि मनोरंजकता, व्यावसायिकता वाढत गेली पण नाटकाची परंपरा मात्र चालूच राहिली, त्यामुळे नदीच्या मुळाप्रमाणे मराठी नाटकाचेही नेमके मूळ कोणते ते सांगणे अवघड आहे.

लोकनाट्याची परंपरा ही मौखिक परंपरा. कोणी वेगळा लेखक नाही कि दिग्दर्शक नाही. लोकनाट्यातील अभिनेता हा सर्वसमावेशक सादरकर्ता असतो. तो स्वतःचे पाठ्य स्वतःच निर्माण करतो, गातो, नाचतो, विनोदनिर्मिती करतोलोक-संस्कृताचे हे उपासक वेगवेगळ्या जातींचे होते. वंशपरंपरेने ते आपआपल्या परंपरा जतन करून त्यांचे संवर्धन करत असत. दुर्दैवाने त्यांच्या कलेचा मोबदला मात्र त्यांना मानाने मिळत नसे तर तो त्यांना आश्रितांसारखा मिळवावा लागत असे. या लोककलांना थेट राजाश्रय नव्हता. होता तो धर्माच्या अवतरणातील लोकाश्रय. त्यामुळे अक्षरशः भिकेच्या स्वरूपात त्याना आपल्या कलेचे मानधन मिळवावे लागत असे, हे दुर्दैव.

लिहिलेली नाटकेजशी सादर होऊ लागली तसे नाटकांत ती लिहिणाऱ्या लेखकांना आणि जे लिहिलेले आहे त्याचा स्पष्टपणे उच्चार करता येऊ शकणाऱ्या नटांना महत्त्व प्राप्त झाले. यांपैकी बहुतेक सगळे लेखक आणि नट हे समाजातल्या सुशिक्षित गटातले आणि ब्राह्मण जातीचे होते. लिखित करारांनी ते नाटक मंडळ्यांशी जोडले गेलेले होते. यांची नाटके पहायला प्रेक्षक तिकिटे काढून जायला लागले. आणि निदान हक्काचा मेहनताना या नटांना मिळू लागला. यांच्या नाटकांमध्ये व्यावसायीक सफाई असल्यामुळे ओबडधोबड लोकनाट्यांपेक्षा या नाटकांना अधिक गर्दी करू लागले. लोककलावंतांना आधीच आपली कमाई मिळवणे अवघड होते आता तर त्यांचा प्रेक्षकच दुरावल्याने, ते आता आणखीच अवघड झाले. या कलावंतांनी आपल्या कलेची उपासना करणे सोडले आणि ते चाकरमाने झाले. त्यांनी आपली मूळ गावे सोडली, ते शहरांकडे स्थलांतरीत झाले आणि मिळेल ती कामे करू लागले.

त्यांची मुले शाळेत जाऊ लागली, लिहू वाचू लागली. वेगवेगळ्या नोकऱ्या, व्यवसाय करू लागली. दरम्यानच्या काळात भारताला स्वातंत्र्य मिळाले. समाजातील सर्वच थरातील लोक सुशिक्षित होऊ लागल्याने मराठी नाटकातल्या मुख्यधारा रंगभूमीवर समाजातील वेगवेगळ्या थरांमधल्या, वेगवेगळ्या जाती-धर्माच्या नट-तंत्रज्ञांचा पुन्हा एकदा प्रवेश झाला खरा, पण त्यामुळे मराठी लोककलावंतांना पैसा, प्रसिद्धी मान-सन्मान मिळाला की नाही ह्याबद्दल कुठलेच ठाम विधान करता येत नाही.

महाराष्ट्रातल्या लोककला धर्मातल्या अवतरणातल्या सरंजामशाहीच्या बळी असल्यामुळे कॉमेदिआ देलार्ते या इटलीतल्या लोककलाप्रकाराने ज्या प्रमाणे समाजातील दांभिकता रंगमंचावर आणली, त्याप्रमाणे आपल्याकडे घडू शकले नाही. त्याऐवजी, दुर्दैर्वाने मराठी लोकरंगभूमीवरील कलावंत हेजेमनीला बळी पडले. वरच्या वर्गांचा अनुनय करत पातीव्रत्य, स्वामीनिष्ठा अशा सनातनी मुल्यांचा रंगमंचावरुन अनुनय झाला. समाजातील विषमतेवर टीका झाली, पण ती केवळ टिप्पणीतून, किंवा समस्या मांडल्या गेल्या त्या वरवरच्या, ढोबळ पद्धतीने. जहरी मार्मिकता त्यात अभावानेच आली

स्वातंत्र्यानंतर लोकरंगभूमीच्या समस्या अजूनच वाढल्या. आधुिनक जािणवा मांडण्यासाठी लोकरंगभूमीचा खेळण्यासारखा उपयोग होऊ लागला. ‘लोकांची रंगभूमी ती लोकरंगभूमी राहता, शिष्ट लोकांची, महोत्सवी नाटके करणारी लोकरंगभूमी ठरली. याखेरिज विद्यापीठीय संशोधकांना देखील डॉक्टरेट मिळवण्यासाठी लोकरंगभूमीचे कुरण उपलब्ध झाले. गरिब-बिचाऱ्या लोककलावंतांच्या मुलाखती घेऊन, त्यांची छायाचित्रे घेऊन प्राध्यापकांच्या पगारवाढी झाल्या असतील, लोककलांच्या-लोककलावंतांच्या परिस्थितीत मात्र या संशोधनाने काय फरक पडला हाच संशोधनाचा विषय ठरावा

जोसेफ हेलर ह्या लेखकानं १९६१ मध्येकॅच २२नावाची कादंबरी लिहिली. ह्या कादंबरीमध्ये सैनिकी नोकरशाहीच्या काही विचित्र परस्परविरोधी नियमांमुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीचे वर्णन केलेले आहे. दलदलीत फसलेला प्राणी ज्याप्रमाणं हातपाय मारायला लागला की अधिकाधिक खोलात जाऊ लागतो, पण त्याने काहीही प्रयत्न केले नाहीत तरी तो बुडतोच अशा पद्धतीच्या दुष्टचक्र परिस्थितीला तेव्हापासूनकॅच २२ परिस्थितीअसे नाव मिळाले. ह्या द्विधेच्या किंवा सुटकाच नसलेल्या परिस्थितीत सापडलेल्यांची अवस्था फारच बिकट असते कारण त्याच्या सुटकेच्या मार्गामुळेच नवा सापळा रचला जात असतो

आपल्या अधिकारांचा गैरवापर करण्यासाठी किंवा आपली गुपिते लपवण्यासाठी सत्तासंस्था नेहमीच अशा पद्धतीने कॅच २२ परिस्थिती निर्माण करत असते असे इतिहासातात अनेक दाखले मिळतात.  

आज मनोरंजनाचे क्षेत्र, त्यातील आर्थिक गणिते पूर्वीच्या मानाने अमूलाग्र बदलले आहेत. लोककला संपत चालल्यात, नामशेष होत चालल्यात अशी ओरड आपल्याला सर्वदूर ऐकायला मिळते. मनोरंजनाचे स्वरुप बदललेय, व्याप्ती मोठ्या प्रमाणात विस्तारलीय. पूर्वी व्यावसायीक नाटक मग चित्रपट त्यानंतर दूरचित्रवाणी, उपग्रह वाहिन्या आणि आता इंटरनेट, यू-ट्युब, बेवसिरिज ह्या बदलत जाणाऱ्या आणि लोकांना स्वस्तात आणि सुलभपणे उपलब्ध होणाऱ्या मनोरंजन माध्यमांनी लोकरंगभूमीसमोर आव्हाने उभी केली आहेत. बदललेल्या काळानुरुप आपल्या सादरीकरणात काहीच बदल केला नाही तर प्रेक्षकांना मुकावे लागणार आणि समजा तसे बदल केले तर मूळ स्वरूप नाहीसे होणार, अशी कॅच २२ परिस्थिती लोकरंगभूमीसमोर उभी राहीली आहे. परंपरेने चालत आलेल्या आपल्या कलेचे जतन करावे की परिस्थीतीनुसार आपल्या कलेत बदल करावा, अशा कात्रीत आजचा लोककलावंत सापडला आहे. शिवाय लोककलावंतांची मुले आज शिक्षण घेऊ लागली आहेत. आपल्या वाडवडिलांनी वंशपरंपरेने जी कला जोपसली, त्यासाठी प्रसंगी पडती भूमिका स्विकारली, त्याला ही नवी पिढी तयार नाही. त्यांनी शिक्षण घेऊन, नोकऱ्या करत समाजाच्या मुख्य प्रवाहात सामिल व्हायचे आहे. उपाशी पोटाने परंपरागत कला जोपासण्याची केवळ त्यांचीच जबाबदारी नाहीये. इतर जाती-धर्माच्या लोकांनी काही वर्षांपूर्वी शिक्षण घेऊन, नोकऱ्या करून जे मध्यमवर्गिय जीवन स्विकारले, ते आता त्यांना अंगिकारायचे आहे. तो त्यांचा हक्कच आहे. शिवाय महाराष्ट्रात काही जाती अशा आहेत, ज्यांना त्यांच्या परंपरागत कलांशिवाय उपजिविकेचा दुसला मार्गच उपलब्ध नाही. इतर जाती-धर्माच्या, विशेषतः उच्चवर्गियांनी लोककला शिकून, त्यांच्या उपजिविकेचा व्यवसाय म्हणून लोककलांचे सादरीकरण केल्यास पुन्हा वंशपरंपरेने जे लोक लोककला सादर करतात, त्यांच्या पोटावर पाय येतो. अशा पद्धतीने आपल्या मातीत जन्म घेतलेल्या आणि आपल्या पूर्वजांचे मनोरंजन केलेल्या लोकरंगभूमीसमोर आज अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झालेला आहे  आणि ह्या प्रश्नांची उत्तरे शोधणारे मार्ग नवे प्रश्न उपस्थित करत आहेत अशा बाविशी सापळ्यात मराठी लोककलावंत आज सापडले आहेत आणि ह्या सापळ्यातून कशी सुटका करून घ्यावी हे खरे आव्हान आहे.


प्रवीण भोळे
प्राध्यापक आणि विभागप्रमुख
ललित कला केंद्र, गुरुकुल
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ४११ ००७

praveen@unipune.ac

1 टिप्पणी:

अभिनयाच्या किमयाशाळा

  अभिनयाच्या किमयाशाळा १ . प्रयोगशाळा : एक अवकाश अवकाश म्हणजे जागा , जिथे काहीतरी सामावले जाते असे काहीतरी , म्हणजे प्रयोगशा...