बुधवार, २५ मार्च, २०२०

शकुंतलेपासून भानुमतीपर्यंत

शकुंतलेपासून भानुमतीपर्यंत

शकुंतला आणि सुभद्रा

एकोणिसाव्या शतकातील पाचव्या दशकात महाराष्ट्रात विष्णूदासी पद्धतीच्या नाटकाचा आरंभ झाला आणि स्वतः भाव्यांनी तसेच त्यांच्या ह्या नाट्यपठडीचे अनुकरण करणार्‍यांनी नंतर विष्णूदासी छापाची अनेक नाटके लिहून सादर केली. ह्या नाटकांचे मंचनदृष्ट्या सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे ह्यातला संगीत वृंदामध्ये बसलेला सूत्रधार नाटकांतली सर्व गाणी गात असे, नट फक्त गद्य संवाद म्हणत असत आणि सूत्रधार गाणी गात असताना गाण्यांच्या शब्दांना अनुसरून हातवारे करत असत. कथक आणि भरतनाट्यममध्ये आपण जसे बघतो की, गायक साथीदार मंचाच्या एका बाजूला बसून गाणे गात असतो आणि नर्तक त्या गाण्यावर नृत्य सादर करत असतो, असेच काहीसे ते चित्र असे. या प्रकारच्या नाटकांचे प्रयोग मुंबईसह महाराष्ट्रभर तसेच सीमाभागात होत असत. दि. ३१ मार्च १८४३ रोजी कर्नाटकातल्या एका छोट्याश्या गावात बळवंत पांडूरंग म्हणजेच अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा जन्म झाला. त्यांना लहानपणापासूनच नाटके पाहण्याची आणि कविता रचण्याची आवड होती. विष्णूदासी पद्धतीची अनेक आख्यान-नाटके त्यांच्या पहाण्यात आली. आपणही असा पद्धतीचे एखादे आख्यान रचावे असे त्यांना फार वाटे. १८६३ मध्ये उच्चशिक्षण घेण्याकरिता म्हणून ते पुण्याला आले. ‘समुद्रमंथन’, ‘विक्रमचरित्रअशी काही पदे त्यांनी ह्या काळात आख्यान-नाटकांसाठी लिहूनही दिली होती. त्याच सुमारासइंद्रसभानावाचे एक पारशी नाटक त्यांच्या पाहण्यात आले.
विशेषतः मुंबईत लोकप्रिय झालेल्या पारशी नाटकातही आख्यान-नाटकांप्रमाणे गाणे-नाचणे होतेच पण त्याचे स्वरूप मात्र विष्णूदासी नाटकांपेक्षा निराळे होते. ह्या नाटकांमध्ये पात्र अभिनय तर करतच असत आणि स्वतःच गाणे स्वतःच गात असत. शिवाय देखाव्यासाठी ह्या नाटकांमध्ये मंचाच्या मागच्या बाजूला रंगवलेले पडदेदेखील लावत असत. सूत्रधाराकरवी गाता स्वतः गाणाऱ्या नटाची कल्पना अण्णासाहेबांना फारच आवडली आपणही त्याप्रमाणे एखादे नाटक रचावे हे त्यांच्या मनाने घेतले
मराठी-कानडीशिवाय अण्णासाहेबांचे संस्कृत आणि इंग्रजी भाषांवर उत्तम प्रभुत्व होते. कालिदासाची तसेच शेक्सपिअरची अनेक नाटके त्यांनी वाचली होती. स्वतंत्र कथानकावर नवे नाटक लिहिण्याआधी सरावासाठी त्यांनी संस्कृतातल्या कालिदासाच्याअभिज्ञानशाकुंतलम्या नाटकाचा मराठी अनुवाद करण्याचे ठरविले, आणि तो केलाही. आणि १३ ऑक्टोबर १८८० रोजी पुण्यात मराठीतल्यासंगीत शाकुंतलया नाटकाच्या पहिल्या चार अंकाचा प्रयोग सादर केला. हे नाटक सादर करत असताना अण्णासाहेबांनी एक गंमत केली, मूळ संस्कृत नाट्यसंहितेत अनेक ठिकाणी श्लोकांची रचना केलेली होती. संस्कृत नाट्यपरंपरेत ह्या श्लोकांचे पठन केले जात असे, ते  गायले जात नसत. पण मराठी शाकुंतलात श्लोकांची पदे झाली, आणि प्रयोगात ता गायली गेली, आणि मराठीत संगीत नाटक अवतरले. नंतर किर्लोस्करांनी संपूर्ण शाकुंतल नाटक सादर केले. आणि नंतर दोन वर्षांनी स्वतंत्र असेसंगीत सौभद्रलिहून सादर केले.
किर्लोस्करांच्या ह्या पहिल्या दोन्ही नाटकांची रचना संस्कृत नाट्यपद्धतीला अनुसरूनच केलेली होती. त्यामुळे त्यात संस्कृत नाटकाप्रमाणे नांदी होती, प्रस्तावना होती, कथानक भारतीय पुराणातील होते. पण अनेक मंचनविशेष मात्र पाश्चिमात्य होते, मंच कमानी पद्धतीचा होता, त्यात रंगवलेले पडदे वापरलेले होते. संहितेतही, शेक्सपिअरच्या नाटकाप्रमाणे सुसंघटित कथानक होते आणि मानवी पातळीवरच्या व्यक्तिरेखा होत्या
किर्लोस्करांच्या सं. सौभद्रमध्ये रुख्मिणी आणि सुभद्रा. सुभद्रा म्हणते आहे, ''परदुःख शितळ गं, वहिनी."

अशा प्रकारे मराठीतील आद्य संगीत नाटकांमधल्या दोन्ही नायिका, शकुंतला आणि सुभद्रा संस्कृत, मराठी आणि युरोपिय अशा मिश्र वैशिष्ट्यांनी युक्त अशा होत्या.

वास्तववादतिकडून इकडे

१८७० च्या अलिकडे युरोपात ज्या पद्धतीची नाटके लिहिली, सादर केली जात होती त्यात प्रामुख्याने स्वच्छंदतावादी नाटकांचा आणि अतीनाट्यांचा समावेश होता. प्रेमकथा, जादूकथा, कृष्ण-धवल व्यक्तिचित्रण, योगायोगांच्या गमतीजमती, सुखान्त शेवट, नाटकाच्या शेवटी चांगल्याचा जय आणि वाईटाचा पराजय असे घटक त्याच खच्चून भरलेले असत. १८१५ मध्ये नेपालिअनचा पाडाव झाल्यानंतरच खरे तर स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ह्या तत्वांवरचा लोकांचा विश्वास उडला होता. १८५०च्या सुमारास मानव्यशास्त्राच्या अंतर्गत समाजशास्त्र ह्या नव्या शाखेचा समावेश झाला. सुरुवातीच्या काळातला एक महत्त्वाचा समाजशास्त्रज्ञ ऑगस्ट कॉम्ते ह्याने तर असे प्रतीपीदन केले की, समाजाचा अभ्यास हा अत्यंत महत्त्वाचा असून कोणत्याही शाखेच्या अभ्यासाचा अंतिमतः उपयोग हा समाजाच्या विकासासाठीच व्हायला हवा. निरिक्षण आणि प्रयोगशिलतेतूनच खरे ज्ञान मिळू शकते आणि पंचेंद्रियांना जे जाणवते तेच तेवढे सत्य असते
कॉम्तेच्या प्रतिपादनाला बळकटी मिळाली ती त्याच सुमाराल मांडल्या गेलेल्या डार्विनच्या सिद्धांतामुळे. माणूस चांगला किंवा वाईट नसतो तर तो जे वर्तन करतो ते त्याच्या अनुवांशिक गुणांमुळे आणि त्याच्या आजूबाजूच्या परिस्थितीमुळे असा विचार डार्विनने मांडला आणि तो मान्यही झाला. या पार्श्वभूमीवर जूनी स्वच्छंदतावादी नाटके खोटी वाटू लागली. तोपर्यंत युरोपभर औद्योगीक क्रांती झालेली होती. नव्या उद्योगधंद्यांमुळे नवीन शहरे विकसीत झाली. लाखोंच्या संख्येने खेड्याकडून शहराकडे लोकांचे स्थलांतर झाले. एकसूरी काम आणि रोजच्या रोज हातात खुळखुळणारा पैसा ह्यामुळे त्यांच्यात व्यसनांचे प्रमाण वाढले, व्यसनांमुळे