चौऱ्यांशी वर्षांचं झाड
२००६ मध्ये पहिल्यांदा ओडिनला गेलो होतो. पहाटेच्या आगगाडीनं कोपेनहेगेनहुन होल्स्टेब्रोला जायला निघालो. तिथं पोचायला साडेदहा-अकरा झाले होते. सप्टेंबराचा महिना होता. त्यांचा समर. ओडिनमध्ये पोचलो तेव्हा सगळीकडे लख्ख उन पडलं होतं. ओडिनची देखणी इमारत उन्हात न्हात होती. आणि त्या इमारतीसमोर एखाद्या घोड्यासारखं एक झाड उभं होतं. अत्यंत थिएट्रीकली. जुनं, वठलेलं, निष्पर्ण. आणि त्याला सरसकट पांढरा रंग फासलेला होता. आकाशाकडे झेपावणाऱ्या त्याच्या फांद्या उलट्या मुळांसारख्याच दिसत होत्या. ते झाड बघताच क्षणी आठवल्या सदानंद रेग्यांच्या ओळी :
माझ्या मनात आहे उलटं झाड उगवलं
त्यावर झोपाळा बांधायलाच हवा का?
बांधून घेतलं जर मी याच्या बुंध्याला
तर आकाशाला पाय लागणारच नाहीत का?
ओडिनचं हे झाड फक्त ओडिनच्या कार्यपद्धतीचंच एक मूर्तीमंत प्रतिक आहे, असं नाही. तर ओडिनच्या कर्त्या युजेनिओ बार्बाच्या जीवनप्रवाहाचंही आहेच. दक्षिणी इटलीच्या समुद्र किनाऱ्यावर जन्म झालेला युजेनिओ वयाच्या १८ व्या वर्षी उदरनिर्वाहासाठी युरोपाच्या थेट उत्तर टोकाला नॉर्वेमध्ये येतो. छप्पर दुरुस्त करायचं काम करत करत विद्यापीठात पदवीचं शिक्षण घेतो. परदेशात भाषेची अडचण येते, तिथली भाषा निट वाचता येत नाही म्हणून बहुभाषिक ग्रंथालय शोधून काढतो. तिथे जाऊन इटालीयन आणि फ्रेन्च भाषेतली एकूणएक पुस्तकं वाचून काढतो. रोमा रोलॅंचं रामकृष्ण परमहंसांवरचं पुस्तक पाहून भारतात यायची अतीव इच्छा होते. पण प्रवासखर्च परवडणार नाही, म्हणून व्यापारी जहाजावर खलाशाचं काम स्विकारतो. भारतात येतो. गंगाघाटावर येऊन रामकृष्ण ज्या मार्गानं चालत जायचे त्यावरून प्रदक्षिणा घातलो. नॉर्वेत असताना कधीतरी एकदा आन्द्रे वायदाचा अॅशेस अॅण्ड डायमण्डस् बघतो आणि पोलंड देशाच्या प्रेमात पडतो. युनेस्कोची फेलोशिप घेऊन नाटक शिकायला म्हणून पोलंडला जातो. पण तिथलं शिकवणं आवडत नाही, म्हणून वर्गांना दांड्या मारून खेडोपाडी हिंडतो. तिथं त्याला ग्रोटोव्स्की भेटतो. केवळ तीन वर्षांनी मोठ्या असलेल्या ग्रोटोव्स्कीला तो गुरू मानून दोन वर्ष त्याच्याकडे उमेदवारी करतो. त्यांच्या सूचनेबरहुकूम भारतात येतो. कथकलीचा अभ्यास करतो. नंतर पोलंडमध्ये त्याला प्रवेश नाकारतात, म्हणून पुन्हा नॉर्वेला जातो. नॉर्वेच्या राष्ट्रीय नाट्य शाळेत प्रवेश नाकारलेल्यांना घेऊन स्वतःचं ओडिन तिएत्रेत सुरू करतो. जमा झालेल्या आठ तरूणांसोबत आठवडाभर मोलमजूरी करायची आणि शनवार-रवीवारी एकत्र जमून अभिनयासंबंधी स्वाध्याय करायचे, असा उपक्रम सुरू करतो. कुठल्याही विशिष्ट नाटकाची तयारी नाही, तालमी नाही, प्रयोगाविषयी तर बोलणंच नाही, तरी एकत्र येऊन अभिनयचे स्वाध्याय मात्र करायचे. जगातल्या कोणत्याही नाटकवाल्यासाठी हे किती कठीण काम. पण अट्टाहासाने ते करायला भाग पाडायचं. शेवटी एक नाटक तयार झाल्यावर त्याचे युरोपभर प्रयोग करायचे. डेन्मार्कमधल्या होल्स्टेब्रो गावातल्या लोकांनी आमच्या गावात नाटकाचं काहीच वातावरण नाहीये, तुम्ही आता इथेच थांबा, म्हटल्यावर त्यांनी दिलेल्या पडक्या गोठ्यात आपला नाटकाचा संसार थाटायचा. आणि गेली ५६ वर्षं तिथंच थांबून नाटकं करायची. केवळ नाटकंच नाही तर नाटकाच्या आजुबाजूला अनेक उपक्रम. मुख्य म्हणजे प्रशिक्षण. कोणतीही कार्यरत संस्था प्रशिक्षण सुरू करते, ते दोन हेतूंनी - नाटक आता आम्हाला पूरतं कळून चुकलंय, म्हणून प्रचार, प्रसार आणि संवर्धन अशा गोंडस नावांखाली आता तुम्हाला शिकवतोच, हा एक; आणि अर्थातच अर्थाजन. ओडिनमधलं प्रशिक्षण हे इतरांसारखं असं बाह्यकेंद्री नसून अंतर्केंद्री होतं. म्हणजे दुसऱ्यांचं नाही - ओडिनमधल्या नटांचंच प्रशिक्षण आणि तेही सततचं. ओडिनमध्ये आज अनेक जुने-जाणते नट आहेत. कॅरोलिना आणि लुईस हे दोन तरूण नट सोडले - त्यांनाही ओडिनमध्ये अधिकृतरित्या येऊन चार-पाच वर्षे झालीत पण त्याआधी पाच-सहा वर्षं ते ओडिनशी संबंधीत होते. तर ते वगळता इतर सर्व नटांना ओडिनमध्ये येऊन वीस, तीस, चाळीस वर्षं झालीत. एल्सा मारीला तर ५६ वर्षं झाली, म्हणजे ओडिनच्या वयाएवढीच. ती आणि युजेनिओ ओडिनच्या स्थापनेपासून ओडिनमध्ये आहेत. नुकतंच युजेनिओनं दिग्दर्शित केलेलं आणि एल्सा मारीची भूमिका असलेलं डेफ मॅन्स हाऊस नावाचं नवं नाटक प्रदर्शित झालंय. मुद्दा काय हे सगळे नवे-जुने नट अोडिनमध्ये अजूनही स्वतःच स्वतःसाठी प्रशिक्षणाचे कार्यक्रम आखतात आणि त्याबरहुकून स्वतःला प्रशिक्षीत करत असतात. आपल्या संस्थेतल्या नटांना अशा प्रकारे सतत प्रेरीत करत रहायचं. तर स्वयंप्रशिक्षण हा एक उपक्रम झाला. आपल्या ज्या होल्स्टेब्रो गावानं आधार दिला, त्या गावाची जत्रा आयोजीत करणं; वस्त्या-पाड्यांवर, शाळा-शाळांमध्ये सादरीकरणाची देवाण-घेवाण करणं. सादरीकरणाची देवाण-घेवाण म्हणजेच बार्टर हा ओडिनचा एक विशेष प्रकल्प आहे. ज्यांना संगीताचे, नाचाचे, नाटकांचे कार्यक्रम बघायची कधी संधी मिळत नाही त्यांच्यासाठी खास कार्यक्रम तयार करून दाखवतात. पण फुकट नाही. आमच्या कार्यक्रमाच्या बदल्यात पाहणाऱ्यांनीही आम्हाला काहीतरी करून दाखवावं, या अपेक्षेनं. सादरीकरणाच्या बदल्यात सादरीकरण. आणि प्रयोगांनंतर ओडिनचे नट अतिशय उत्साहानं करणाऱ्यांकडून त्यांचे खास पदन्यास, गाणी शिकून घेतात. शिकणं थांबत नाहीच. शिवाय ओडिनचे नट नाटकांविषयीचे, प्रशिक्षणाविषयीचे चित्रपट तयार करतात. ओडिनचं स्वतःचं प्रकाशनघर आहे. पूर्वी ते डॅनिश भाषेत एक नियतकालिक चालवायचे. त्यातला एक अंक ग्रोटोव्स्की विशेषांक होता. नंतर त्याचंच इंग्रजीत भाषांतर करून त्याचं पुस्तक झालं. तेच ते ग्रोटोव्स्कीचं तत्त्वज्ञान मांडणारं जगप्रसिद्ध पुस्तक - टुअर्ड्स पूअर थिएटर. आत्ताआत्तापर्यंत त्याचे अधिकार ओडिनकडेच होते. मग केव्हातरी ओडिननं पोलंडमधल्या ग्रोटोव्स्की संस्थेला एका युरोच्या बदल्यात पुस्तकाचे अधिकार विकले. तो समारंभही एखाद्या विधीसारखा सादर झाला. स्वतः युजेनिओनं तर त्याच्या चिंतनातून अनेक पुस्तकं तर लिहिलीच आहेत, त्यानं ओडिनच्या इतर नटांनाही पुस्तकं लिहायला भाग पाडलं. १९८९ मध्ये त्यानं आंतरराष्ट्रीय रंगभूमी मानवशास्त्र विद्यालयाची स्थापना केली. ह्या विद्यालयात जगभरातल्या नानाविध सादरीकरण परंपरांमधल्या सामायिक तत्त्वांचा शोध घेतला जातो. डेन्मार्कमधल्या ऑर्हूस विद्यापीठाच्या साथीनं जगभरातल्या नाटकांच्या प्रयोगशाळांच्या अभ्यासाचं तर इटलीतल्या माल्टा विद्यापीठाच्या साथीनं इंग्रजी सोडून इतर भाषांमध्ये रंगभूमीविषयक लिहिल्या गेलेल्या पुस्तकांचं भाषांतर करून प्रकाशित करायचं काम चालतं. डेन्मार्क आणि त्याच्या आजुबाजूच्या देशांमधल्या प्रायोगिक नाट्यसंस्थांचा गट करून स्थानिक पातळीवर प्रायोगिक रंगभूमीला उत्तेजन देण्यासाठी त्यानं एनटीएल नावाची संस्था सुरू केलीय त्याअंतर्गत गुरूवारचं कविता वाचन, अतिथी नाट्यप्रयोग, विविध सभा, संमेलनं असे अनेकानेक उपक्रम तो राबवतो. मागे चाळीस वर्षांपूर्वी त्यानं युरोप आणि लॅटिन अमेरिकेतल्या नाट्यचळवळींचं एक जाळं आखण्याचा प्रकल्प राबवला होता, तिसऱ्या रंगभूमीचं जाळं - या नावानं. आज त्या केवळ त्या जाळ्यातल्यातच नाही तर त्यांची प्रेरणा घेऊन जगभर अशा नाट्यचळवळी करणाऱ्या संस्था स्वयंनिर्वाही झालेल्या आहेत, ओडिनसारख्याच त्याही भरघोस कामं करताहेत. ह्या सगळ्यांशिवाय वर्षभर एकतर ओडिनमध्ये किंवा जगात अक्षरशः कुठेही चालणाऱ्या कार्यशाळा, जगभर हिंडून केलेले नाटकांचे प्रयोग, चर्चासत्रं, परिसंवाद, संमेलनं, नाट्योत्सव किती होतात, ह्याची गणतीच नाही. हे सगळंच अतर्क्य, एखाद्या परिकथेसारखंच वाटत राहतं. एकदा युजेनिओला म्हटलं, हे एवढं सगळं करायचं, दमवणारं नाही? त्यावर तो म्हणाला, नाटक करायचं ही पहिली आवड. तेच ते करून शिळेपणा येऊ शकतो. गाभ्यातलं नाटक ताजं ठेवायचं असेल तर त्याच्या आजूबाजूला सततच काहीनाकाही नवीन तर करायलाच पाहिजे ना. ह्या बाकीच्या गोष्टी नाटक करायला उर्जा देतात आणि आपल्यातलं नाटक ताजं ठेवतात, बनचुकेपणा करू देत नाहीत.
पण हे सगळं करायला पैसा लागतो. नाटकवाले सगळ्यात आधी पैशाच्या नावानं गळे काढतात. त्याही बाबतीत युजेनिओची धोरणं स्वच्छ आहे. नाटक व्यवसाठीक रित्या करायचं, पण व्यवसायासाठी म्हणून काहीही नाही करायचं. आपल्याला पाहिजे तेच. मग व्यवसाय कसा होणार? त्यासाठी अनुदानं मिळवायची. पुन्हा - अनुदानांसाठी आपल्या ध्येय-धोरणांमध्ये बदल करायचा नाही. आपल्या अटी-शर्तींवर अनुदान मिळणार असेल तरच ते घ्यायचं. नाहीतर मग दिवस-रात्र करून, जगभर हिंडून कार्यशाळा घ्यायच्या. पुरेसे पैसे जमा झाले की नवीन नाटक करायचं.
गेली छप्पन्न वर्षं हे असंच चालू आहे. सध्या ओडिनमध्ये त्यांच्या भात्यातल्या विस-पंचवीस नाटकांचे प्रयोग तर सुरू आहेतच शिवाय इशी नावाच्या नव्या नाटकाच्या तालमी चालू आहेत. उर्ध्वमुलमधःशाखम् असलेल्या झाडाच्या झोपाळ्यावर बसून ओडिनमधल्या ह्या सगळ्यांचेच पाय आता आकाशाला टेकलेले आहेत. ओडिन सुरू करणारं हे आंतर्बाह्य थिएट्रीकल झाड आज चौऱ्यांशी वर्षांचं झालंय.
युजेनिओ बार्बाला त्याच्या वाढदिवासाच्या खूप शुभेच्छा.
- प्रवीण भोळे.
३० ऑक्टोबर २०२०



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा