नाटक - रंगभूमी परिचय : ६. संहिता ते मंचन
नाट्यनिर्मिती प्रक्रियेत संहितेच्या निवडीपासून ते प्रयोगापर्यंत एकाच पद्धतीने प्रवास होत नाही. नाट्यसादरीकरणाचा हेतू, दिग्दर्शकाची कार्यपद्धती किंवा इतर व्यावहारीक कारणांमुळे प्रत्येक वेळी त्यातील घटकांचा क्रम बदलू शकतो. तरीही मराठीतील बहुतेक व्यावसायिक आणि संमातर नाटकांच्या निर्मितीच्या प्रवासात ढोबळमानाने काही मुद्दे पुढीलप्रमाणे नोंदवता येऊ शकतिल :
संहिता : बऱ्याच वेळेला लेखकाला सुचलेल्या विषयावर त्याने नाटक लिहून ठेवलेले असते. कधी दिग्दर्शकाला किंवा नाट्यनिर्मात्याला कोणत्या विशिष्ट विषयावरील नाटक लिहून हवे असते, म्हणून ते त्यापद्धतीने लेखकाकडून नाटक लिहून घेतात. कधी अशी संहिता एखादा व्यावसायीक निर्माता किंवा हौशी नाट्यसंस्था निवडते आणि त्यानुसार दिग्दर्शकाचीदेखील निवड केली जाते. तर कधी एखाद्या दिग्दर्शकाला आवडलेली, दिग्दर्शित करायची असलेली संहिता घेऊन तो निर्मात्याकडे किंवा संस्थेकडे जातो.
बऱ्याचदा दिग्दर्शक किंवा स्वतः नाटककार हा निर्माता, प्रमुख नट, समीक्षक, नाट्यअभ्यासक यांच्यासमोर संहितेचे पहिले वाचन करतो. वाचनानंतरच्या चर्चेत अनेक मुद्दे येऊ शकतात. त्यानुसार गरज पडली तर संहितेचे पुनर्लेखन केले जाते. नाटककार उपलब्ध नसेल तर त्याची परवानगी घेऊन किंवा जिवंत नसेल तर दिग्दर्शक स्वतःच्या अधिकारात संहितेचे परिष्करण करुन नवी रंगावृत्ती तयार करू शकतो.
दिग्दर्शन : नाटकाची एकंदर पठडी पाहून त्याप्रमाणे नाटक दिग्दर्शित करावे लागते. काही दिग्दर्शकांची नाट्यदिग्दर्शन करायची आपापली अशी विशिष्ट शैली ठरलेली असते, ते त्याच शैलीत काम करतात. उदा. कोवलम नारायण पण्णिकर, रतन थियम. एखाद्या वेगळ्या शैलीचे नाटक असल्यास त्या शैलीचा अभ्यास केला जातो.
तालिमपूर्व काळात दिग्दर्शक नेपथ्य, प्रकाशयोजना, रंग-वेशभूषा, संगीत, इ. अशा नाट्यघटकांच्या प्रमुखांची निवड करतो. नटनिश्चिती करतो. कोणत्या नटाला कोणती भूमिका द्यायची याचे ठोस असे कोणतेही नियम नसले तरी नटाची अभिनयशक्ती, बाह्यस्वरुपाची उचितता, त्या शैलीचा अनुभव, दिग्दर्शक आणि नट यांच्यातील परस्परसंबंध अशा अनेक बाबी लक्षात घेतल्या जातात.
नाटकाची तालिम सुरु होण्यापूर्वी इतर नाट्यघटकांपेक्षा नेपथ्यरचनेचा आराखडा सगळ्यांत आधी ठरवावा लागतो. बऱ्याच वेळेला तालिम प्रक्रियेत त्यात अनेक बदल होऊ शकतात. कित्येक दिग्दर्शक छोट्या प्रमाणावरील नेपथ्य नमुना बनवून घेतात आणि तो तालमींच्या ठिकाणी ठेवतात. काही दिग्दर्शक नेपथ्याचे भूमीदर्शन असलेले चित्र संहितेच्या प्रत्येक पानाच्या डाव्या बाजूला जोडतात आणि त्यावर पात्रांच्या हालचालींचे आलेखन करतात.
व्यक्तिगणिक नाट्यदिग्दर्शकाची पद्धत वेगळी असली तरी साधारणपणे आधी बैठी वाचने होतात, त्यात प्रामुख्याने वाचिक अभिनयावर लक्ष केंद्रित करित नटाला भूमिका आणि भूमिकेचे कंगोरे समजावून सांगितले जातात. नंतर उभ्याने तालमी सुरू होतात, त्यात नटांच्या हालचाली ठरविल्या जातात. या हालचाली ठरविताना संहितेत उल्लेख असलेल्या कंससूचनांचे भान दिग्दर्शकाला पाळावे लागते, परंतू नाटकाचे, भूमिकांचे आणि नाट्यप्रसंगांचे त्याचे आपले अर्थनिर्णयन लक्षात घेता कंससूचनाखेरिज कितीतरी अधीक सूचना दिग्दर्शक नटांना करित असतो. दिग्दर्शक नाटकाची एकंदरीत अभिनयशैली तर ठरवितोच पण प्रत्येक नटाबरोबर वैयक्तिकरित्या भूमिका उभारणीसाठी काम करतो. त्या त्या पात्राचे चालणे, बोलणे, त्याच्या विशिष्ट लकबी या बाबींमधून त्याचा सामाजिक दर्जा, मानसिक घडण, स्वभाववैशिष्ट्ये, विचारांची पद्धत, इ. गोष्टी कशा पद्धतीने व्यक्त होतील ते तो पहात असतो.
नाटक कच्चे बसले की पुन्हा प्रत्येक दृश्य घेवून त्यांच्यावर बारकाईने काम केले जाते. हळूहळू पर्यायी मंचवस्तंच्या ऐवजी खऱ्या मंचवस्तू, हस्तवस्तू वापरायला सुरुवात होते, वेशभूषेत नेहमीच्या वापरापेक्षा वेगळे कपडे असतील तर त्यांच्यासह तालमी सुरू होतात. पार्श्वसंगिताचा विचार आधीपासूनच सुरु झालेला असला तरी सलग तालंमीमध्ये नेमक्या जागा आणि वेळा ठरविल्या जातात. त्यानुसार तालमींमध्ये पार्श्वसंगीत वाजविले जाते. प्रकाशयोजक सलग तालमी पाहून त्याचा आराखडा तयार करतो.
रंगित तालमींमध्ये सर्व तांत्रिक घटकांची उपस्थिती असते. प्रसंगांमध्ये संगिताच्या खूणा, प्रकाशाचील बदल, नेपथ्यबदल यांचे पुन्हा पुन्हा सराव करुन घेतले जातात, आणि प्रयोग होईल त्याप्रमाणे तालीम केली जाते. त्यात ज्या गोष्टी लक्षात योतात, त्यावर चर्चा होऊन सुधारणा सूचविल्या जातात आणि ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळी, ठरलेल्या ठिकाणी प्रयोग होतो. प्रयोगाच्या वेळी प्रेक्षक हा नवा घटक येतो. त्यांच्या प्रतिसादाने प्रयोगाचा खरा कस लागतो. नंतर जसजसे अधिक प्रयोग होत जातात, नाटक अधिकाधिक घट्ट होत जाते.
- प्रवीण भोळे
प्राध्यापक आणि विभागप्रमुख
ललित कला केंद्र, गुरुकुल
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ४११ ००७
प्राध्यापक आणि विभागप्रमुख
ललित कला केंद्र, गुरुकुल
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ४११ ००७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा