अभिनय : त्यांच्या मातीतला
आणि आपल्या
अगदी प्राचीन
काळापासून अभिनय हा रंगभूमीवरील जिवंत नाट्यप्रयोगाच्या गाभ्याकडचा असा अपरिहार्य
भाग राहिलेला आहे. मनुष्यप्राण्यातली अनुकरणप्रियता – म्हणजे प्रत्येक मनुष्याला
कोणाचे तरी अनुकरण करण्याची किंवा अनुकरण बघून दाद देण्याची आवड असते, कथाप्रियता –
म्हणजे सर्व माणसांना गोष्टी सांगायला आणि ऐकायला आवडतात, त्यांना अद्भूताविषयी
वाटणारे आकर्षण, इत्यादि मूलभूत प्रेरणांमधून नाटकाचा आणि पर्यायाने अभिनयाचा जन्म
झाला असावा. आदिम अवस्थेपासून जेव्हा मनुष्य टोळ्या करून रहात होता, ते आजपर्यंत
अभिनयाच्या स्वरूपात वेगवेगळ्या पातळ्यांवर अनेक बदल झालेले आढळतात. एवढेच नाही,
तर एकाच काळातही वेगवेगळ्या प्रांतात अभिनयाचे स्वरुप वेगवेगळे दिसते. म्हणून
अभिनय या संकल्पनेची एकच एकच व्याख्या करता येणे अशक्य आहे. प्रत्येक ठिकाणी, त्या
त्या ठिकाणची संस्कृती, तेथील भौगोलिक स्थिती, तेथील सामाजिक संदर्भ, तेव्हाच्या
आणि तेथील नाटकांचे आशय-विषय, नाटकांमधील भाषा, नाटकघराची रचना, इत्यादि घटकांचा त्या
वेळच्या आणि तेथील अभिनयाच्या स्वरुपावर परिणाम होत गेला, आपल्या पूर्वसूरींकडून
काही घेत, काही नाकारत तर काही नवीन निर्माण करत, प्रत्येक वेळी-प्रत्येक ठिकाणी
अभिनयाची एक वेगळी वैशिष्ट्यपूर्ण शैली निर्माण होत गेली. मावळतीकडच्या आणि
उगवतीकडच्या देशांमधील लोकपरंपरेत अभिनयाचे स्वरुप कसे भिन्न आहे आणि त्याची कारणे
कोणती, ते आपण पहाणार आहोत.
लोक म्हणजे
खेड्यांमध्ये किंवा शहरांमध्ये रहाणारे, परंपरेने चालत आलेले जीवन जगणारे किंवा
परंपरेने चालत आलेल्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे ते लोक असे आपण म्हणू शकतो.
लोकांमध्ये जन्म घेतलेल्या, विकास पावलेल्या आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे
संक्रमित होणाऱ्या रंगभूमीला लोकरंगभूमी असे म्हणता येईल. लोकरंगभूमी ही
प्रदेशविशिष्ट, जातीविशिष्ट, भाषाविशिष्ट अशी अनेक प्रकारची असू शकते.
लोकरंगभूमी ही अर्थातच मनोरंजन तर
करतेच, पण त्याच बरोबर ती त्या त्या समाजातील लोक-संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारी
असते. एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत जोपासल्या गेलेल्या गोष्टी, गाणी, म्हणी,
उखाणे, चित्र, शिल्प, नृत्य, आजारांवरील उपाय, पोषाख, खाद्य-पदार्थ अशा आणि
अशांसारख्या अनेक बाबींचा समावेश तिच्या परिघात होतो. परंपरेने मौखिक किंवा अलिखित
स्वरुपात चालत येणे हे लोकरंगभूमीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
मुख्यतः
समुहमनाच्या प्रेरणेतूनच लोकरंगभूमीची निर्मीती, संगोपन आणि संवर्धन होत असते.