गुन्हेगारी वाढली. केवळ सत्याचा विजयअसत्याचा पराजय याशिवाय नव्या समस्या, नवे प्रश्न आणि नवे मुद्दे निर्माण झाले आणि युरोपात वास्तववाद अवतरला. सुरुवातीला तो आला तो कादंबऱ्यांमधून पण लवकरच नाटकांमधून व्यक्त होऊ लागला. हेन्रिक इब्सेन, ऑगस्ट स्ट्रिंडबर्ग, अंतन चेकव्ह, . नाटककारांनी डोळ्यांना दिसणारे सत्य जसेच्या तसे नाटकांमधून मांडायला सुरुवात केली
१८७५ मध्ये युरोपात अवतरलेला हा वास्तववाद महाराष्ट्रात पोचला तो सुमारे पन्नास वर्षांनी. इब्सेनचा समकालीन नाटककार ब्यर्नसन ह्याच्यागाँटलेटह्या नाटकाचे रुपांतर १९३३ मध्ये मराठी रंगभूमीवरआंधळ्यांची शाळाह्या नावाने सादर झाले. श्री. वी. वर्तक ह्यांनी हे रुपांतर केलेले होते आणि नाट्यमन्वंतर ह्या संस्थेने ते नाटक मंचित केले होते. चुका ह्या प्रत्येकाकडूनच होत असतात, कारण चुका करणारा माणूस हा मुळात चांगला किंवा वाईट नसतो तो फक्त त्या त्या परिस्थितीला प्रतिक्रिया देत असतो, म्हणून प्रत्येकाला आपल्या बचावाची संधी मिळायला हवी, हे साधारणपणे नाटकाचे कथासूत्र. पण त्याचे सुलभीकरण करून मराठी नाटकात सादर झाले. तरिही हे नाटक अनेक पातळ्यांवर महत्त्वाचे ठरते. नाट्यप्रयोग ही नाटककार, नट, नेपथ्यकार, संगीतनियोजक, प्रकाशयोजक, इत्यादिंच्या सहाय्याने दिग्दर्शकाने उभी करायची एकसंध अशी कलाकृती आहे, हा विचार ह्या नाटकाने सिद्ध केला. नाटकाचे नेपथ्य, वेशभूषा, संवाद, . घटकांमधून मराठी रंगभूमीवर वास्तववादाला सुरुवात झाली. अजून एक महत्त्वाची बाब ह्या नाटकाच्या निमित्ताने घडली, नाटकातल्या स्त्री-भूमिका स्त्रीयांनीच केलेल्या होत्या. नाटकात गाणी होती पण ती संगीत नाटकांमधल्या पदांप्रमाणे सादर होत नव्हती, तर नाट्यप्रसंगाचा एक भाग म्हणून ती सादर होत होती. त्यांचे साथीदार मंचावर दिसत असत. मराठी रंगभूमीवर बदल घडवणारेआंधळ्यांची शाळाहे एक महत्त्वाचे नाटक होते ह्यात शंकाच नाही.  

