नाटक - रंगभूमी परिचय : १. प्रयोगानुभव
आपण एखादे नाटक पहायला जातो, तेव्हा तो अनुभव कसा असतो ?
एकतर सगळ्यात आधी आपण त्या नाटकाची जाहिरात पाहिलेली असते, किंवा कोणीतरी आपल्याला नाटकाविषयी सांगीतलेले असते. मग आपण नाटक पहायला जायचे ठरवतो, कोणासोबत किंवा एकटेच. कदाचित त्या नाटकाचा भाग असलेल्या कोणीतरी आपल्याला नाटक पहायचे आमंत्रण दिलेले असते, नाहीतर मग आपण तिकिट काढतो.
प्रयोगाच्या दिवशी ठरलेल्या वेळेला आपण नाटकघरात पोचतो. आपल्याप्रमाणेच इतरही लोक नाटक पहायला आलेले असतात. नाटकघराच्या आवारात त्या दिवशी सादर होणाऱ्या तसेच काही आगामी नाटकांची माहिती लावलेली असते. या माहितीमध्ये प्रामुख्याने नाटक कधी, किती वाजता आणि कुठे सादर होणार आहे, नाटकाचे नाव काय आहे, नाटकाचे लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि कलाकार कोण आहेत हे लिहिलेले असते. क्वचित प्रसंगी नाटकाचा प्रकार (संगीत, कौटुंबिक, सामाजिक, वगनाट्य, विनोदी, फार्स, इत्यादी) किंवा नाटकाचा विषय (महिलांवरील अत्याचाराला वाचा फोडणारे, भ्रष्टाचारावर भाष्य करणारे, इत्यादी) देखील नोंदवलेले असते. कधीकधी नाटकातील कलावंतांची किंवा नाट्यप्रसंगांची छायाचित्रे असतात. ते वाचत, बघत असतानाच नाट्यानुभवाला सुरुवात झालेली असते.
आपण आपले तिकिट दाखवून प्रेक्षागृहात प्रवेश करतो. बंद पडद्यासमोर अनेक खुर्च्यांच्या रांगा ओळीने लावलेल्या दिसतात. आपण आपल्या खुर्चीवर जाऊन बसतो. आपल्या आजुबाजूलाही लोक येऊन बसलेले असतात. आपण ह्या प्रेक्षकसमुहाचा एक भाग होतो. थोड्या थोड्या कालावधीने तीन घंटा होतात, प्रेक्षागृहातील दिवे मंद होऊ लागतात. आता, सादर होणाऱ्या नाटकाविषयी सांगितलं जाऊ लागते. समोरचा पडदा हळूहळू उघडू लागतो. नाटकाच्या प्रयोगाला सुरुवात होते.
रंगमंचावर हळूहळू प्रकाश येऊ लागतो आणि आपण नाटकाच्या विश्वात प्रवेश करतो. कधी कधी मंचावर काही वस्तू मांडलेल्या असतात, त्यावरुन आपल्याला हे नाटक कुठे घडते आहे याची कल्पना येऊ शकते. एखादे घर किंवा कार्यालय, महाल, रस्ता किंवा जंगल असे काहीही. मंचावर असलेले किंवा प्रवेश केलेले नट-नट्या आपल्याला व्यक्तिरेखांची प्रचिती देतात. या व्यक्तिरेखा आपल्या समाजातील आपल्या आजूबाजूला असणाऱ्या माणसांसारख्या असू शकतात किंवा परक्या देशातल्या, इतिहासातल्या किंवा काल्पनिक देखील असू शकतात. त्यांनी घातलेले कपडे, त्यांचे चालणे बोलणे असे काही असते की ज्या जगात ते राहतात त्याची आपल्याला कल्पना कल्पना येऊ शकते.
हळूहळू नाटक पुढे सरकते. आपल्याला व्यक्तिरेखांमधले नातेसंबंध लक्षात यायला लागतात. कोणकोणत्या व्यक्तिरेखा एकमेकांच्या जवळ येताहेत, कोणकोणत्या एकमेकांशी फटकून वागताहेत. हळूहळू आपल्याला त्यांचा परिचय होऊ लागतो. काही आपल्याला आपल्या अगदी जवळच्या वाटतात, तर काहींचा आपल्याला राग येतो. मंचावर जे काही घडतेय त्यामुळे कधी आपल्याला गंमत वाटते तर कधी आपण गंभीर होतो. व्यक्तिरेखा जेव्हा स्वतःचीच चेष्टा करतात, तेव्हा आपण त्यांच्यावर हसतो. जेव्हा त्यांच्यावर संकटे कोसळतात, आपल्याला त्यांची काळजी वाटायला लागते. त्यांच्या वेदनेने आपणही दुःखी होतो. कधी नाटकातील थरार आणि रहस्य वाढत जाते, आपण श्वास रोखून पहात राहतो. नाटक त्याच्या अत्युच्च बिंदुपाशी पोचते. हळूहळू प्रसंगांची उकल होते. आपल्याला हायसे वाटते.
पडदा पडतो. नाटक संपते. प्रेक्षाघरातील दिवे उजळतात. आपण टाळ्या वाजवतो. आपण हळूहळू प्रेक्षाघराबाहेर पडून ज्याला आपण 'खरे विश्व' म्हणतो, त्यात प्रवेश करतो. नाटकातले काही विचार, काही ठसे, काही भावना मात्र आपल्या मनात नंतर बराच काळ रेंगाळत राहतात.
हा अनुभव केवळ आपल्यालाच नाही तर अनेकांना येतो. शेकडो वर्षांपासून लक्षावधी-कोट्यवधी प्रेक्षक हा अनुभव घेत आलेत. अर्थात प्रत्येक वेळी हा अनुभव असाच असेल असे मात्र नाही. कधी ते जास्त हसले असतील तर कधी जास्त दुःखी झाले असतील. आजच्या घडीला हाच अनुभव अनेक वेगवेगळ्या पद्धतींनी अनुभवता येऊ शकतो. कधी एका मोठ्या प्रेक्षाघरात हजारो लोकांसोबत हा अनुभव घेता येतो, तर कधी समिपमंचघरात अगदी साठ-सत्तर प्रेक्षकांसोबत हा अनुभव घेता येतो. कधी नाटकातल्या गोष्टीत आपण गुंगून जातो, तर कधी नाटकातील गोष्टीमुळे आपल्याला सभोवतोलची जाणीव होते. कधी आपल्याला आपल्यासारख्याच व्यक्तिरेखा दिसतात, तर कधी आदर्श व्यक्तिरेखा दिसतात. काही नाटकांमधून आपल्या भवतालच्या समाजातील समस्या मांडल्या जातात, तर काही नाटके आपल्याला त्रिकालबाधीत सत्याची जाणीव करून देतात. काही विचार करायला लावतात, तर काही केवल अनुभव देतात.
असे जरी असले, तरी एखाद्या नाट्यप्रयोगाचा एकदा जो अनुभव येतो, तो एकदाच येतो. कारण नाटकाचा प्रत्येक प्रयोग हा जरी एकसारखा असला तरी त्याचा अनुभव मात्र प्रयोगागणीक वेगळा असतो, कारण नाटक ही प्रयोगकला आहे.
- प्रवीण भोळे
प्राध्यापक आणि विभागप्रमुख
ललित कला केंद्र, गुरुकुल
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ४११ ००७
प्राध्यापक आणि विभागप्रमुख
ललित कला केंद्र, गुरुकुल
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ४११ ००७
धन्यवाद सर...
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर!
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर
उत्तर द्याहटवाThanks
उत्तर द्याहटवाThank you sir
उत्तर द्याहटवा