शुक्रवार, २० मार्च, २०२०

नाटक - रंगभूमी परिचय : २. कलांचे वर्गिकरण, ३. प्रयोगकला, ४. नाटक कलेची वैशिष्ट्ये

नाटक - रंगभूमी परिचय : . कलांचे वर्गिकरण
कलेची एकच एक आणि सर्वमान्य व्याख्या सांगता येत नाहीअठराव्या शतकापर्यंत 'पूर्वनियोजीत परिणाम साधण्याकरिता उपलब्ध ज्ञानाची किंवा कसबाची केलेली सुयोग्य मांडणी म्हणजे कला' असे समजले जात होते. अठराव्या शतकात मात्र 'उपयुक्त कला' आणि 'ललित कला' अशा वर्गांमध्ये कलांचे वर्गीकरण केले गेले. ललित कलांमध्ये साहित्य, चित्रकला, शिल्पकला, वास्तूकला, संगीत, नृत्य यांचा समावेश केला जाऊ लागला
अनेक तत्त्वज्ञांनी कलांच्या निरनिराळ्या व्याख्या करण्याचा प्रयत्न केला. 'कलावंताच्या अंतरंगात प्रतित झालेल्या अनुभूतीचा आविष्कार म्हणजे कला' पासून ते 'लोकांना आनंद प्राप्त करून देण्याकरिता माणसाच्या सौंदर्ययुक्त अभिव्यक्तीला' कला म्हटले गेले आहे.
सर्वसामान्यपणे आपल्या भवतालचे जग जाणून घेणे आणि आपल्याला जाणवलेले जग किंवा त्यातील छोटेसे सत्य वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त करणे या कृतीला कलानिर्मिती समजले जाते. माणूस जे जगतो, त्याला जे वाटते, जे जाणवते, ते जेव्हा तो वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त करतो त्याला कला म्हणता येऊ शकते. वेगवेगळ्या माध्यमांमुळे वेगवेवगळ्या कला शक्य होतात. उदाहरणार्थ, आपली अनुभूती शब्द, लय, छंद यांच्या माध्यमातून मांडली तर कविता जन्माला येईल आणि रंग, रेषा, आकार, घाट, पोत यांच्या माध्यमातून मांडली तर चित्र तयार होईल. वेगवेगळ्या वाटत असल्या तरी काही कलांमध्ये समान गुणधर्म असू शकतात. या समान गुणधर्मांमुळे आपल्याला कलांचे काही गटांमध्ये वर्गिकरण करता येते. काही कला दृश्य म्हणजे बघून आस्वाद घेण्याजोग्या असतात (चित्रकला, शिल्पकला, नृत्य), तर काही कला श्राव्य म्हणजे ऐकून आस्वाद घेण्याजोग्या असतात (संगीत), काही कला द्विमीतीय असतात (चित्रकला), तर काही त्रिमितीय (शिल्पकला, वास्तूकला), काही चल म्हणजे ज्यांच्यात काहीतरी हालचाल होत असते अशा असतात (नृत्य, नाटक) तर काही अचल म्हणजे स्थिर असतात (शिल्पकला, चित्रकला), काही कला भाषिक म्हणजे विशिष्ट भाषांमधल्या आणि शब्दयुक्त असतात (साहित्य, नाटक) तर काही निर्भाषिक म्हणजेच कोणत्याही भाषेशिवायच्या, शब्दविरहीत अशा असतात (वाद्यवादन, नृत्य, मुकाभिनय), काही कला एकल म्हणजे एकेकट्याने सादर करण्याच्या असतात (साहित्य, गायन, वादन, नृत्य) तर काही समूहकला म्हणजे समुहाने सादर करण्याच्या असतात (नाटक, गायन, वादन, नृत्य), काही कला एकट्याने आस्वाद घेण्याच्या असतात (साहित्य) तर काही कलांचा आस्वाद समूहात घेतला जातो (नाटक), काही कला स्थलकालबद्ध आणि प्रयोगातून सिद्ध होणाऱ्या प्रयोगकला असतात (संगीत, नृत्य, नाटक).
नाटक - रंगभूमी परिचय : . प्रयोगकला
वेगवेगळे निकष लावून कलांचे वेगवेगळ्या प्रकारे वर्गिकरण करता येते. कोणीतरी करणारा, कोणीतरी पाहणारा, त्यांना एकत्र आणणारी जागा आणि एकच वेळ या चार घटकांनी मिळून प्रयोगकला सिद्ध होतात
     
हे चित्र चौदाव्या शतकामधील इटली ह्या देशातील आहे. चित्रात एका नाटकाचा प्रयोग सुरू असून काही लोक तो बघताहेत असे आपल्याला दिसून येते. हा त्या काळातील तिथला कॉमेदिया देला'र्त नावाचा लोकनाट्यप्रकार आहे. चित्रात आपल्याला असे दिसते आहे की, रस्त्याच्या बाजूला मोकळ्या मैदानात ह्या भटक्या कलावंतांनी त्यांचा मंच उभारला आहे. ह्या तात्पुरत्या उभारलेल्या लाकडी उंच मंचावर त्यांनी मागच्या बाजूला एक पडदा टांगलेला असून पडद्यामागे ते आपली तयारी करतात, कपडे बदलतात, आपला प्रवेश येण्याची वाट बघतात किंवा प्रवेश संपल्यावर विश्रांती घेतात आणि पडद्याच्या पुढच्या भागात नाटक सादर करतात. हे सादर करणारे कलावंत इथे आलेच नसते तर प्रेक्षक जमलेच नसते आणि म्हणून त्यांनी काहीच पाहीले नसतेदुसरी शक्यता लक्षात घेता, करणारे आले असते आणि पहायला कोणीच आले नसते तर त्यांनी काय सादर केले असते? आणि समजा केलेही असते, तर त्याला नाट्यप्रयोग म्हणता आले असते काय? की त्याला नाटकाची तालिम म्हणावे लागले असते? शिवाय हे दोन्ही घटक एकाच अवकाशात आणि एकाच वेळेसही असणे आवश्यक असते. अशा प्रकारे करणारा, पहाणारा, एक स्थळ आणि एक काळ या चार घटकांनी मिळून कोणतीही प्रयोगकला सिद्ध होते. गाण्याची मैफिल, नृत्याचा कार्यक्रम, नाटकाचा प्रयोग, रस्त्यावरचा डोंबाऱ्याचा खेळ, अंगणात आलेला वासूदेव, मंदिरातील किर्तन, एवढेच नाही तर सभेतील एखाद्या वक्त्याचे भाषण किंवा शाळेच्या वर्गातील शिक्षकांचे अध्यापन या सर्व गोष्टींमध्ये वरील चार घटक उपस्थित असल्याने त्या सर्व प्रयोगकला ठरतात.
एखाद्या चित्रकाराने रंगवलेल्या चित्राचा आस्वाद घेण्याकरिता चित्रप्रदर्शनात चित्रवस्तूसोबत चित्रकाराच्या उपस्थितीची आवश्यकता नसते. प्रेक्षक केवळ चित्रवस्तूचा आस्वाद घेऊ शकतात. परंतू नाट्यकलेबद्दल आपल्याला असे म्हणता येणार नाही. नाटक सादर करणारे कलावंत त्या जागेत उपस्थित नसतिल, तर ती कलावस्तू आकारालाच येणार नाही. त्याचप्रमाणे एखाद्या कवीने लिहिलेली कविता वाचत असताना तो कवी हयात नसला तरी त्या कवीने लिहिलेल्या कवितेचा आस्वाद घेताच येतो, पण हयात नसलेल्या नट-नटीने अभिनय केलेल्या नाटकाचा जिवंत प्रयोग प्रेक्षकांना पाहता येत नाही. एखादा शिल्पकार एखादे शिल्प घडवून ठेवतो, प्रेक्षक नंतर कधीतरी ते शिल्प बघतात, प्रयोगकलांचा आस्वाद मात्र त्या घडत असतानाच घेता येतो. हल्लीच्या काळात इलेक्ट्रॉनिक माध्यमांमधून प्रयोगकलांचे सादरीकरण जतन करुन ठेवता येऊ शकते, त्यांचा आस्वाद प्रेक्षकाला ती कला घडत नसताना, नंतर घेता येतो, पण हा आस्वाद प्रयोगकलेचा नसतो तर जतन करुन ठेवलेल्या कलेचा असतो. एखाद्या साहित्यीकाने लिहिलेली कादंबरी वाचक आपल्या सोयीने कधी पाच पाने तर कधी दहा अशी वाचू शकतो, कधी कधी उत्कंठा धरुन ठेवता आल्यास तो थेट शेवटचे पान उघडून वाचू शकतो. नाटकाच्या प्रयोगात मात्र कलावंत ज्या वेळेला जे दाखवतील, तेच प्रेक्षकांना पहावे लागते. सर्व प्रयोगकला अशा प्रकारे स्थलकालबद्ध कला असतात.
नाटक - रंगभूमी परिचय : . नाटक कलेची वैशिष्ट्ये
नाटक ही दृककला आहे, म्हणजे नाटकाचा प्रयोग घडताना डोळ्यांना दिसतो, ती श्राव्यदेखील आहे कारण कानांनी ऐकून आस्वाद घेता येतो, नाटक ही त्रिमितीपूर्ण कला आहे, ती कालव्यापी आहे, नाटकात भाषा वापरली जात असल्यामुळे ती भाषिक कला आहे, पण भाषेखेरीज अनेक अंगांनी ती व्यक्त होत असते म्हणून त्याच वेळेस निर्भाषिकदेखील आहे. नाटक ही समुहाने समुहासाठी सादर केलेली प्रयोगकला आहे.
नाटक ही जिवंत कला आहे. नाटक सादर करणारे कलावंत जिवंतपणे प्रेक्षकांसमोर उपस्थित असतात आणि ज्या वेळेला कलानिर्मिती होत असते त्याच वेळेला तिचा आस्वाद घेतला जात असतो. तो क्षण गेला की ती कला भूतकाळात जमा होते, म्हणूनच एकदा पाहीलेला प्रयोग पुन्हा नव्याने अनुभवताना तो नवा प्रयोग असतो.   
नाटक अनुभव देते. एखाद्या व्यक्तिरेखेचे साहित्यात शब्दांच्या सहाय्याने वर्णन केलेले असते, चित्रात किंवा शिल्पात स्थिर चित्रण असते. नाटकात मात्र ती व्यक्तिरेखा चालताना, बोलताना, वागताना दिसते आणि त्या व्यक्तिरेखेचा, व्यक्तिरेखांमधून घडलेल्या प्रसंगांचा प्रेक्षकांना प्रत्यक्ष अनुभव येतो. म्हणूनच नाटकाचा प्रयोग पहात असताना नाट्यप्रसंगांनुसार कधी प्रेक्षक हसतात तरी कधी त्यांना वाइट वाटते, कधी घाबरुन त्यांच्या अंगावर काटा येतो, तरी कधी आश्चर्याचा धक्का बसून ते चकित होतात. केवळ मानवी भाव-भावना आणि कृतींच्याच बाबतीत नव्हे, तर नाटक ही अशी कला आहे ज्यात मनुष्यप्राणीच (नट-नट्या) ती कला प्रेक्षकांपर्यंत पोचवण्याची मुख्य सामग्री आहे. साहित्यात शब्द असतात, चित्रांत रंग असतात तर नाटकात प्रत्यक्ष माणसेच असतात.
नाटक हे खोटे असते. नाटकाच्या प्रयोगात प्रत्यक्ष खरी माणसे जरी दिसत असली तरी, भाषिक संवाद आणि निर्भाषिक हावभाव ह्यांच्या सहाय्याने ते एखादे कथानक अभिनयित करित असतात. नाटकात एखाद्या प्राध्यापकाची भूमिका करणारा नट प्रत्यक्षात निरक्षर असू शकतो किंवा नाटकातला पोलिस हा खरा पोलिस नसतो, त्याचप्रमाणे नाटकातले घडणाऱ्या घटना ह्या खोट्या पद्धतीने परंतु खऱ्या वाटतील अशा घडवून आणलेल्या असतात. पण गंमत अशी की, नाट्यप्रयोगाच्या विशिष्ट अवकाशात आणि त्या विशिष्ट कालवधीत प्रेक्षक त्या सर्व खोट्या गोष्टींना मात्र खऱ्या समजत असतात. सॅम्युअल टेलर कोलरिज हा तत्त्वज्ञ ह्या प्रकाराला 'अविश्वासाचे तात्पुरते निलंबन' असे संबोधतो, म्हणजे रंगंमंचावर जे काही चालले आहे ते खरे नाही आहे हे प्रेक्षकांना माहित असतेच पण त्या अवकाशात आणि त्या कालावधाकरिता ते आपल्या अविश्वासाला तात्पुरते बाजूला ठेऊन त्या खोट्या व्यक्तिंना आणि प्रसंगांना खऱ्यांप्रमाणे समजू लागतात, तरीही समोर चालले आहे ते लुटूपुटूचेच आहे ह्यावर त्यांचा विश्वास असतो.
- प्रवीण भोळे
प्राध्यापक आणि विभागप्रमुख
ललित कला केंद्र, गुरुकुल
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ४११ ००७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अभिनयाच्या किमयाशाळा

  अभिनयाच्या किमयाशाळा १ . प्रयोगशाळा : एक अवकाश अवकाश म्हणजे जागा , जिथे काहीतरी सामावले जाते असे काहीतरी , म्हणजे प्रयोगशा...