नोराच्या मराठी बहिणी

अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपात नाटकांमधून वास्तववाद व्यक्त होऊ लागला. नॉर्वेतला नाटककार हेन्रीक इब्सेन ह्याने बरीचशी वास्तववादी नाटके लिहिली. समाजात दिसणारे अनेक प्रश्न, समस्या त्याने नाटकांमधून मांडल्या. तत्कालीन समाजातल्या तथाकथीत आदर्शवादाला ती धक्का देणारी होती. चांगल्याचुंगल्या गोष्टी नाटकांमधून मांडायचे सोडून हा इब्सेन नावाचा इसम ह्या भलत्यासलत्या गोष्टी काय नाटकांमधून मांडतो आहे, असा विचार करून समाजातला स्वतःला संस्कृतीरक्षक म्हणवून घेणारा एक गट खवळला. त्या लोकांनी इब्सेनच्या नाटकांवर बंदी घातली, इतकेच नाही तर इब्सेनला धमक्या देखील दिल्या. त्यावर इब्सेनने दिलेले उत्तर फार महत्त्वाचे आहे. तो म्हणतो, ‘माझे नाटक म्हणजे समाजासमोर उभा धरलेला आरसा आहे. जे समाजात आहे, तेच माझ्या नाटकात आहे. माझ्या नाटकात आदर्श गोष्टी असाव्यात असे तुम्हाला वाटते, तर आधी समाज बदला, नाटक आपोआपच बदलेल.’ इब्सेनने १८७९ मध्ये डॉल्स हाऊस नावाचे एक नाटक लिहिले. नाटकाची नायिका नोरा. नवऱ्याच्या आजारपणात त्याच्या औषधोपचारासाठी तिने त्याला सांगता एक कर्ज घेतलेले असते. नवऱ्याच्या लपून-छपून ते चुकवताना त्याच्या मनात संशय निर्माण होतो. नोरा तो दूर करण्याचा प्रयत्न करते, पण नवऱ्याला पटत नाही, म्हणून ती आपले घर सोडून जाते, असे साधारणपणे ह्या नाटकाचे कथानक आहे.
१९३४ मध्ये मराठी रंगभूमीवर आलेल्या प्र. के. अत्रे ह्याच्याघराबाहेरनाटकातली निर्मला आणि १९४२ मध्ये आलेल्या मो. . रांगणेकर ह्यांच्याकुलवधूनाटकातली भानुमती ह्या दोन स्त्रिया देखील आपले घर सोडून बाहेर पडतात. नाट्यलेखनावर आणि मंचनावर पश्चिमेकडेच्या तंत्राचा प्रभाव पडण्याचा हाच तो कालखंड. एका अर्थाने निर्मला आणि भानुमती ह्या इब्सेनने निर्माण केलेल्या नोराच्याच बहिणी
रांगणेकरांच्या कुलवधू नाटकातली भानुमती (ज्याेत्स्ना भोळे)

घराबाहेरमधल्या निर्मलेवर पद्मनाभ नावाच्या तिच्या मित्राला प्रेमपत्र लिहिल्याचा आळ घेतात, म्हणून ती घराबाहेर पडते. तरकुलवधूमधील भानुमती नवऱ्याची नोकरी गेल्याने सिनेमात कामे करू लागते. नवरा तिच्यावर भलभलते आळ घेऊ लागतो, म्हणून तीही घर सोडून जाते

घर सोडून जाताना नोराने आपटलेल्या दाराचे पडसाद अगदी महाराष्ट्रापर्यंत उमटले आणि स्त्री-स्वातंत्र्य ह्या विषयावर आपल्याकडेही लिहिले जाऊ लागले, असे आपल्याकडचे अभ्यासक म्हणू लागले. अर्थात हे पूर्णसत्य नव्हते. कारणघराबाहेरनाटकात घराबाहेर पडलेली निर्मला नाटकाच्या शेवटी तिच्या बाळाच्या ओढीने नवऱ्याला माफ करते आणि परत घरात येते.  ‘कुलवधूमधील भानुमती नवऱ्याचे घर सोडून जाते, पण कुठे ? तर कोकणात आपल्या सासू-सासऱ्यांकडे. स्वतः पैसे कमावत असलेली ही स्त्री एकटी, स्वतंत्र रहात नाहीच. त्यामुळे अत्रे आपल्या नाटकातून, ‘स्त्री ही क्षणाची पत्नी आहे, आणि अनंत काळाची माता आहेहे तत्वज्ञान निर्मलेवर लादतात, तर रांगणेकरांची भानूमती स्वतःला सोज्वळ सून बनवून घेण्यात धन्यता मानते. समाज बदला म्हणजे नाटक बदलेल, असे आश्वासन देणाऱ्या इब्सेनचे धैर्य तत्कालीन मराठी नाटकांमध्ये नसल्यामुळे समाजातल्या चालीरीतींना दुखवण्याचे धोरण धरणाऱ्या नाटककारांमुळे मराठी रंगभूमीवरही नोरा अवतरल्या, हे खरे, पण त्या इब्सेनच्या नोराप्रमाणे स्वाभिमानी आणि धडाडीच्या राहता केवळ माता आणि सून बनून राहिल्या, हे मराठी नाटकाचे दुर्दैव.

प्रवीण भोळे
प्राध्यापक आणि विभागप्रमुख
ललित कला केंद्रगुरुकुल
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठपुणे ४११ ००७

(पूर्वप्रसिद्धी : दै. प्रभात)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अभिनयाच्या किमयाशाळा

  अभिनयाच्या किमयाशाळा १ . प्रयोगशाळा : एक अवकाश अवकाश म्हणजे जागा , जिथे काहीतरी सामावले जाते असे काहीतरी , म्हणजे प्रयोगशा...