नागर रंगभूमीवरील नाटकांच्या तुलनेत बहूतेक सर्व लोकनाट्यप्रकारांना लिखीत संहिता
नसते. प्रमाण-भाषेच्या ऐवजी ती नाटके कोणत्यातरी बोलीत असतात. त्यात
संगीत-नृत्याचा अंतर्भाव असतो. बंदिस्त नाटकघरात ही क्वचितच सादर व्हायची, अलीकडे
होऊ लागली आहेत. एरवी पारवर, तंबूत, अंगणात, रस्त्याच्या कडेला, बाजारातल्या
कोपऱ्यात, जत्रेत तात्पुरत्या बांधलेल्या ओट्यावर ती सादर होतात. नेपथ्य-प्रकाशासारख्या
नाट्यघटकांना दुय्यम ठरवून अभिनयावर प्रमुख मदार असते. या नाटकांच्या औपचारिक
तालमी होतात किंवा होत नाहीत, परंतु प्रयोगात नटांच्या उत्स्फूर्ताविष्कारावर आणि
तत्कालस्फूर्तीवर भर असतो. अभिजात परंपरांमधील नाटकांमधल्या नियमबद्धता,
संकेतबद्धता आणि औचित्य-संकेत या वैशिष्ट्यांच्या मानाने मोकळेढाकळेपणा, रांगडेपणा
आढळतो. लोकरंगभूमीवरील बहुतेक सगळी नाटके आणि त्यातील अभिनय बिनवास्तववादी असतो.
वेगवेगळे धार्मिक
विधी, अनुकरणात्मक नृत्ये आणि गायन-वादनासह गोष्टी सांगणे या बाबींमधून नाटक,
रंगभूमी आकाराला आली असावी. पश्चिमेकडे प्राचीन इजीप्तच्या संस्कृतीत साधारणपणे
इसवीसनाच्या आधी अठराशेच्या आसपास नाटकाचे आणि अभिनयाचे काही अंश अस्तित्वात
असल्याचे पुरावे मिळतात. इजीप्तमधील आबिदोज या शहरात ओसायरीस देवाची मिरवणूक काढली
जात असे, या मिरवणूकीत नृत्य असे, संगीत असे, शिवाय एका इसमाला ओसायरीसचा पोषाख
घातला जात असे, म्हणजेच आपण जे नाही ती व्यक्तिरेखा धारण करणे आणि त्यासाठी
वेशभूषा करणे हे नाटकाचे घटक तिथे होते. ही एक प्रकारची लोकरंगभूमीच होती. या
मिरवणूकीचे कोणत्या प्रकारच्या सादरीकरणांत अवस्थांतरण झाले नाही आणि काही
कारणांमुळे नंतर ही परंपरा खंडीत झाली त्यामुळे नंतरच्या नाटक-रंगभूमीवर तिचा काही
परिणामही दिसून येत नाही.
त्यानंतर
इसवीसनाच्या पूर्वी पाचशेच्या आसपास ग्रीक संस्कृतीत रंगभूमी प्रस्थापीत झाली. या
रंगभूमीवरील अभिनयात स्वच्छ व मोठ्याने बोलणे महत्त्वाचे होते. अथेन्ससारख्या
राजकियदृष्ट्या जागरुक समाजात उत्तम वकृत्व हे एका प्रभावी शस्त्रासारखे
असल्यामुळे ही वकृत्वकला अंगी असणाऱ्या नटांना त्या समाजात मोठेच महत्त्व प्राप्त
झाले होते. डायनेशियसच्या भरभराटीच्या काळातील ग्रीक रंगभूमी ही नागर रंगभूमी
होती. नंतरच्या दोनशे वर्षांनी, रोमन साम्राज्यात गावोंगावी हिंडून रस्त्यांत,
बाजारांत, जत्रांमध्ये नृत्य, वादन, गायन, नकला, कसरती, मुकाभिनय करणाऱ्या भटक्या
कलावंतांची अवस्था मात्र फारच हीन-दीन, हलाखीची, गरिबीची आणि बिकट होती. भूमी आपली
असो वा त्यांची, नागर रंगभूमीवरील नटांना प्रतिष्ठा आणि लोककलावंतांची उपेक्षा हा
जणू पूर्वीपासून चालत आलेला आदि-बंध असावा.
पश्चिमेकडे
रोमच्या पाडावानंतर अनेक वर्षे नाटक, रंगभूमीचे अस्तित्व नव्हते, असे म्हणतात. ते
काही फारसे खरे नाही. जाहीर प्रमाणावर आणि नाटकघरांमध्येच केवळ नाटके सादर होत
नव्हती. जत्रांमधून, दारुच्या गुत्त्यांमधून किंवा बड्या उमरावांनी दिलेल्या खाजगी
मेजवान्यांमधून अनेक लोककलावंत आपली कला सादर करत होतेच. त्यांना पुरेसा मोबदला
मिळत नव्हता शिवाय प्रतिष्ठाही नव्हती. परंतु रंगभूमीचा काळा कालखंड समजल्या
जाणाऱ्या या काळात रंगभूमी जिवंत ठेवली ती याच कलावंतांनी. सोंगे घेणारे,
प्राण्यांचे खेळ करून दाखवणारे, नकला करणारे, वाद्य वादन करणारे, दुसरे वीरांच्या
कथा गाण्यांमधून सांगणारे कथेकरी आणि तिसरे जत्रा, उत्सवांमधून मनोरंजनाचे खेळ
करणारे अशा तीन प्रमुख प्रकारांमधून ही परंपरा अखंडित राहिली.
मध्ययुगीन युरोपिय
रंगभूमीचा उगम धार्मिक परिसरात झाला, नंतर पुनरूज्जीवन काळाच्या सुरुवातीला युरोपात
प्रबोधन करणारी नाटके आणि काही लौकिक नाट्यप्रकार असे दोन स्वतंत्र प्रवाह
अस्तित्वात आले. प्रबोधन करणारी नाटके ही नैतिक आणि धार्मिक प्रश्नांवरील
उपदेशात्मक आणि प्रतिकात्मक अशा स्वरुपाची असत. लौकिक नाट्यप्रकारांमध्ये
शौर्यकथायुक्त नाटके, दैनंदिन घटनांवरील प्रहसने आणि कोणत्याही गंभीर किंवा विनोदी
घटनांवरील लघुनाटके म्हणजेच इन्टरल्युडस् यांचा समावेश होता. त्यातही प्रहसने आणि
लघुनाटके अत्यंत लोकप्रिय असल्यामुळे कोणत्याही कार्यक्रमाच्या वा समारंभाच्या
प्रसंगी त्यांचे प्रयोग आयोजित केले जात असत. ही लौकिक नाटके सादर करणारे
लोककलांवत असत, त्यांच्यामुळेच धंदेवाईक नटांची परंपरा सुरू झाली असे म्हणता येईल.
लोक-अभिनेत्यांमुळेच पुनरुज्जीवन काळात नट पुन्हा एकदा स्वतंत्र कलावंत म्हणून
प्रस्थापित झाला. लोककलावंताला आणि एकूणच
अभिनयाच्या पेशाला प्रतिष्ठा प्राप्त झाली.
चौदाव्या शतकात इटलीमध्ये उगम पावलेला
आणि पुढच्या तीनशे वर्षांत जवळजवळ संपूर्ण युरोपभर पोचलेला युरोपिय लोकरंगभूमीचा
प्रकार म्हणजे कॉमेदिया देला’र्त होय. ही नट केंद्रस्थानी असलेली नाट्यपरंपरा होती. यातला देला’र्त हा शब्द नटाचा धंदेवाईकपणा सुचवतो. कॉमेदिया देला’र्त म्हणजे पोटापाण्यासाठी अभिनयाचा धंदा करणाऱ्या नटांचे
नाटक. त्याच काळात राजदरबारांमध्ये किंवा दालनांमध्ये कॉमेदिया येरुदिता नावाचा
प्रकार सादर होत असे. येरुदिता म्हणजे शिकलेले लोक, कॉमेदिया येरुदिता म्हणजे
शिकलेल्या लोकांचे नाटक, कारण त्यांच्याकडे नाट्यसंहिता असत, ज्या त्यांना वाचता
येत असत. देला’र्त करणारे
अशिक्षित, भटके असल्यामुळे त्यांचे प्रयोग येरुदितांच्या प्रयोगांपेक्षा फारच
वेगळे असत. एकतर त्यांच्या सादरीकरणाकरता नाटकघराची गरज असेच असे काही नव्हते.
जत्रा-उत्सवांमधून रस्त्याचा कोपरा, चौक इथे ते होत असत. हातचलाखी करणारे, जगलींग
करणारे, कसरतपटू यांसारखे व्यावसायिक त्यांत काम करत असत. या नाटकांचा उल्लेख
कॉमेदिया देला’र्त ऑल
इम्प्रोव्हिजो असा देखील केला जातो. याचा अर्थ व्यावसायिकरित्या सादर होणारे
उत्स्फुर्ताविष्काराचा समावेश असलेले विनोदी नाटक होय. म्हणजेच या नाटकांना लिखीत
संहिता नसत असत. यांत मुखवट्यांचा वापर केला जात असल्यामुळे त्यांना कॉमेडी ऑव्ह
मास्कस् म्हणूनही ओळखले जाई. ठराविक प्रकारची पात्रे म्हणजे स्टॉक कॅरेक्टरस्,
बहुधा अर्ध्या-मुखवट्यांचा वापर, रुपरेषात्मक कथानके, कथानकानुसार पात्रांच्या
नात्यांमध्ये किंवा संबंधात होणारे बदल आणि लाझी म्हणजेच विनोदनिर्मितीच्या
पूर्वनियोजीत परिचित क्लृप्त्या ही या परंपरेची वैशिष्ट्ये होती. शिवाय नृत्ये, कसरती,
संगीत, रंगीबेरंगी कपडे यांचाही त्यांत भरपूर उपयोग असे.
कॉमेदिया देला’र्तच्या प्रत्येक संघात साधारणपणे दहा ते बारा नट असत.
भावुक प्रेमिक, म्हातारी माणसे, विनोदी नोकर अशा ठराविक भूमिका ते करत असत. यांच
भूमिकांना घेऊन प्रत्येक संचात वेगवेगळी अशी अनेक कथानके असत. संवाद अर्थातच
लिहिलेले नसत, म्हणून सर्व नट विशेषतः म्हातारे आणि नोकर हे मुखवटाधारी नट
मुक्तपणे व उत्स्फुर्तपणे प्रसंगोचित संवाद म्हणत. या संवादांमध्ये मूर्खपणा आणि
बाष्कळपणा यांचा भरपूर उपयोग करून विनोदनिर्मिती होई. बोचऱ्या विनोदासोबतच
प्रेमिकांचे काव्यात्म, भावुक प्रसंग हे देखील देला’र्त प्रकाराचे वैशिष्ट्य होते. लिखित संहितांचा आधार न घेता
प्रयोगातल्या जिवंतपणाने या प्रकाराने अनेक लोकांचे रंजन केले.
या परंपरेतील
नाटकांमध्ये, मंचावरील नटांचे उभे रहाणे, एकमेकांना अभिवादन करणे या गोष्टी अत्यंत
डौलदारपणे आणि नाजूकपणे सादर होत होत्या, विशेषतः नाटकात तरुण प्रेमिकांचे काम
करणाऱ्या नटांच्या हालचाली, त्यांचे हातवारे, सुस्कारे सोडताना होणाऱ्या मानेच्या,
खांद्यांच्या, छातीच्या हालचाली, दुःख, आनंद व्यक्त करताना होणाऱ्या, तसेच गिटार
वादन व नृत्य करताना होणाऱ्या हालचाली या भारदस्त आणि उमद्या असाव्यात अशी अपेक्षा
लुईजी रिकोबानी हा ज्येष्ठ नट उमेदवारी करणाऱ्या नव्या नटांना उपदेश देताना व्यक्त
करतो. प्रेमिकांच्या मानाने खत्रुड
म्हातारे आणि मदतनीस नोकर यांच्या हालचालींमध्ये अधिक वैविध्य असत असे.
उदाहरणार्थ, पत्र लिहिणे, वस्तू वाहून नेणे, मारामाऱ्या करणे, जमिनीवर गडाबडा
लोळणे, स्लॅपस्टिकचा वापर (अक्षरशः ‘टू स्लॅप विथ अ स्टिक’, आजही सर्कशींमध्ये विदुषक एकमेकांना पृष्ठभागावर छोट्या
फळीने मारतात, अर्थात, एकाने मारल्यासारखे करणे, दुसऱ्याने खूप लागल्यासारखी
प्रतीक्रिया देणे), जादूटोणा, वेषांतरे, इत्यादि. नोकर आणि म्हातारे यांच्या
हालचाली विक्षिप्त, विरुप म्हणजेच ग्रोटेस्क अशा परंतु बेढब व बेंगरुळ नसतील अशा
असत.
सतराव्या
शतकापर्यंत या लोककलेचा प्रसार इटलीबाहेरही झाला. इटलीमधले हे भटके संघ स्पेन,
इंग्लंड, जर्मनी आणि फ्रान्समध्ये जाऊन आपली नाटके सादर करू लागले. अठराव्या
शतकाच्या शेवटपर्यंत त्यांचा मुक्काम पॅरिसला होता. नंतर हळूहळू हे भटके संघ
स्थिरावले आणि उत्स्फुर्तनाट्याऐवजी लिखीत संहितांचे मंचन करू लागले आणि त्यातूनच
नवे युरोपिय नाटक जन्माला आले. अशा प्रकारे या लोककलेची परंपरा खंडीत झाली नाही,
तर लोककलाच मुख्यधारा बनली.
इंग्लंडमध्ये
एलिझाबेथीय रंगभूमीला देखील नट मिळाले ते तिथल्या स्थानिक लोकरंगभूमीवरूनच.
एलिझाबेथीय रंगभूमीवर अभिनयाची एक वैशिष्ट्यपूर्ण शैली निर्माण झाली, त्याची कारणे
जेवढी तेथील नाटककारांच्या लिखाणात आणि मंचस्थापत्यात आहेत तेवढेच एक महत्त्वाचे
कारण म्हणजे त्यावर असलेला लोककलावंताच्या अभिनयाचा प्रभाव हे देखील आहे. इथे देखील
लोकरंगभूमीचे परिवर्तन मुख्य धारेत झाल्याचे दिसून येईल.
प्राचीन भारतीय
रंगभूमीचा दाखला इसवीसनाच्या अलिकडे-पलीकडे लिहिल्या गेलेल्या संस्कृत-प्राकृत
नाटकांवरून तसेच त्याच काळात लिहिल्या गेलेल्या नाट्यशास्त्र या ग्रंथावरून मिळतो.
नाट्यशास्त्रात नाटकांचे जे दहा प्रकार वर्णन केलेले आहेत, त्यांपैकी समावकार,
भाण, प्रहसन अशा बऱ्याचशा प्रकारांचे मूळ लोकनाट्यांमध्ये असावे, अशी कल्पना
त्यांच्या स्वरुपावरून करता येते.
दहाव्या शतकानंतर
उदयास आलेल्या भक्ती चळवळीमुळे प्रादेशिक भाषांमध्ये धार्मिक वाङ्मय निर्माण झाले.
आणि त्यातूनच प्रदेशविशिष्ठ लोकरंगभूमीचा उगम झाला.
लोकरंगभूमी ही
विशिष्ठ समूहात निर्मित आणि विकसीत झालेली असल्यामुळे त्या त्या समुहातील
लोकजीवनाचे प्रतिबिंब तिच्यात दिसून येते. म्हणूनच भारतातल्या विविध लोकपरंपरांमध्ये
बोली भाषा, सांगीतीक रचना, पोषाख, पदन्यास, इत्यादि घटकांची विविधता दिसून येते.
भारतीय लोकरंगभूमी
असा कोणताही एकजिनसी वेगळा प्रकार अस्तित्वात नाही, तर भारतातील विविध प्रांतात
असलेल्या तमाशा, दशावतार, यक्षगान, भागवत मेळे, कुडीअट्टम, तैय्यम, भवई, नौटंकी,
स्वांग, छाऊ, जात्रा, इत्यादि विविध लोकपरंपरांना सोयीसाठी एकत्रितपणे भारतीय
लोकरंगभूमी अशी संज्ञा इथे वापरली गेली आहे. भारतातील विविध प्रांतात आढळणाऱ्या या
विविध लोकपरंपरांमध्ये कमालीचे वैविध्य आहे, तरी देखील या परंपरांमधून सादरीकरणाची,
अभिनयाची काही समान वैशिष्ट्ये आढळून येतात.
भारतातील
वेगवेगळ्या लोकनाट्य-परंपरांचा आढावा घेतल्यास, बहुतेक सर्व लोकनाट्यप्रकारांमध्ये
पुढील पाच घटकांचा समावेश दिसतो : विधी, सूत्रधार, विदूषक, संगीत आणि नृत्य. प्रत्यक्ष पूजा, मंगलाचरण,
ईश्वराचे स्तवन, प्रार्थना, इत्यादि बाबींचा विधींमध्ये समावेश होतो. वेगवेगळ्या
नाट्यपरंपरांमध्ये मुख्य सादरकर्त्याला वेगवेगळी नावे आहेत. यक्षगानात त्याला
भागवत म्हणतात, थेरुकुट्टूमध्ये त्याला कट्टीआकरन म्हणतात, तर तमाशात सरदार
म्हणतात. गद्यातून, पद्यातून किंवा गाण्यातून गोष्ट सांगणे हे त्याचे कार्य असते.
तमाशातील सोंगाड्या, दशावतारातील शंकासूर, भवईतील रंगळो, यक्षगानातील हनुमान्नायक,
थेरुकुट्टूमधील कोमली ही विदुषकाची विविध रुपे आहेत. विनोदनिर्मितीसोबतच तत्कालीन
घटनांवर उपरोधीक भाष्य करणे हे त्याचे कार्य असते. बहुतेक सर्व लोकनाट्यांमध्ये
संगीत, नृत्याचा समावेश असतो. या पाच घटकांच्या उपस्थितीत लोकरंगभूमावरील अभिनय
अशा प्रकारे सिद्ध होतो –
लोकरंगभूमीवरील नट
कथन करतो, कथनाची क्रिया परिणामकारक होण्यासाठी तो विनोद, नृत्य, संगीत, वेशभूषा,
चित्र, बाहुल्या, इत्यादींची मदत घेतो. कथन शक्यतो बोलीभाषेत असते, परंतु बऱ्याचदा
ते लययुक्त, तालयुक्त, क्वचित मंत्रोच्चारासमान असते. लोकरंगभूमीवरील नट शारीरिक
हालचाली, बोलणे, चित्रविचित्र रंग-वेशभूषा, इत्यादि घटकांच्या मदतीने
विनोदनिर्मिती करतो. अनेक लोकपरंपरांमध्ये सोंगे काढली जातात. यात रंग-वेशभुषा, हालचाली
आणि बोलणे, इत्यादि घटक अनुकरणात्मक पद्धतीने वापरले जातात.
भारतातील विविध
लोकपरंपरांमधून पुढीलप्रमाणे अभिनय-कौशल्ये दिसून येतात –
बव्हंशी लोकपरंपरा
या निवेदनपर आहेत. निवेदन करताना, गोष्ट सांगताना लोककलाकार वेगवेगळ्या साधनांचा
उपयोग करत असतात. संगीत, नृत्य, विनोद, रंग-वेशभुषेतील घटक, मुखवटे, चित्रे,
बाहुल्या, इत्यादि ही ती साधने. या साधनांचा उपयोग करुन लोककलाकार आपली निवेदने
अधीक परिणामकारक पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोचवत असतात. या साधनांचा उपयोग हे
लोकशैलीच्या अभिनयाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
लोकरंगभूमीवर
विधीनाट्यातल्या अनेक घटकांचा उपयोग असतो. पुनरावृत्ती, संकेतबद्धता, प्रतीकांचा
वापर, इत्यादि घटकांचा त्यात समावेश होतो. बोलणे, शारीरिक कृती, रंगभूषा, वेशभूषा
आणि मंचवस्तूंचा वापर, इत्यादींमधून हे घटक दिसून येतात.
समयपटूत्व किंवा
टायमिंग हे लोकरंगभूमीवरील महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. विशेषतः मनोरंजनपर विनोदी
पद्धतीच्या प्रकारांमध्ये हे वैशिष्ट्य अधिक प्रमाणात वापरलेले दिसते. बोलणे आणि
शारीरिक कृती या दोन्हींमधून ते दिसते. परिणामकारकता हे त्याचे सगळ्यांत
महत्त्वाचे फलित असते.
लोकरंगभूमीवरील
अभिनयात अतिशयोक्तीचा वापर असतो. हा वापर बऱ्याच वेळा विनोदी पद्धतीने होतो.
बोलणे, हालचाल, कृती, शारीरिक व्यंग किंवा तर्काचे खेळ (संवादामधील कपोलकल्पीत,
काहीशा अतार्किक भराऱ्या) इत्यादींमधून अतिशयोक्ती दिसून येते. हालचालींचे,
आवाजाचे आणि शरीरातील एकूणच उर्जेचे वर्धन हा अतिशयोक्तीचाच एक प्रकार आहे.
लोकरंगभूमीवरील
अभिनयात शारीरिकतेचा आविष्कार दिसतो. अभिनयात नृत्य, पदन्यास आणि नृत्यवजा
हालचालींचा समावेश असतो. लोकरंगभूमीवरील नट आपल्या शरीरात उर्जा साठवून ठेवत असतो
आणि त्या उर्जेचा योग्य उपयोग करत असतो. नटाच्या हालचालींमधून तसेच आवाजामधून ती
उर्जा प्रकट होत असते. त्या उर्जेचा योग्य, नेमका आणि परिणामकारक वापर करण्यासाठी
नटाने आपल्या शरीराच्या हालचालींमध्ये आणि बोलण्याच्या पद्धतीत विशिष्ठता आणलेली
असते.
लोकरंगभूमीवरील
अभिनयात काही लोकोत्तर किंवा अलौकिक तत्त्वे दिसून येतात. काही विधींमध्ये नटात
देवावतरण होते, असा समज असतो. वैज्ञानिक दृष्टिकोनातून हे चुकीचे आहे. अतीव विश्वास किंवा श्रद्धेच्या जोरावर नट तंद्रीच्या
म्हणजेच ट्रान्सीडेन्टल अवस्थेत प्रवेश करतात. या अवस्थेत त्यांचे स्वतःवरील
नियंत्रण कमीत कमी असते. आपले संपूर्ण शरीर त्यांनी जणू ज्याचे सोंग आणलेले असते
त्याला बहाल केलेले असते. नट आणि त्याची भूमिका, तसेच नटाचे शरीर आणि त्याचे मन
यांच्यात एकतानता निर्माण झालेली असते.
लयतत्व हा
लोकरंगभूमीवरील अभिनयाचाच एक भाग आहे. संगीत, नृत्य, हालचाली, यमक-अनुप्रासयुक्त
बोलणे या सर्वांमधून लय जाणवत असते.
उत्स्फूर्तता हे
लोकरंगभूमीवरील अभिनयाचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य होय. जवळजवळ सगळ्या
लोककलाप्रकारांना लिखीत संहिता नसते. गाणी किंवा पद्यभाग ठरलेला असतो. गद्य
निवेदने आणि संवाद हे उत्स्फूर्त असतात. बऱ्याचदा तत्कालीन स्थानिक घडामोडींवर
उत्स्फूर्तपणे भाष्य केले जाते. बोलण्याप्रमाणेच काही कृती, हातवारे आणि लकबीदेखील
उत्स्फूर्तपणे सादर केल्या जातात. कथानकाची चौकट आणि त्यातील गीत व पद्यभाग ठरलेला
असतो. बाकी सर्व भाग प्रेक्षकांशी सुसंवाद साधत उत्स्फूर्तपणे सादर केला जातो.
छोटे किस्से, बतावण्या, वर्णने, शेरे, इत्यादि गोष्टी उत्स्फूर्तपणे सादर केल्या
जातात.
गाणी गाणारा,
नृत्य करणारा, विनोद करणारा, गोष्टी सांगणारा, वेगवेगळी सोंगे घेणारा भारतीय
लोकरंगभूमीवरील नट एका अर्थाने सर्वसमावेशक सादरकर्ता, टोटल परफॉर्मर असतो. भारतीय
लोकरंगभूमीवरील बहूसंख्य कलावंत बाह्य-संस्कारांपासून तसेच औपचारिक शिक्षणाच्या
प्रभावापासून वंचित असतात. परंपरेने चालत आलेल्या त्यांच्या अभिव्यक्तीला काही
अपवाद वगळल्यास कोणत्या शास्त्रांचा किंवा ग्रंथांचा कोणताही आधार नसतो.
सर्वसमावेशकता, रांगडेपणा आणि उत्स्फूर्तता ही भारतीय लोकरंगभूमीवरील नटाची
महत्त्वाची वैशिष्ट्ये होत.
वसाहतवादाच्या
काळात भारतात युरोपीय नाटक आले, ते त्याचा त्या वेळचा कमानी मंच, नाट्यलेखन शैली
आणि अभिनय-शैली घेऊन आले. समाजातील
सुशिक्षित आणि उच्च वर्गाने हे युरोपीय नाटक आपलेसे करून मराठी भाषेतून मांडले.
समाजातल्या बहूजन वर्गाकडून सादर होणाऱ्या आणि आस्वाद घेतल्या जाणाऱ्या
लोकरंगभूमीला रांगडी, अशिष्ठ, ओबडधोबड, अश्लील अशी विशेषणे बहाल झाली. मावळतीच्या
देशांप्रमाणे लोकरंगभूमी मूख्य धारेत परावर्तित झाली नाही, तर उलट क्षीण झाली.
भारतातील समाजव्यवस्था आणि जातवास्तव हे त्या मागचे महत्त्वाचे कारण होय, कारण
भारतातला लोकरंगभूमीचा जवळजवळ प्रत्येक प्रकार हा विशिष्ट जातीला चिकटलेला आहे,
आणि बहुसंख्य लोककलावंत हे जातीच्या उतरंडीतील खालच्या वर्गांतले आहे.
त्यांच्या आणि
आपल्या लोकरंगभूमीच्या संदर्भात दुसरा महत्त्वाचा फरक म्हणजे, कॉमेदिया देला’र्त सादर करणारे गरिब, अशिक्षित, समाजातल्या खालच्या
वर्गांतलेच लोक होते, पण त्यांनी आपल्या नाटकांमधून श्रीमंत म्हाताऱ्यांची येथेच्छ
टर उडवली. समाजातील दांभिकता रंगमंचावर आणली. दुर्दैवाने भारतीय लोकरंगभूमी
हेजेमनीला बळी पडली. वरच्या वर्गांचा अनुनय करत पातीव्रत्य, स्वामीनिष्ठा अशा
मुल्यांचा रंगमंचावरुन अनुनय झाला. समाजातील विषमतेवर टीका झाली, पण ती केवळ
टिप्पणीतून. किंवा समस्या मांडल्या गेल्या त्या वरवरच्या, ढोबळ पद्धतीने. जहरी
मार्मिकता त्यात अभावानेच आली.
स्वातंत्र्यानंतर
लोकरंगभूमीच्या समस्या अजूनच वाढल्या. आधुनिक जाणिवा मांडण्यासाठी लोकरंगभूमीचा
खेळण्यासारखा उपयोग होऊ लागला. लोकांची ती लोकरंगभूमी न राहता, शिष्ट लोकांची,
महोत्सवी नाटके करणारी लोकरंगभूमी ठरली. याखेरिज विद्यापिठीय संशोधकांना देखील
डॉक्टरेट मिळवण्यासाठी लोकरंगभूमीचे कुरण उपलब्ध झाले. गरिब-बिचाऱ्या
लोककलावंतांच्या मुलाखती घेऊन, त्यांची छायाचित्रे घेऊन प्राध्यापकांच्या पगारवाढी
झाल्या असतील, लोककलांच्या-लोककलावंतांच्या परिस्थीतीत मात्र या संशोधनाने काय फरक
पडला हा संशोधनाचाच विषय ठरावा.
आज मनोरंजनाचे
क्षेत्र, त्यातील आर्थिक गणिते पूर्वीच्या मानाने अमूलाग्र बदलले आहेत. परंपरेने
चालत आलेल्या आपल्या कलेचे जतन करावे कि परिस्थीतीनुसार आपल्या कलेत बदल करावा,
अशा कात्रीत आजचा लोककलावंत सापडला आहे. आपल्या मातीत जन्म घेतलेल्या आणि आपल्या पूर्वजांचे
मनोरंजन केलेल्या लोकरंगभूमीसमोर आज अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि या
प्रश्नाशी कसा सामना करावा हे खरे आव्हान आहे.
प्रवीण भोळे
(पूर्वप्रसिद्धी : पद्मगंधा दिवाळी अंक २०१५)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा